मंदीची झळ / सोलापूरच्या वस्त्रोद्योगातही मंदीचा शिरकाव; ३५ टक्के उत्पादन ठप्प; पाच हजार कामगार बेरोजगार

३ हजार पारंपरिक यंत्रमागांची धडधड झाली बंद

Sep 06,2019 08:48:00 AM IST

सोलापूर - जागतिक मंदीचा सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगातही शिरकाव झाला. सुमारे ३५ टक्के उत्पादन ठप्प झाले. ३ हजार पारंपरिक यंत्रमागांची धडधड बंद झाली. पैकी निम्म्याहून अधिक मागांची भंगारातून विक्री करण्यात आली. उत्पादक आर्थिक विवंचनेत सापडले. ५ हजार कामगार बेरोजगार झाले. गेल्या ६ महिन्यांतीलच हे चित्र. त्याला वेळीच सावरले नाही, तर हा उद्योग पूर्णपणे उद््ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. सरकारी उपाय मात्र अद्यापही कागदावरच आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या ७० हजार कोटींच्या पॅकेजमध्ये वस्त्रोद्योगाला काय मिळणार, याकडे उत्पादक डोळे ठेवून आहेत.


सोलापूरच्या यंत्रमागांवर टेरिटॉवेल, नॅपकिन आणि चादरींचे उत्पादन होते. येथील उत्पादकांची बाजारपेठ कधीच स्थिर नसते. तेजी-मंदी असतेच, पण वर्षातील पावसाळा आणि हिवाळा या उद्योगासाठी सीझन म्हणजेच बऱ्यापैकी मागणीचा काळ. त्यामुळे पूर्ण क्षमतेने उत्पादने घेतली जातात. परंतु परतीचा पाऊस तोंडावर असतानाही बाजारपेठेतून अपेक्षित मागणी नाही. जून, जुलै, ऑगस्ट या तिन्ही महिन्यांत स्थिती आणखी बिघडत गेली. याची कारणमीमांसा केल्यानंतर ‘मंदी’ शिरल्याचे जाणवले. एकूण बाजारच थंड झालेले आहे, असे उत्पादक सांगतात.

सवलतींचा हा विरोधाभास

वीज सवलत : सर्वांना वाटते, यंत्रमागांना फक्त १ रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा होतो. वस्तुस्थिती तशी नाही. २००४ मध्ये मिळालेल्या यंत्रमाग पॅकेजमध्ये १ रुपया दराने वीज देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत त्याच्यावर अधिभार लावणे सुरूच आहे. २७ अश्वशक्ती (एचपी) असलेल्या वीजजोडला ३ रुपये २५ पैसे तर २७ एचपीच्या पुढे असणाऱ्या जोड (कनेक्शन)ला ५ रुपये ५० पैसे (प्रतियुनिट) असा दर आहे. अत्याधुनिक ‘रॅपिअर लूम’ १०० एचपी ते ३०० एचपीवर चालत असतात.


सरकारी हस्तक्षेप गरजेचा : मंदीचा सोलापूरवर परिणाम होताच, आता शिरकावही झाला. ३५ टक्के उत्पादनावर परिणाम झालेला आहे. सरकारी हस्तक्षेप गरजेचे आहे, असे यंत्रमागधारक संघटनेच्या पेंटप्पा गड्डम म्हणाले.

मंदी सांगणारी बोलकी आकडेवारी
> १५ हजार यंत्रमागांपैकी १२ हजार मागच चालत आहेत. ३ हजार मागांची धडधड बंद, काहींची भंगारातून विक्री.
> ५० उत्पादक वस्त्रोद्योगातून बाहेर पडले. त्यामुळे ५ हजार कामगार बेरोजगार, अन्य उत्पादकांकडे कामात कपात.
> १२०० अत्याधुनिक यंत्रमागांवर पूर्ण क्षमतेने उत्पादन नाही, त्यामुळे भांडवल गुंतले, बँकेच्या ‘हप्त्या’त अडकले.
> ६० टक्के निर्यात घटली, चायनीज मालाच्या आयातीचा परिणाम, बांगलादेशातूनही अालाय, मोठ्या प्रमाणात माल.

X