आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉरिशसच्या पर्यावरण संवर्धनासाठी सोलापूरच्या 'वेदा'ची आयडिया; 'इको वॉरिअर्स' गेम शालेय अभ्यासक्रमात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आफ्रिका खंडातील पहिला प्रयोग, सोलापूूरच्या तरुणीचे मॉरिशसमध्ये स्टार्टअप
  • युनेस्कोच्या सहकार्याने तयार केला मोबाइल गेम, गेममधून पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापनाचे धडे

औरंगाबाद - मॉरिशस हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. पर्यटन हा उपजीविकेचा प्रमुख व्यवसाय असतानाही देशात घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती फार समाधानकारक नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतलाय तो सोलापूरच्या वेदा डीन हिने. वेदाने युनेस्कोच्या सहकार्याने 'इको वॉरिअर्स' हा मोबाइल गेम तयार केला असून यातून ती पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहे. या गेमला माॅरिशसच्या शिक्षण खात्याने मंजुरी दिली असून देशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे. मॉरिशस हा हिंदी महासागरातील मॉरिशस, रोड्रिगेस, आगालेगा आणि सेंट ब्रांडन या ४ द्वीपसमूहांनी तयार झालेला देश. मॉरिशस, रोड्रिगेस बेट, रियूनियन आणि मादागास्कर प्रांत मिळून मॅस्केरिन बेट तयार होते. निसर्गरम्य अशा या परिसरात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी सोलापूरच्या वेदा डीन हिने कल्पक पाऊल उचलले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळतोय.

गेममधून पर्यावरण प्रबोधन : वेदाने सप्टेंबर महिन्यात 'पांडा अँड वुल्फ होल्डिंग कंपनी'अंतर्गत इको वॉरिअर्स हा मोबाइल गेम लाँच केला. तो गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य डाऊनलोड करता येतो. गेममधून मॉरिशसच्या ६ ते ११ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण संवर्धनाबाबत प्रबोधन केले जाते. ४ लेव्हल आणि १० सबलेव्हल पार करत अंतिम टप्प्यावर पोहोचणारा विद्यार्थी 'इको वॉरिअर' म्हणून वसंुधरेच्या रक्षणासाठी सज्ज होतो. त्यात घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण, थ्री आर, कचऱ्याचा पुनर्वापर याबाबत जागरूकता निर्माण होते. मॉरिशसचा इतिहास, भूगोल, वन्यजीवनाचीही माहिती होते.

शाळाशाळांत मोबाइल गेम : वेदाच्या मोेबाइल गेमला मॉरिशसच्या शिक्षणमंत्र्यांनी भरभरून दाद दिली. त्यांनी हा गेम देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या टॅबमध्ये इन्स्टाॅल करण्याचे परिपत्रक काढले. इको वॉरिअर्स कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारणार आहे. घरातला ५ किलो कचरा आणणाऱ्या विद्यार्थ्यांना एक कॉमिक्स आणि अॅक्टिव्हिटी बुक दिले जाणार आहे.

सोलापूरच्या तरुणीचे स्टार्टअप : वेदा लोलगे मूळ साेलापूरची. पुण्यात फाइन आर्ट््सनंतर एफएडी इंटरनॅशनल संस्थेतून डिझाइन कम्युनिकेशनची पदवी घेतली. येथेच ब्रायन डीन या मॉरिशसच्या तरुणाची भेट झाली. २०१३ मध्ये पुण्यात ४ लाखांच्या गुंतवणूकीतून पांडा अँड वुल्फ ही जाहिरात कंपनी सुरू केली. २०१७ मध्ये कंपनीचे मुख्यालय मॉरिशसला हलवले. २०१८ मध्ये वेदा आणि ब्रायन विवाहबद्ध झाले. मॉरिशसमध्ये कंपनीचा अॅडेक डिव्हिजन, डिस्कव्हर मॉरिशस, होमपांडा आणि इको वॉरिअर्स या चार ब्रँड्समध्ये विस्तार केला.

युनेस्कोचे पाठबळ : इको वॉरिअर्स ही मॉरिशसमध्ये परदेशी कंपनी असल्याने कोणी गुंतवणुकीस तयार होत नव्हते. यामुळे वेदाने युनेस्कोला शाश्वत विकास उद्दिष्टांंतर्गत प्रस्ताव पाठवला. युनेस्कोला ही आयडिया पटली आणि अवघ्या काही तासांत होकार मिळाला. अाफ्रिया खंडात युनेस्कोच्या साहाय्याने पर्यावरण संवर्धनासाठी लाँच केलेला हा पहिला मोबाइल गेम ठरला आहे.

शाश्वत विकासासाठी आवश्यक
युनेस्कोच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे. संस्कारक्षम अशा शालेय जीवनात दिलेले ज्ञान आयुष्यभर टिकते. इको वॉरिअर्सच्या गेममधून मिळत असलेले पर्यावरण संवर्धनाचे धडे मॉरिशसच्या शाश्वत विकासासाठी उपयोगी ठरतील. - ख्रिस्टिन युमोटोनी, निवासी समन्वयक, संयुक्त राष्ट्रे, मॉरिशस आणि सिशेल्स

पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त मॉडेल
पर्यावरण संवर्धनासाठी इको वॉरिअर्स हे अत्यंत उपयुक्त असे गेम मॉडेल आहे. विद्यार्थी खेळण्यातून, चित्तथरारक अनुभव घेत एक एक लेव्हल पार करत पर्यावरण रक्षण, घनकचरा व्यवस्थापनाचे धडे गिरवतात. मॉरिशस सरकार आणि युनेस्कोचे पाठबळ मिळाल्यामुळे या गेमचे महत्त्व अधारेखित झाले आहे. -वेदा डीन, सहसंस्थापक, पांडा अँड वुल्फ होल्डिंग

बातम्या आणखी आहेत...