आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकत्या जिन्यावरून सोलापूरकर संतप्त; रेल्वेमंत्र्यांना ट्विट करून व्यक्त केली नाराजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर बसविलेला सरकता जिना चुकीच्या दिशेने बसविला असल्याने सोलापूरकरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अनेकांनी मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांसह रेल्वेमंत्री व पंतप्रधान कार्यालयांपर्यंत ट्विट करून रेल्वेच्या या बेजबाबदार कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. काहींनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. सोलापूरकरांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ या जिन्याची दिशा बदलावी, असे अनेकांनी ट्विट करून म्हटले आहे. या प्रकरणी डीआरएम यांनी मौन राखले अाहे. 


सोलापूर स्थानकावरील सरकता जिन्या चुकीच्या दिशेने बांधल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीत शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. कोणत्याही स्थानकाच्या प्रवेशाजवळ अथवा ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये -जा असते अशाच ठिकाणी सरकता जिना बसविण्यात येतो. दिल्लीपासून ते पुण्यापर्यंत सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर अशाच रीतीने सरकता जिना बसविण्यात आला आहे. सोलापुरात मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सरकता जिन्याची बाजू चुकली. परिणामी सोलापूरकरांना याचा कोणताच फायदा होताना दिसून येत नाही. सरकता जिना जर पादचारी पुलाच्या प्रवेशाच्या ठिकाणी बसविला असता तर प्रवाशांना जिना चढून येण्याचे कष्ट करावे लागले नसते. 


आतून लिफ्ट असताना जिनाही आतूनच? 
रेल्वे प्रशासनाने चुकीच्या दिशेने सरकता जिना बसविला आहे. पुलावर जाण्यासाठी आतील बाजूस लिफ्ट आहे. असे असताना आतूनच सरकता जिना बसविणे चुकीचे आहे. सरकता जिना हा प्रवेशाच्या बाजूनेच असावा. हा साधा नियमदेखील सोलापूर रेल्वेकडून पाळण्यात आला नाही." प्रकाश गायकवाड, अध्यक्ष, प्रवासी सेवा संस्था 


दिशा बदलावी 
सरकत्या जिन्याची रेल्वेने चुकीची जागा कशी काय निवडली याचे आश्चर्य वाटते. सोलापूर रेल्वे प्रशासनाने तत्काळ आपली चूक स्वीकारून त्याची दिशा बदलावी. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- अश्विन केंकरे, नागरिक 


डीआरएम यांचे मौन 
सरकत्या जिन्यासंदर्भात डीआरएम हितेंद्र मल्होत्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध हाेऊ शकले नाहीत. त्यांना मोबाइलवर संदेश पाठविला. त्यावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...