आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेना नेतृत्वावर केलेल्या टीकेबाबत माफीनामा लिहून देण्यास भाजप खासदार किरीट सोमय्या तयार असून त्याबाबतचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला देण्यात आला आहे.
त्यामुळे विद्यमान खासदार असूनही शिवसेनेच्या विरोधामुळे उमेदवारी अद्याप मिळू न शकलेल्या किरीट सोमय्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. या प्रस्तावाला शिवसेनेकडून अद्याप मान्यता मिळाली नसली तरीही शिवसेना नेतृत्वाची समजूत काढण्यात यश मिळेल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. राज्यातील सत्तेत मोठा भाजप मोठा भाऊ ठरल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यादरम्यानच्या संबंधांत कटुता निर्माण झाली होती. या कालावधीत शिवसेना नेतृत्वावर तोफ डागण्याची एकही संधी न सोडणारे ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना आता उद्धव ठाकरेंच्या मिनतवाऱ्या कराव्या लागत आहेत. ‘चोरांचे सरदार’, ‘महापालिकेतील माफिया’ यासारख्या शेलक्या विशेषणांचा वापर करत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका शिवसैनिकांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. परिणामी युतीची घोषणा झाल्यानंतर संधी साधत शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध केला. शिवसेनेशी मिळतेजुळते घेण्याच्या धोरणामुळे भाजप नेतृत्वानेही सुरुवातीच्या काळात किरीट सोमय्यांचा विषय युतीच्या अजेंड्यावर येऊ दिला नाही. मात्र, आता या उमेदवारीला शिवसेनेचा हिरवा कंदील मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शिवसेना नेतृत्वावर टीका केल्याचे प्रायश्चित्त म्हणून किरीट सोमय्या लेखी माफीनामा लिहून देतील, मात्र आता त्यांच्यावरील राग सोडा, असा प्रस्ताव भाजपच्या वतीने शिवसेना नेतृत्वाला देण्यात आल्याचे समजते. यावर अद्याप जरी शिवसेनेने निर्णय घेतला नसला तरीही सोमय्यांच्या माफीनाम्यावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता भाजपच्या एका बड्या नेत्याने “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली आहे.
आपण सोमय्यांच्या मुद्द्यावर ठाकरेंची समजूत घालू शकू याबाबत भाजप नेत्यांना आधीपासून विश्वास होता, म्हणूनच अद्याप ईशान्य मुंबईतील उमेदवारी जाहीर केली नाही. इतराला उमेदवारी द्यायची असती, तर एव्हाना घोषणाही झाली असती, असे सूचक विधान या नेत्याने केले.
छेडा मातोश्रीवर, चिंतेत वाढ
काँग्रेसमधून नुकतेच भाजपत परतलेले प्रवीण छेडा यांनी बुधवारी सायंकाळी “मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. छेडा हे ईशान्य मुंबई मतदारसंघातील घाटकोपरचे माजी नगरसेवक असून ते गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचे समर्थक आहेत. सोमय्यांचा ऐनवेळचा पर्याय म्हणून त्यांना भाजपत पुनर्प्रवेश दिला असून त्यांच्या मातोश्री वारीमुळे सोमय्यांच्या अडचणी वाढू शकतात.
अंतुलेंचे पुत्र नावेद सेनेत
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद यांनी बुधवारी “मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी माध्यमांनी सोमय्यांच्या उमेदवारीला असलेल्या आक्षेपाबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले. त्यावर, हा सोमय्या व शिवसैनिकांदरम्यानचा विषय असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास तरी सोमय्यांवर टांगती तलवार आहेच.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.