आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somanath Deshmane's Artical On Mother Father Love

माता-पित्याचे ऋण जाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या कुटुंबात सात्त्विक वृत्तीची, समजूतदार आणि आज्ञाधारक मुलं निपजतात त्या कुटुंबाचा सगळ्यांना हेवा वाटत असतो. कोणतेही मूल मुळातच चांगले किंवा वाईट विचार घेऊन जन्माला येत नसते तर त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्यावर होणा-या संस्कारावर, त्याला लाभणा-या सहवासावर त्याची जडण-घडण होत असते. मुलांच्या घडण्या-बिघडण्याला प्रामुख्याने माता-पिताच कारणीभूत असतात. लहानपणी फाजील लाड आणि तरुणपणी अनिर्बंध स्वातंत्र्य मिळाले की मुलं हमखास बिघडतात. विठोबा आणि रखमा या धनिक जोडप्याला उतारवयात दोन पुत्ररत्न प्राप्त झाले. असा आनंद काही औरच असतो. त्या आनंदात गावजेवण दिले. मुलांना लाडा-कोडात वाढवले. त्यांना शाळेत घातलं, पण एकाने दहावीचा उंबरठा गाठला तर दुस-याने पाचव्या इयत्तेनंतर शाळा सोडली. चाराचे आठ करून दिले. घरात नातवंडं रांगू लागली आणि घरादारांच्या वाटणीची मागणी होऊ लागली. विठोबांनी समसमान वाटणी करून दोन्ही मुलांना देऊन टाकली.
स्वत:कडे काहीच ठेवले नाही. वाड्याच्या मधोमध भिंत घालून एका घराची दोन घरे झाली. बाप थोरल्याकडे आणि आई धाकट्याकडे अशी फाळणी झाली. थोरल्याच्या दारात उदासपणे बसलेल्या नव-याला पाहून धाकट्याच्या दाराआडून बायको विचारायची, घरात कुणी नाही. तुम्हाला एक कप चहा आणून देऊ का ? दोघांचेही डोळे ओले व्हायचे. रखमाक्का निघून गेल्यानंतर विठुतात्या सैरभैर झाले. जोडीदाराच्या निधनामुळे आलेला एकटेपणा नैराश्य निर्माण करतो. काही दिवसांतच विठुतात्या रखमाक्काच्या भेटीसाठी निघून गेले. दोघेही देवाघरी गेल्यानंतर मुलांना आई-बापाची किंमत कळली. आपल्या आई-वडिलांना ज्या नावाने म्हणजे ‘आक्का -तात्या’ म्हणून बोलत होतो तशा नावाने मुलांना बोलावू लागली. ज्यांना जिवंतपणी आई-वडिलांची किंमत कळली नाही, त्यांना आता त्यांचे मोल उमजले. अशी कृतघ्न संतती जन्मली, हा त्या आई-बापांचा नव्हे तर त्या मुलांचाच दोष.