आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : राजकारणाचे अनेकांना आकर्षण असते. म्हणूनच केवळ वर्षानुवर्षे राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्तेच नव्हे तर नाेकरी- व्यवसायात असलेले इच्छूकही दरवेळी राजकारणात नशिब आजमावून पाहात असतात. यंदाच्या निवडणुकीतही मुख्यमंत्र्यांचे स्वीय्य सहायक, अनेक डाॅक्टर, वकिल, पाेलिस अधिकारी नाेकरीच्या जबाबदारीतून मुक्त हाेत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. त्यामुळे ही निवडणुकीची चुरस आणखीच वाढण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक नाेकरी साेडून औशात आजमावताहेत नशीब
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार सरकारी नोकरी सोडून लातूरच्या औशातून निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्याविरुद्ध पवार यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. पवार यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे. यामुळेच ते जेव्हापासून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक झाले तेव्हापासून त्यांनी महिन्याला व आठवड्यातून दोन दिवस लातूर, औशात थांबून लोकांची कामे करणे सुरू केले होते. निवडणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार करणे, हा त्यामागचा हेतू होता.
पोलिसी सेवेतून निवृत्ती घेत प्रदीप शर्मा आणि राजेश पाडवी मैदानात
तीनशेहून अधिक अट्टल बदमाशांचे एन्काउंटर करणारे पाेलिस अधिकारी प्रदीप शर्मा सेवानिवृत्ती घेऊन पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेने त्यांना नालासोपारा- वसई- विरार भागातील दबंग नेते म्हणवले जाणारे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहे. शर्मा यांच्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्याच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव शहादा मतदारसंघातून सहायक पोलिस निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन राजेश पाडवी निवडणूक लढवत आहेत. पाडवी भाजपकडून मैदानात उतरले आहेत.
जनतेचा त्रास पाहून पत्रकारिता सोडून माेहिते निवडणुकीच्या आखाड्यात
मुंबईतील पत्रकार युवराज मोहिते गोरेगाव येथून राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याविरुद्ध कॉंग्रेसकडून उमेदवार आहेत. पत्रकारिता करताना मोहिते यांनी जनतेच्या समस्या, अडचणी जवळून पाहिल्या. परंतु, त्या सुटत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मोहिते यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. (पॉलिटिकल सायन्स) केलेले आहे. सामाजिक समस्यांसंबंधीचे मुद्दे त्यांनी अनेक वर्षांपासून पत्रकार म्हणून लावून धरलेले आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आता लोकप्रतिनिधी बनण्यासाठी ते पहिल्यांदा प्रयत्न करत आहेत.
डाॅक्टरकी साेडून अनिकेत देशमुख उतरले राजकारणाच्या प्रॅक्टिसमध्ये
सांगाेला (जि. साेलापूर) मतदारसंघातून ११ वेळा आमदारकी भूषविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या जागी आता त्यांचे डाॅक्टर नातू अनिकेत हे निवडणूक लढवत आहेत. मुंबईच्या जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झालेले डाॅ. अनिकेत कालपर्यंत पुण्यात वैद्यकीय सेवा देत हाेते. लहानपणापासूनच ते आजाेबा गणपतरावांचे काम पाहात आलेत. त्यांच्यावर पुराेगामी, मार्क्सच्या विचारांचा प्रभाव आहे. अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांच्या समर्थकांच्या आग्रहास्तव अनिकेत राजकारणात प्रॅक्टीस करु पाहात आहेत
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.