आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून मीरा एखंडे मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : धनंजय मुंडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- ग्रामीण रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी प्रसूतीदरम्यान नवजात बाळासह विवाहिता मीरा एखंडे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉ. साबळे यांच्यासह स्टाफ जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. डॉ. साबळे यांना पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा वरदहस्त असून हे संवेदनशील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी माजलगावात पत्रकार परिषदेत केला. 

 

मीरा एखंडे व तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणी दखल घेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यांनी मंगळवारी एखंडे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. घडलेला प्रकार त्यांच्याकडून समजून घेतला. त्यानंतर मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली. मीरा एखंडे या प्रसूतीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संपूर्ण माहिती असताना देखील डॉक्टरांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तिचा व बाळाचा मृत्यू झाला. या नंतर बळजबरीने तिच्या पतीच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन मध्यरात्री शवविच्छेदन करून डॉ. साबळे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. साबळे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना मराठवाड्यातून हद्दपार करण्यात यावे. एखंडे कुटुंबीयांना राज्य शासनाने ५० लाख रुपयांची मदत द्यावी यासाठी आजच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल न घेतल्यास येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशाराही मुंडेंनी दिला. पत्रकार परिषदेस माजी मंत्री प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक, भानुदास डक, जयदत्त नरवडे , मनोज फरके, चंद्रकांत शेजूळ उपस्थित होते. 

 

डॉ. साबळेंना दोन पिस्तुलांची गरज काय ? 
वैद्यकीय पेशा हा सेवाभावी असून यात गुन्हेगारीला कुठेही थारा नसतो. डॉ. साबळे हे स्वतः एक सरकारी अधिकारी असून ग्रामीण रुग्णालयात सेवाधर्म निभावतात असताना त्यांना दोन दोन पिस्तुलांची आवश्यकता का भासली ? या पिस्तुलांच्या आणि गुंडांच्या जोरावर एखंडे कुटुंबीयांवर दहशत निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यांचे पिस्तुलांचे परवाने रद्द करून त्यांना हद्दपार करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

बातम्या आणखी आहेत...