आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"शालोम' संदर्भात काही निरीक्षणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य अकादमीने येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कवितांचा "शालोम " या नावाने एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. कवी नारायण लाळे यांनी या संग्रहाचे संपादन केले आहे. एकूण ८४ कवी, कवयित्रींच्या कवितांचा यात समावेश असून ख्रिश्चनधर्मीय मराठी कवींसोबत धर्मांतर केलेले व काही ख्रिस्तेतर कवींचाही यात समावेश आहे.
 
 
साहित्य अकादमीने येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कवितांचा “शालोम’  या नावाने एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहाचे कवी नारायण लाळे यांनी संपादन केले आहे. एकूण ८४ कवी, कवयित्रींच्या कवितांचा यात समावेश असून ख्रिश्चनधर्मीय मराठी कवींसोबत धर्मांतर केलेले व काही ख्रिस्तेतर कवींचाही यात समावेश आहे.
 
 
“शालोम” हा हिब्रू  शब्द असून त्याचा अर्थ शांतता असा आहे. पण खऱ्या अर्थाने तो परिपूर्णता म्हणूनही वापरता येतो. दया, क्षमा, शांती, करुणा या मानवी मूल्ये जोपासणाऱ्या “देवाचा पुत्र” असलेल्या येशू ख्रिस्तासंबंधीच्या कवितासंग्रहाला “शालोम’ हे शीर्षक उचितच आहे. संपादक लाळे यांची प्रस्तावना अभ्यासपूर्ण असून त्यातून त्यांची मेहनत स्पष्ट दिसून येते. प्रस्तावनेत त्यांनी एकूण ख्रिस्ती साहित्याचा थोडक्यात आढावा घेऊन इतिहासाचे दाखले नमूद केले आहेत. 
 
 
इ.. स. १६१६ साली फादर स्टीफन्स यांनी १०,९६२ ओव्यांचे “ख्रिस्तपुराण’ हे पुस्तक लिहिले. सोळाव्या शतकात फादर आंतुनिया साल्दाज आणि फादर जुवांव पेत्रोझ यांनी मराठीत काव्यलेखन केले. एकोणिसाव्या शतकात रेव्हरंड हरिपंत खिस्ती यांनी ओवीबद्ध “ख्रिस्तचरित्र’ लिहिले असा इतिहास कथन करून त्यांनी आतापर्यंत येशू ख्रिस्तावर लिहिल्या गेलेल्या कवितांचा धावता आढावा घेतला आहे.
 
 
मराठी साहित्याने ख्रिस्ती साहित्याकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे विस्तृत परंतु तुटक स्वरूपात का होईना, शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला, असे लाळे यांचे म्हणणे आहे. ते तितकेसे वस्तुस्थितीला धरून नाही. माझ्या मते, एका विशिष्ट धर्माचे मग ते हिंदू, मुस्लिम,बौद्ध, शीख असो वा पारसी धर्माचे, ते साहित्य धर्माभोवतीच गुंजी घालत असल्याने स्तुतीपर अथवा प्रवचनाच्या पातळीवरच राहते. अशा प्रकारचे धार्मिक साहित्य लिहिणारे मोजकेच असल्याने त्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत नाही. उलट एखाद्या विशिष्ट भाषेतील अथवा मोठ्या समूहाचे साहित्य तुलनेने सकस, प्रगल्भ आणि विपुल प्रमाणात असते. मग ते इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली वा अन्य भाषेतील असो. कारण एकाच भाषेमध्ये वेगवेगळ्या धर्माचे कवी, साहित्यिक असल्याने ते ती भाषा अधिक समृद्ध करीत असतात. मोठ्या समुहाचेही तसेच असते. युरोपात अश्वेतांचे “ब्लॅक लिटरेचर” व मराठीत “ दलित साहित्य”,  “आदिवासी साहित्य”, कामगार तसेच भटक्या विमुक्तांचे साहित्य ही ठळक उदाहरणे आहेत. त्या मानाने “ख्रिस्ती साहित्या’चा म्हणावा तितका विकास झालेला नाही. 
 
 
प्रस्तुत संग्रहातही नारायण वामन टिळक, भा.कृ. उजगरे, ना.वा. गोखले, निरंजन उजगरे, जोसेफ तुस्कानो, सिसिलिया कार्व्हालो, सायमन मार्टिन, सबिना फोस यांच्यापुढे ख्रिस्ती कविता समर्थपणे सरकलेली नाही हे सत्य नाकारून चालणार नाही. ख्रिस्ती धर्मीय लेखकांनी धर्मविषयक मोठ्या प्रमाणावर गद्य लेखन केलेले आहे. मात्र, कवितेच्या प्रांतात बोंब आहे. साहित्य हे मानवी जीवनाला अधिक सकस आणि समृद्ध करीत असते. ते विशिष्ट जाती धर्माच्या, भाषा, प्रांत, पंथाच्या पलीकडे विचार करते. अलौकिक बाबींपेक्षा लौकिक परंपरेची साहित्य जपणूक करीत असते. त्यात शाश्वत मूल्यांवर व मानवी भावनांवर अधिक भर असतो. जीवनमूल्ये व त्यातून प्रकट होणारे सामाजिक संदर्भ साहित्याला वैश्विक पातळीवर नेतात. “शालोम’ मधील जुन्या काळातील फादर थॉमस स्टीफन, हेन्री बॅलेन्टाईन, कृष्ण रत्न सांगळे,  पंडिता रमाबाई, नारायण टिळक, ह. गो. केळकर, दे.ना.टिळक आदींच्या पठडीतल्या कविता अभ्यास म्हणून ठिक. पण त्या आजच्या काळाला लागू पडतीलच असे नाही. स्तुतिपर लिहिलेल्या या कविता,गीतांमधले काव्यगुणही तपासायला हवे होते असे वाटते. संग्रहात कुसुमाग्रज, वा. रा. कांत, बाबा आमटे, विंदा करंदीकर, सदानंद रेगे, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, अरुण कोल्हटकर, सुधाकर गायधनी, निरंजन उजगरे या श्रेष्ठ कवींच्याही कविता आहेत. या कविता नक्कीच वाचनीय आहेत. तर अनुपमा उजगरे, सिसिलिया कार्व्हालो, फादर दिब्रोतो, सायमन मार्टिन आदी ख्रिश्चन धर्मीय कवींच्या कविता अप्रतिम आहेत. तसेच, विरा राठोड, अजय कांडर, लोकनाथ यशवंत या मोजक्याच ख्रिस्तीतर कवींच्या कविता विषयाला न्याय देणाऱ्या आणि काव्यगुण जोपासलेल्या आहेत. मात्र, एक गोष्ट येथे खेदाने नमूद करावीशी वाटते की,  केवळ या संग्रहात आपली कविता छापून यावी या अट्टाहासापोटी काही कवींनी ऐनवेळी कविता पाडली आहे की काय अशी रास्त शंका येते. क्रूस, खिळे, चर्च, प्रभो...यांना क्षमा कर हेच नेहमीचे पारंपरिक शब्द वापरून कविता रचल्याचे जाणवते. या चार बाबींपलीकडे येशू ख्रिस्त आणि त्याच्या धर्माची शिकवण, मूल्ये,  बायबल,  जुना- नवा करार आहेत हेच या कवींना माहीत नसल्याची वाजवी शंका येते. एका कवितेत तर हिंदू, इस्लाम व बौद्ध धर्माच्या कडव्यांसह ख्रिस्ती धर्माचेही एक कडवे असल्याने त्या कवितेलाही ख्रिस्ती कविता म्हणून कुंकू लावलेले आहे. अशा काही उणिवा संग्रहात आहेत. परंतु लाळे यांनी खूप मेहनतीने गोळा केलेल्या इतक्याच कविता त्यांना मिळाल्या असाव्यात. नाहीतरी विशिष्ट धर्माच्या साहित्यात सकस कवितांची वानवाच असते. त्यांनी अन्य भारतीय भाषेतील कवी निवडले असते तर ही उणीव भरून निघाली असती आणि वाचकाला येशू ख्रिस्ताचे सर्वांग दर्शन घडले असते, असे माझे प्रामाणिक मत आहे.
 

साहित्य अकादमी या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या संस्थेने प्रकाशित केलेल्या या देखण्या व सुबक पुस्तकाला सरदार जाधव यांचे दिलखेच मुखपृष्ठ लाभले आहे. २०६ पानी या पुस्तकातील नारायण लाळे यांची २३ पानी  प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना असल्याने तरी हा संग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा. 
{शालोम : येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता
{संपादक : नारायण लाळे {प्रकाशक : साहित्य अकादमी
{पृष्ठं :२०६ {किंमत : २७५ रुपये
लेखकाचा संपर्क - ९०८२६०२८०९