आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी तरी आहे अॅपमध्ये...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्त्रायली कंपनीचे तंत्रज्ञान वापरून व्हॉट्स अॅपद्वारे भारतातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांसह जगभरातील शेकडो जणांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या वृत्तानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्या खासगी माहितीचे संरक्षण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करतानाच व्हॉट्स अॅपकडे खुलासा मागितला आहे. कोणतेही अॅप विशेषत: फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आदी समाज माध्यमांच्या वापरकर्त्यांची माहिती, तपशील गोपनीयच राहायला हवा. मात्र, तो फुटला ही अत्यंत गंभीर बाब आहे. बरं, हे आपल्याला समजले केव्हा, तर त्या कंपनीने अमेरिकेतील एका न्यायालयात त्याबाबत सांगितल्यावर, हे तर अधिकच चिंताजनक आहे. एनएसओ या इस्रायली कंपनीने भारतातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांसह १४०० जणांच्या स्मार्ट फोनमध्ये घुसखोरी केल्याची माहिती व्हॉट्स अॅप सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीने अमेरिकेच्या न्यायालयात दिली. एनएसओ कंपनीने पेगॅसस नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे मोबाइलमध्ये घुसखोरी केली व व्हॉट्स अॅपमार्फत संदेश, संभाषण ऐकणे, फोटो पाहणे याद्वारे त्या वापरकर्त्यावर पाळत ठेवली. त्या त्या देशाच्या सुरक्षेसाठी हे तंत्रज्ञान तेथील सरकारांनाच आम्ही देतो, असा खुलासाही एनएसओने केला आहे. त्यामुळे त्या त्या सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे आता प्रथमच घडले आहे, असेही नाही. २०१५ चे अॅनालिटिका प्रकरण आणि २०१६ ची अमेरिकेतील निवडणूक ही अशा स्वरूपाच्या सायबर पाळतशाहीची दोन ठसठशीत उदाहरणे. ब्रिटनमधील ब्रेग्झिट जनमत चाचणीत अॅनालिटिकाच्या नाविन्यपूर्ण पॉलिटिकल मार्केटिंगने अशी पाळत ठेऊन व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करता येतो, हे सिद्ध केले.  अमेरिकेतील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशाच तंत्राचा वापर केला होता. या दोन्ही जनमत चाचण्यांत एकाच कंपनीचे तंत्र वापरले होते. त्यामुळे काय घडले, हा इतिहास सर्वांसमोर आहे. हे तंत्र विकसित करणाऱ्या केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने सॉफ्टवेअरद्वारे फेसबुक वापरकर्त्यांच्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला. त्यांच्या मते, एखाद्याच्या ७० लाइक्सवरून त्याच्या जवळच्या व्यक्तीलाही माहिती नसतील इतके त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कळतात, तर १०० लाइक्सवरून त्याच्या आई-वडिलांनाही कळाले नसेल इतके समजते. आता नव्याने समोर आलेली इस्रायली कंपनीची व्हॉट्स अॅप घुसखोरी हा सरळसरळ व्यक्तिस्वातंत्र्य आणि खासगीपणावरचा सायबर हल्ला आहे. एखादा आपल्या घरात बसून काय करतो आहे, त्याचे घर कसे आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याचे बँक खाते कोठे आहे, त्याचे क्षेत्र कोणते आहे, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, अशा कितीतरी खासगी गोष्टी नकळत कोणीतरी पाहते आहे, त्यावर पाळत ठेवते आहे, हे चित्र आता प्रत्यक्षात अनुभवास येत आहे. भारताने हे तंत्र निष्फळ ठर‌वण्याच्या दृष्टीने वेळीच पावले टाकण्याची गरज आहे. अन्यथा, 'कोणीतरी आहे आपल्या अॅपमध्ये' या भीतीने सर्वसामान्यांची गाळण उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

बातम्या आणखी आहेत...