आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसी का हुक्म है ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला प्रेम करण्यासाठी आपल्या मनासारखे वागणारे, आपल्यासमोर सतत शेपटी हलवत उभे राहणारे पाळीव प्राणी हवे असतात. पण सारी माणसं अशी शेपटी हलवणारी नसतात. ती प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं वागत नाहीत. कधी ते आपलं ऐकत नाहीत, कधी ते आपला विरोधदेखील करतात. अशा वेळी आपण कधी खराखुरा, कधी व्हर्च्युअल ठोंबा उचलतो आणि त्यांच्या वर्मी घालतो.    खिडकीचा पडदा बाजूला सारला आणि काचेची तावदानं हलकेच सरकवत दूर केली. डोळे चोळत बाहेर पाह्यलं… नुकत्याच उगवलेल्या सकाळीचा एक सांगता येऊ नये असा गंध चहूअंगांनी शरीरात शिरला. एकदम फ्रेश वाटलं आणि मग कुतुहलानं माझ्या घरासमोरून चाललेल्या लोकांकडे नव्या नजरेनं पाहत राह्यलो, किती तरी वेळ. टी शर्ट - बर्म्युडा, स्पोर्ट शूज अशा अवतारात अनेक जण या काळातल्या सुप्रसिद्ध ‘मॉर्निंग वॉक'ला निघाले होते. तेवढ्यात एक आवाज कानावर पडला, "नो टॉमी, नो ! नॉट ॲट धिस प्लेस…!’ मी एकदम आवाजाच्या दिशेने वळून पाह्यलं. एक पन्नाशी-साठीच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या मॉड बाई आपल्या कुत्र्याशी बोलत होत्या. अल्सेशियन किंवा अशाच कुठल्या तरी परदेशी जातीचा तो कुत्रा असावा. कुत्रा कुठलाही असला तरी सकाळच्या अशा प्रसन्न प्रहरी बाहेर पडल्यावर त्याला मुक्तीचा आनंद घेऊ वाटणं अगदी स्वाभाविक! त्यामुळं त्यानं एका झाडाच्या बुंध्यावर तंगडी वर केलेली, पण बाईंनी हुकूम दिलेला, " नो ऽ नॉट ॲट धिस प्लेस !’ आणि आश्चर्य म्हणजे तो कार्यकर्ताही अगदी आज्ञाधारक, त्यानं आपली उंचावलेली तंगडी खाली केली आणि आपल्या मालकिणीच्या पायाला अंग घासत शांतपणे निघाला. मी निव्वळ थक्क! एवढी आज्ञाधारक तर आपली पोटची पोरंसुद्धा नसतात. माणसं कुत्री, मांजर असे पाळीव प्राणी का पाळत असावीत? खरं तर त्याला अनेक कारणं आहेत. आपल्या शेती संस्कृतीमध्ये तर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा होताच. पण आजकाल विशेषतः शहरांमध्ये आक्रसत झालेली घरं, आलेला एकटेपणा, नात्यानात्यांतील बेबनाव आणि आपलंही आपल्याशी न पटणं हे इतकं वाढत चाललंय की एखादा टॉमी, एखादी मनी आपल्यासाठी आवश्यकच झालीय. माणसं आपल्या एकटेपणावरील उपाय म्हणून आपल्या पेट्सकडे पाहतात, कळत- नकळत ! पाळीव कुत्र्या- मांजरांची गोष्ट निघाली की मला शीतल आठवते. डॉक्टर असणारी शीतल दोन -तीन वर्षे माझी सहकारी होती. हळवी आणि संवेदनशील शीतलला कुत्र्या- मांजरांचा इतका लळा की एखाद्या प्रेमळ आईसारखी ती घरातलं मांजर कुरवाळत "हिची दोन्ही बाळंतपणं मी माझ्या मांडीवर केलीयेत,’ असं सांगायची तेव्हा तिच्या मनीला पाहून माहेरवाशीण पोरीची आठवण यायची. पण सगळ्यांना पाळीव प्राण्यांवर इतकं प्रेम करता येतं का? त्यांचा इतका लळा लागू शकतो का? परवा बोलता बोलता माझा एक मित्र म्हणाला, "आजकाल कुणीच कुणाचं ऐकत नसताना, असं बस म्हटलं की बसणारं, ‘टॉमी ब्रिंग दॅट बॉल', असं म्हणताच दुडूदुडू धावत बॉल आणणारं कुत्र्याचं किंवा मांजराचं आज्ञाधारक पिल्लू बरं वाटतं, अवतीभवती !’    त्याच्या त्या वाक्यानिशी मला व. पु. काळेंच्या "नॉट सो स्ट्रेंज' कथेची आठवण झाली. गोष्ट म्हटलं तर अगदी साधी आणि म्हटलं तर खूप काही सांगणारी. बायकोने घरात मांजर पाळलेलं आहे. तिचं खूप लाडकं मांजर आहे ते. ती जेवायला बसली की ती मांजरालाही घेऊन बसायची. त्यालाही एका वाटीत दूध-भाकर कुस्करून द्यायची. पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. त्यात उघडं दिसेल त्या भांड्यात, पातेल्यात तोंड घालायची त्या मांजराची सवय. एकदा असं होतं की, नवरा जेवायला बसलेला आणि तशात ते मांजर त्याच्या ताटात तोंड घालतं, नवरा इतका चिडतो की शेजारी पडलेला ठोंबा तो रागारागाने मांजराच्या डोक्यात घालतो. डोक्याला जोराचा मार बसल्याने ते मांजर बराच काळ निपचित पडून राहतं, घाव वर्मी लागल्यानं ते गेलं की काय असं वाटत असतानाच ते अचानक अंग झटकत उठून बसतं आणि नवऱ्याकडे हसून बघतं आणि चक्क "शॉरी यार, मी मगाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. आदत से मजबूर. क्या करे.. पण पुन्हा नाही होणार असं.' असं माणसासारखं बोलतं. नवरा वेडा व्हायचाच काय तो बाकी असतो. मांजर चक्क माणसासारखं बोलतंय. त्यानंतर ते मांजर इतकं नम्र ,आज्ञाधारक  होतं की त्याचं नाव ते. ताटात तोंड घालणे तर सोडा पण दारात पडलेले पेपर आणून दे, त्याचा टीपॉयवरला चष्मा आणून दे, अशी कामंही ते करी लागतं. मग काय विचारता, त्याची आणि त्या नवऱ्याची इतकी गट्टी जमते की ऑफिसमधून आल्याबरोबर मांजर दिसलं नाही तर तो अस्वस्थ होई. "अग, मन्या दिसतं नाय ग कुठं,’ तो बायकोला विचारत राही. असेच काही दिवस गेल्यावर, एकेदिवशी त्यांच्या सोसायटीच्या दारात बेवारशी कुत्री, मांजरं पकडून घेऊन जाणारी म्युनिसिपाल्टीची व्हॅन येऊन थांबते. मन्या खिडकीतून ती व्हॅन बघतो आणि त्याच्या मनात काय येतं कोण जाणे, पण तो धावत जाऊन त्या व्हॅनमध्ये जाऊन बसतं. नवरा बघतो आणि एकदम हवालदिलच होतो. हातातला पेपर बाजूला टाकत तो मांजरामागे धावतो. मांजर व्हॅनमध्ये निवांत बसलेलं असतं.  नवरा म्हणतो ,"मन्या, अरे इथं या गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस कुत्र्या- मांजरासाठी आहे. " "मला माहीत आहे. पण मला जायचंय आता,’ मांजर बोलतं.  "मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही तुझ्याशिवाय हलत नाही. क्षणभरही तू नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघाला आहेस. प्लीज रे प्लीज उतर,’ तो अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून ते मांजर गोड हसतं आणि म्हणतं, "तू  माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”  "म्हणजे काय शंकाय का तुला?’  "मित्रा, अरे जेव्हा मी माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं, हवं तेव्हा तोंड घालत होतो, तेव्हा मी तुझा नावडता होतो. माझा स्पर्शही तुला नकोसा वाटायचा. अगदी माझ्या जिवावर उठला होतास तू. पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, जसं तुला हवं तसं मी करू लागलो तेव्हा मी तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय? नॉट सो स्ट्रेंज, यार. आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं. जे माणूस आपल्या मनासारखं वागत नाही, त्याला समजून घेणं, त्याच्यावर प्रेम करता येणं ही मोठी गोष्ट आहे.’  आणि बेवारस कुत्री- मांजरं पकडून नेणारी ती व्हॅन हलते.  आपल्याला प्रेम करण्यासाठी आपल्या मनासारखे वागणारे, आपल्यासमोर सतत शेपटी हलवत उभे राहणारे पाळीव प्राणी हवे असतात. पण घरात, रस्त्यावर, फूटपाथवर, एअरपोर्टवर उभी असणारी, वावरणारी सारी माणसं अशी शेपटी हलवणारी नसतात. ती प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं वागत नाहीत. कधी ते आपलं ऐकत नाहीत, कधी ते आपल्याला विरोधदेखील करतात. अशा वेळी आपण कधी खराखुरा, कधी व्हर्च्युअल ठोंबा उचलतो आणि त्यांच्या वर्मी घालतो. कारण आपण प्रेम त्यांच्यावर करत नसतो, आपलं खरं प्रेम असतं स्वतःवर! समोरची व्यक्ती जेव्हा आपल्या मनासारखं वागते तेव्हा आपण प्रफुल्लित होतो कारण तिच्या तशा वागण्याने आपला अहं सुखावलेला असतो, आपण, आपली मूल्ये, आपले विचार याला पाठबळ मिळालेलं असतं, पण जेव्हा याच्या विपरीत होतं तेव्हा मात्र आपण आपली नखं बाहेर काढतो. पाठीचा स्वतःचा कणा असणाऱ्या, खऱ्याखुऱ्या पृष्ठवंशीय लोकांवर आपल्याला अभावानेच प्रेम करता येते. आणि हे घरापासून सरकारी - खासगी ऑफिसात ते राजकारण - समाजकारणापर्यंत हेच सुरू असतं. आपल्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या पोरीला, "तू मला मेलीस आणि आम्ही तुला मेलो,' असे सांगून आपण मोकळे होतो. हेच वेगवेगळ्या पातळीवर होत असते. टीव्ही डिबेट शोमध्ये आपल्याला हवं तसं न बोलणाऱ्यावर टीव्ही ॲँकर किंवा दुसरा पॅनेलिस्ट अंगावर धावून जातो. एखादं हुकूमशाही सरकार विरोध करणाऱ्या अधिकारी, पत्रकारांना, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकतं, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करतं. हे सगळं तेच असतं. आपल्याला बरहुकूम चालणारी माणसं आवडतात. अशा हुकमी प्रेमात आपण पारंगत! जावेद अख्तर यांनी एका कवितेत म्हटलं आहे - किसी का हुक्म है, दरिया की लहरें / ज़रा ये सरकशी कम कर लें, अपनी / हद में ठहरें उभरना, फिर बिखरना, और बिखरकर फिर उभरना / ग़लत है उनका ये हंगामा करना  कुणाला आपलं म्हणण्याकरिता, प्रेम करण्याकरिता आपल्याला आपलेच क्लोन हवे असतात. आणि तरीही आपला दावा असतो की आपण प्रेम करतो. खरंच?  लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६