आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाने सोमनाथदांना पद सोडायला सांगितले, तेव्हा ते म्हणाले होते- अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा नसतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- भारतीय राजकारणाचे ‘दादा’ लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आपल्यातून निघून गेले. सोमनाथदांनी ४ दशकांपर्यंत राजकारण केले. सर्व पक्षांचे नेते त्यांचा सन्मान करत होते एवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. लोकसभा अध्यक्ष म्हणूनही प्रत्येक पक्षाने त्यांची स्तुती केली. स्पष्टवक्तेपणा हे त्याचे कारण. ते पक्षाची विचारसरणी बाजूला सारून बोलत असत. ममता बॅनर्जी आणि तृणमूलची लोकप्रियता वाढत असल्याचा इशारा त्यांनी माकपला दिला होता. त्याच तृणमूलने २०११ मध्ये बंगालमधील माकपचा ३० वर्षे जुना बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.  


२००८ ची घटना. अमेरिकेशी अणुकरार केल्याच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर मनमोहन सरकारने विश्वास मत मिळवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले. पाठिंबा मागे घेतल्यानंतर सोमनाथदांनी अध्यक्षपद सोडावे, अशी माकपची इच्छा होती, पण त्यांच्या मते, अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा नसतो. पक्षहिताला धक्का पोहोचवल्याचा आरोप करत माकपने त्यांची हकालपट्टी केली. पक्षातून हकालपट्टी हा माझ्या जीवनातील सर्वात दु:खाचा क्षण होता, असे सोमनाथदा म्हणत असत. 


सोमनाथदांनी अध्यक्ष होताच सरकारी खर्चातून खासदारांच्या चहापाण्यावर बंदी घातली. खासदारांच्या विदेश दौऱ्यात सहभागी होणाऱ्या कुटुंबीयांचा खर्चही त्यांनीच करावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. एकदा संसदेत विद्यमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘एक देश-एक संस्कृती’वर बोलताना सोमनाथदांचे उदाहरण दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, ‘एक देश-एक संस्कृतीचा परिणाम म्हणजे निर्मलचंद्र या बंगाली ब्राह्मणाने मुलाचे नाव सोमनाथ ठेवले.’ त्या सोमनाथ मंदिराबाबत बोलत होत्या. हे मंदिर गझनीच्या मेहमुदाने पाडले होते.  


सोमनाथदांनी अटलजींना म्हटले होते, तुम्ही म्हणाल तर अध्यक्षपदाचा राजीनामा देतो
२००६ मध्ये भाजपने सोमनाथ चटर्जींवर सभागृहात पक्षपाताचा आरोप करत एक पत्र लिहिले होते. त्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची स्वाक्षरीही होती. त्यावरून अनेक दिवस गोंधळ सुरू होता. त्यानंतर सोमनाथदांनी स्वत: अटलजींना फोन केला आणि पत्रावरील त्यांच्या स्वाक्षरीबद्दल नाराजी व्यक्त केली. लोकसभा अध्यक्ष म्हणून मी सभागृहात भेदभाव करतो, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न वाजपेयी यांना विचारत त्यांनी ‘तसे असेल तर मी आजच पदाचा राजीनामा देतो’, असे म्हटले होते. त्यावर वाजपेयी म्हणाले की, कॉम्रेड, भाजप सदस्य म्हणून मी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. ती केली नसती तर ती पक्षविरोधी भूमिका झाली असती. पण तुम्ही भेदभाव करत नाही, असे मला व्यक्तिश: वाटते. त्यावर सोमनाथदांनी वाजपेयींना विचारले, ‘शिस्तभंग कसा होतो?’ वाजपेयी म्हणाले, ‘तसे असेल तर कम्युनिस्टांना भोजनाचे निमंत्रण द्या आणि मला बोलवा. कॉम्रेड, तसे केले तर तुम्ही भाजपसाठी महत्त्वाची व्यक्ती ठराल.’ हे ऐकून सोमनाथदा हसले, त्यांची नाराजीही दूर झाली. 

 

बातम्या आणखी आहेत...