आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने मोबाइल घेऊन देण्यास नकार दिल्याने रेल्वेखाली झोकून देत एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- स्वत:जवळ दोन महागडे मोबाइल असूनही आणखी एक मोबाइल खरेदी करून देण्यासाठी तरुणाने आईसोबत भांडण केले. मात्र, आईने मोबाइल घेऊन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात थेट धावत्या रेल्वेसमोर झोकून देत तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री 11 वाजता शिव कॉलनी पुलाखाली घडली. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता ओळख पटल्यानंतर त्याचे आईने व कुटुंबियांनी रुग्णालयातच आक्रोश केला.

 

सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर, वय 23, रा.हिराशिवा कॉलनी, खोटेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुमेध हा भालेराव दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या सुमेधजवळ दोन मोबाइल होते. तरी देखील त्याने सोमवारी रात्री आईजवळ आणखी एक मोबाइल घेऊन देण्याचा हट्ट केला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर तो रागातच दुचाकीने (एमएच-19 बीएक्स- 0159) घराबाहेर पडला. यानंतर रात्री 11 वाजता दुचाकी शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वेरुळासमोर उभी करून त्याने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने उपस्टेशन प्रबंधक अरुण देशमुख यांना कळवली होती. देशमुख यांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी विनोद शिंदे, विनोद जाधव हे दोघे घटनास्थळी गेले. त्यांनी छिन्न-विछीन्न अवस्थेतील मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सुमेधची दुचाकी रेल्वेरुळाशेजारी असलेल्या रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आले. या दुचाकीच्या क्रमांकावरुन शिंदे यांनी माहिती मिळवली. मंगळवारी सकाळी साडे वाजता सुमेधचा मित्र रुपेश प्रवीण राणे (रा.नंदनवन कॉलनी) याच्यासह मित्रांनी मृतदेहाची ओळख पटवली. या वेळी सुमेधच्या आईने प्रचंड आक्रोश केला. त्याचे वडील मुंबई येथे राहतात. ते आरपीआयचे (आठवले गट) पदाधिकारी आहेत. तर आई सेवानिवृत्त परिचारिका आहेत. सायंकाळी 6 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. सुमेधच्या मित्रांनीही रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद शिंदे तपास करीत आहेत.

 
एका मोबाइलला इअरफोन लावलेला
आत्महत्येच्या वेळी सुमेधच्या एका मोबाइलला इअरफोन लावलेला होता. त्याचा मृतदेह पूर्णपणे छिन्न-विछिन्न झाला होता. अंगात कपडेदेखील शिल्लक राहिलेले नव्हते. तर मृतदेहापासून सुमारे 30 फूट अंतरावर मोबाइल मिळून आला. या मोबाइलला इअरफोन लावलेला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो मोबाइलवरून कोणाशी तरी बोलत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

महागड्या मोबाइलमुळे ओळख पटण्यास अडचण
सुमेधकडे महागडा मोबाइल होता. या मोबाइलमध्ये अत्याधुनिक प्रकारची लॉक सिस्टीम आहे. त्यामुळे मध्यरात्री त्याचा मोबाइल हाती लागूनही पोलिसांना काही उपयोग झाला नाही. अखेर त्याच्या दुचाकीच्या क्रमांकावरुन नाव निष्पन्न करण्यात आले. पोलिसांनी दुचाकी तपासली असता त्यात दारूच्या दोन बाटल्या मिळून आल्या आहेत.

 

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम
अभियांत्रिकीचे शिक्षण अपूर्ण सोडून सुमेध हा मुंबईत व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नात होता. लग्न करण्याच्या उद्देशाने गेल्या महिन्यात दोन स्थळे आली होते. यंदा त्याचे लग्न करण्याचा कुटुंबियांचा मानस होता. तत्पूर्वी त्याने संतापाच्या भरात आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...