Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | son kill father in dharur

पीक विम्याचे 10 हजार देण्यास नकार; मुलाकडून वडिलांचा खून

प्रतिनिधी | Update - Mar 15, 2019, 10:46 AM IST

शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी

 • son kill father in dharur

  धारूर - पीक विमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केला. दोन महिन्यापूर्वी धारूर येथे घडलेल्या या घटनेत बुधवारी मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पाय घसरून पडल्याने वडिलांच्या डोक्याला इजा झाल्याचा बनाव मुलाने केला होता, मात्र पोलिस तपासात याचे बिंग फुटले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.


  आश्रुबा कारभारी मुंडे (७४, अशोक नगर, धारूर ) असे मृत पित्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी डोक्याला मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरात पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडून डोक्याला चॅनल गेट लागल्याने वडील जखमी झाल्याचे आश्रुबा यांचा मुलगा बलभीम याने त्यावेळी पोलिसांना सांगितले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी आश्रुबा यांचा मृत्यू झाला. परंतु, मृतदेहावरील खुणा पाहून हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा, असा संशय पोलिसांना आला.


  त्यादृष्टीने त्यांनी तपास केला असता आश्रुबा आणि बलभीम यांच्यात अनुदानाच्या रकमेवरून जोरदार वाद सुरू होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता बलभीम यानेच वडिलांचा खून केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


  याप्रकरणी सहा. फौजदार राजाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बलभीम याच्या विरोधात धारूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बलभीमला अटक केले असून गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक कुकलारे हे करत आहेत.


  असा घडला प्रकार
  बलभीम हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. दरम्यान, त्याच्या वडिलांच्या खात्यावर पीक विमा आणि इतर शेतकी अनुदानाचे दहा हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम द्यावी म्हणून बलभीमने वडिलांकडे तगादा लावला होता. २१ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता घरी असताना बाप-लेकात पैशावरून जोरदार भांडण झाले.


  त्यावेळी चिडलेल्या बलभीमने लोखंडी पहार घेऊन वडिलांच्या डोक्यात पाठीमागील बाजूने मारली. वयोवृद्ध आश्रुबा हा वार सहन करू शकले नसल्याने खाली पडले. त्यानंतर घाबरलेल्या बलभीमने वडील पायऱ्यावरून पडून त्यांच्या डोक्याला चॅनल गेट लागल्याचा बनाव रचला. कुटुंबातील इतर सदस्यांनीही याप्रकरणी चुप्पी साधल्याने पोलिसांना तपास करणे अवघड झाले होते.


  पाेलिसांकडून छडा
  सुरुवातीस अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्याचा तपास सहा. राजाराम फौजदार जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे आणि धारूरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दिवंगत अनिलकुमार जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलिस निरीक्षक कुकलारे यांच्या सहकार्याने तपास करून खुनाचा छडा लावला.


  डॉक्टरांचा अभिप्राय महत्त्वाचा
  घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडून अभिप्राय मागितला. घटनास्थळाची भेट आणि शवविच्छेदन यांच्या आधारे आश्रुबा यांच्या डोक्याला लागलेला मार पडल्याने लागला नसून त्यांच्या डोक्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने मारल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. या अभिप्रायानंतर पोलिसांना तपासाची निश्चित दिशा ठरविणे सोपे झाले.

Trending