आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु पिण्यास 'श्रावणबाळ'चे पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, मृतदेह गोठ्यात टाकून आरोपी फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरगाव मंजू- वृद्धापकाळात मुलाचा कोणताही आधार नसल्याने वृद्ध दाम्पत्यांना श्रावणबाळ योजनेतून दरमहा रक्कम मिळत होती. या रकमेवर नशेखोर मुलाचा डोळा होता. त्याने दारू पिण्यासाठी बापाला पैसे मागितले; मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने खाटेवर गाढ झोपेत असलेल्या वृद्ध बापावर मुलाने सबलीने वार करून ठार केले व मृतदेह फरफटत गुरांच्या गोठ्यात नेऊन टाकला व तो फरार झाला. ही घटना कान शिवणी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. 

 

नामदेव सहदेव राऊत (६५ ) असे मृताचे नाव आहे. तर चंदू नामदेव राऊत(३५) असे आरोपी नशेखोर मुलाचे नाव आहे. चंदू हा दारू, गांजा अशा अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याने तो त्यांच्या कुटुंबाचा व आईवडिलांचा सांभाळ करत नव्हता. त्याला आई वडिलांसह घरातील सर्वच कंटाळले होते. मुलगाच सांभाळत नसल्याने उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने निराधारांना ज्या श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळतो, तो चंदूचे वडील नामदेव यांना मिळत होता. महिन्याकाठी बाराशे रुपये मिळत असल्याने याच पैशातून वृद्ध नामदेव राऊत हे नातवांच्या शिक्षणाचाही खर्च करीत होते. तीन महिन्यांची रक्कम नामदेव राऊत यांना मिळाली होती. शुक्रवारी सकाळी मुलगा चंदू याने वडिलांना पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यात आणि वडिलांत वाद झाला. हा राग चंदूने मनात ठेवला होता. जेवन आटोपून घराबाहेर खाटेवर झोपलेल्या वडिलाच्या डोक्यावर सबलीने लागोपाठ वार केले. त्यात वडील नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने वडिलाचा मृतदेह ओढत नेऊन शेजारीच गुरांच्या गोठ्यात टाकून फरार झाला. सकाळी नामदेव यांचा मृतदेह गोठ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी चंदूच्या पत्नीने पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी त्यावरून चंदू विरुद्ध वडिलाच्या खुनाचा आरोप असल्याचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार हरिश गवळी व हेडकॉन्स्टेबल अरुण गोप नारायण यांनी पंचनामा करून तपास सुरु केला आहे. दरम्यान,पैशाकरिता वडिलाचा मुडदा पाडणाऱ्या मुलाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

 

खाटेवरच सबलीने केले लागोपाठ वार, झोपेतच पाडला मुडदा 
शनिवारी घटनास्थळाचा पंचनामा आणि ठशाचे नमुने घेण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन व्हॅन दाखल झाली होती. तसेच आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी श्वान पथकही दाखल झाले होते. 

 

स्कूलव्हॅनमधून आरोपी फरार 
वडिलाचा खून केल्यानंतर मुलाने कोणतीही शंका येऊ दिली नाही. नेहमीप्रमाणे सकाळी मुले ज्या स्कूलव्हॅनने शाळेत जातात, त्याच व्हॅनमध्ये बसून तो बोरगाव पर्यंत आला आणि फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.