Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | son killed his liquor addicted father in latur

दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पित्याचा डोक्यात पहार घालून मुलाकडून खून

प्रतिनिधी, | Update - Jun 07, 2019, 09:09 AM IST

मुलाने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन कबूल केला गुन्हा

  • son killed his liquor addicted father in latur

    लातूर - दररोज दारू पिऊन घरात गोंधळ घालत पत्नीसह कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या वडिलाला कंटाळलेल्या मुलाने वडिलाचा खून केल्याचा प्रकार बुधवारी रात्री लातूरमध्ये घडला. मुलाने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात लोखंडाची पहार घातली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.


    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील संजयनगर भागात राहणारे गोविंद नारायण वाघमारे (४५) यांना काही वर्षांपासून दारूचे व्यसन जडले होते. कोणतेही काम न करणारे गोविंद वाघमारे दिवसभर शहरात फिरत रहायचे आणि रात्री दारू पिऊन घरी यायचे. घरी आल्यानंतर पत्नी बबिता (४०) यांच्याशी काही तरी निमित्ताने भांडण करायचे आणि त्यानंतर हातात येईल त्या वस्तूने मारहाण करायचे. त्यांचे भांडण सोडवायला गेलेल्या शेजारी, नातेवाइकांनाही गोविंद मारहाण करायचे. तसेच भांडणात पडलेल्या मुलांनाही ते मारहाण करायचे. गोविंद यांच्या वागण्याला घरातील सर्वच जण कंटाळले होते. त्यामध्ये त्यांचा मुलगा विठ्ठल याचाही समावेश होता. दोन दिवसांपूर्वीच गोविंद यांनी पत्नी बबिताला जबर मारहाण केली होती. आपल्या डोळ्यासमोर आईला दररोज मार खावा लागत असल्यामुळे विठ्ठल त्रस्त झाला होता. त्यात बुधवारी रात्री गोविंद वाघमारे पुन्हा दारू पिऊन आले आणि त्यांनी पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या विठ्ठलला त्यांनी ढकलून दिले. त्यामुळे रागाच्या भरात विठ्ठलने घरातील लोखंडी पहार वडिलांच्या डोक्यात घातली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो स्वतःच विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने आपल्याकडून वडिलांची हत्या केल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास पोलिस करीत होते. गुरुवारी दुपारी या प्रकरणी मुलावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Trending