आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीत आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणरी घटना, सोन्याचे दागिने देत नसल्याच्या रागात मुलानेच आईला दगडाने ठेचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या साटवली गावात घडली आहे. घरगुती भांडण आणि कर्जबाजारी झालेल्या मुलाला त्याच्या आईने तिचे सोन्याचे दागिने दिले नाही, म्हणून रागाच्या भरात सख्या मुलाने आईला दगडाने ठेचून मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. पण लांजा पोलिसांच्या नजरेतून हा गुन्हेगार सुटला नाही. फातीमा काळसेकर असे दुर्दैवी आईचे नाव आहे, तर मजहर असे निर्दयी मुलाचे नाव आहे.


आई-मुलाचे प्रवित्र नाते मजहर यांनी मातीत मिळवले. काळसेकर यांचा छोटासा संसार होता. फातिमा पती आणि मुलांसोबत राहात होत्या. फातिमा यांचा सर्वात छोटा मुलगा मजहर कर्जबाजारी झाला होता. त्यात मजहरच्या पत्नीशी फातिमा यांचे सतत भांडण व्हायचे. आरडीसी बॅंकेच्या कर्जाचे हप्ते ठकल्याने मजहरने आईकडे तिच्याकडील सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. पण आई मजहरला दागिने देत नव्हती. अखेर संतापलेल्या मजहरने आईचा काटा काढण्याचा कट रचला.


आठवडा बाजारात लांजा इथे गेलेल्या आईला मजहरने वाटेत गाठले आणि मोटारसायकलने तिला साटवली रोडवर निर्जन रस्त्यावर घेऊन आला. तिथे गाडी थांबवून शेजारी उभ्या असलेल्या आईच्या डोक्यात दगड घातला. हा घाव इतका वर्मी होता की फातिमा खाली कोसळल्या. तोच दगड उचलून त्याने फातिमा यांच्या पायावर घातला. चेहरा आणि डोळे दगडाने ठेचून विदृप केले. त्यानंतर जवळ असलेल्या वाड्यातील गवताचा पेंढा आईच्या अंगावर पसरून त्यावर पेट्रोल ओतून त्याने तो जाळून टाकला. यानंतर काहीही न घडल्याच्या आविर्भावात मजहर घरी परतला.


घरच्यांनी फातिमा रात्रीपर्यंत घरी न आल्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर तीन दिवसांनी जळलेल्या अवस्थेत फातिमा यांचा मृतदेह मिळाल्यानंतर लांजा पोलिसांनी सूत्रे हलवून मजहरच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेवून सखोल चौकशी केल्यावर मजहरने हत्येची कबुली दिली. आईची ओळख पटू नये म्हणून मजहरने आईची चप्पल, तिचा चष्मा यांसह तिला जाळून टाकले. ज्या दगडाने मजहरने आईला ठेचून मारले, तो दगड आणि अंगावरील दागिने हस्तगत करण्याच्या दृष्टीने आता पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे.