आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या ऊसतोडणी मजुराचा मुलगा उतरला निवडणुकीच्या फडात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद कामतकर  

सोलापूर - ऊसतोड, बागायतदाराच्या रानामध्ये चाकरी करणाऱ्या विठ्ठल व जिजाबाई यांचा मुलगा राम सातपुते हे साेलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे माजी ज्येष्ठ नेते व आता राष्ट्रवादीकडून उतरलेल्या उत्तम जानकरांचे त्यांना आव्हान आहे.

राम हे शाळा-महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्याकडे वळले. संघाच्या बालसंस्कार वर्गातून त्यांची जडणघडण झाली. राम हे मूळचे धामणगाव (ता. आष्टी, जिल्हा बीड) येथील. विठ्ठल व जिजाबाई सातपुते यांच्या तीन मुलीनंतर रामचा जन्म झाला. वडिलांचा गावाकडे पारंपरिक चप्पल तयार करण्याचा व्यवसाय आहे. आजही त्यांचे गावाकडे दुकान आहे.

माळशिरस तालुक्यातील शंकर कारखान्यासाठी राम यांच्या आई-वडिलांनी अनेक वर्षे ऊसतोड केली. त्यानंतर भांबुर्डे येथील मदने यांच्या शेतामध्ये चाकरी केली. तेव्हापासून राम यांची माळशिरस तालुक्याशी नाळ जुळली. उच्च शिक्षणासाठी राम पुण्यात आले. तेथील विद्यार्थिगृहात राहिले. तिथेच अभाविपच्या संपर्कात आले. संघटनेचे आक्रमक युवा नेतृत्व म्हणून शिक्षण क्षेत्रात लौकिकपात्र झाले. गरिबीचे ग्रामीण चटके भोगलेल्या राम यांना विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नातले गांभीर्य जास्त लवकर उमजत होते. त्यातूनच विविध आंदोलने उभारताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून यशस्वीपणे सोडवून घेताना त्याचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये-युवकांमध्ये प्रस्थापित झाले. 

गेल्याच वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रांत उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती  झाली. त्यानंतर पक्षाने ठरवून दिलेल्या भागात प्रवास करायला सुरुवात केली. ‘उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी मला माळशिरसमधून अर्ज भरण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली,’ असे राम यांनी सांगितले.  
 

नाॅर्थ-ईस्ट अभ्यासाचा विषय  
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात आंदोलन, सामाजिक प्रश्नांचे जागरण या माध्यमातून राम यांनी देशभरात प्रवास केला. युवा मंत्रालयातर्फे द. कोरियात नेतृत्व केले होते. ‘नाॅर्थ-ईस्ट माझ्या अभ्यासाचा विषय आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  ‘थाॅट‌्स आॅन पाकिस्तान’ व डाॅ. संजीव सोनवणे यांचे अहिल्यादेवी यांंच्यावर लिहिलेली पुस्तके मला खूप आवडतात,’ असेही राम म्हणाले.
 

सिंचन, अभ्यास केंद्रावर भर
‘माळशिरसच्या प्रश्नांचा मी अभ्यास केला असून शेती सिंचनाच्या सोयी-सुविधा वाढवण्यावर माझा भर असेल. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे, मुंबईला जावे लागते.  मतदारसंघातच त्यांच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्याचा उद्देश आहे. कुस्ती प्रशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करणे आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र मतदारसंघात आणण्याला माझे विशेष प्राधान्य राहील,’ असे राम सांगतात.