आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने मंगळसूत्र विकून आहाराचा भागवला खर्च; मुलाने पटकावले मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उराशी बाळगलेल्या सोनेरी यशासाठी मुलगा विक्रमची धडपड व मेहनतीला आई लता यांचे सातत्याने पाठबळ लाभत होते, मात्र प्रचंड मेहनत करणाऱ्या मुलाला आवश्यक असणारा खुराक कमी पडत होता. घरातील सारे काही विकूनही हा पुरेसा असा डायट पुरवला जात नव्हता. वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी हा खर्च पन्नास हजारांच्या घरात. त्यामुळे आपण कमी पडल्याची खंत या माउलीच्या मनाला सारखी बोचत होती. अखेर तिने मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी थेट आपले सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रच विकायला काढले. यातून मिळालेल्या पैशातून या माउलीने मुलाला आहार पुरवला. आईच्या या त्यागाला शरीरसौष्ठवपटू विक्रमने रौप्यपदकाची झळाळी दिली. त्याने पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत ५७ व्या ज्युनियर राष्ट्रीय शरीरसौष्ठव (मिस्टर इंडिया) स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्याचे नाव विक्रम जाधव. अशी कामगिरी करणारा तो औरंगाबादचा पहिला खेळाडू ठरला आहे. विक्रमने पदकासाठी गाठलेला हा संघर्षमय प्रवास युवांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.   

 

जम्मू येथील  मिस्टर इंडिया स्पर्धेत विक्रम जाधवला महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने ६० ते ६५ किलो वजन गटात आपले कौशल्य पणास लावले. याच्याच बळावर त्याने रौप्यपदक पटकावून मराठवाड्याचे नाव गाजवले. या कामगिरीने त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य वेधले. या स्पर्धेत महाराष्ट्राचे केवळ ६ खेळाडू आणि स्पर्धेत एकूण ५०० खेळाडू सहभागी झाले होते.   


स्वत:ची दुचाकीही विकली    
शरीरसौष्ठव हा क्रीडा प्रकार अत्यंत मेहनतीचा आहे. त्यासाठी मोठा खर्चही लागतो. मात्र, घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्याला हा खेळ जोपासण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी खुराक हा महत्त्वाचा असतो. मात्र, वाढत्या महागाईमुळे पूर्णपणे आहार मिळवणे कठीण होते. या आव्हानाला सामोरे जाताना सर्वांच्याच नाकीनऊ येते. याच परिस्थितीचा विक्रमाच्याही कुटुंबीयांनी सामना केला. मात्र, त्यांनी कधीही हार पत्करली नाही. वेळप्रसंगी जमेल तशा मदतीतून त्यांनी हा आहार पुरवला. यातूनच  विक्रमने त्याची दुचाकीदेखील विकली. त्यानंतर आहाराचा खर्च भागवला. 

 

वडील घेतात प्रचंड मेहनत :  
विक्रमचे वडील  राजेंद्र हेदेखील कष्ट घेत आहेत. मुलाने पाहिलेेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते विविध ते काम करतात. ते आता आश्रमशाळा चालवतात. यशात आई-वडिलांसह भारताचे सचिव डॉ. संजय मोरे, राजू वरकड, मिस्टर इंडिया जगदीश लाड यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे विक्रमने म्हटले.   

 

उकडलेल्या चिकनवर  १५ दिवस 
विक्रमने जम्मू येथील स्पर्धेपूर्वी १५ दिवस जेवण केले नाही. तो केवळ उकडलेल्या चिकनवर होता. तसेच स्पर्धेच्या दोन दिवस आधीपासून त्याने पाणी पिले नाही. केवळ घसा ओला करण्यासाठी एक चमचा पाणी तोंडात टाकत असे. ते यासाठी की, पाणी न पिल्यामुळे स्पर्धेपर्यंत शरीराच्या नसा फुगतात. त्यामुळे पिळदार शरीर दाखवताना संपूर्ण शरीराचा प्रत्येक आकार दिसून येतो. त्याने न जेवता १० किलो वजन कमी केले.  

 

महिन्याला ५० हजारांचा आहार खर्च 
 विक्रमला महिन्याला आहारावर तब्बल ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. पदवीधर असलेला विक्रम आता ऑनलाइन फिटनेसची ट्रेनिंग देतो. त्यातून त्याचा खर्च निघतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली विदेशी नागरिकदेखील ऑनलाइन सराव करतात. दिवसभरात ३० अंडी, १ किलो चिकन, अर्धा किलो मासे, पालेभाज्या, प्रोटीन, ३ वेळा जेवण असा एका दिवसाचा आहार आहे. तो चिकन मीठ व मसाला न टाकता केवळ शिजवून खातो.  
 
पुढील वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप, आठ तास शरीराला पिळदार करण्यासाठी मेहनत
परभणी येथे मराठवाडा श्री ठरलेल्या विक्रमने अनेक राज्य स्पर्धा गाजवल्या आहेत. तो आता पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तयारीला लागला आहे. शरीरसौष्ठव खेळामध्ये आराम न करता नियोजनबद्ध पद्धतीने कसून व्यायाम करतो. दिवसातील आठ तास तो आपल्या शरीराला पिळदार करण्यासाठी मेहनत घेतो. खर्चासाठी ऑनलाइन ट्रेनिंग व स्वत:ची मेहनत या दोन्ही गोष्टीचा समतोल साधत तो चॅम्पियनशिपचीदेखील तयारी करतोय. या खेळात उतरण्याआधी विक्रमने देशासाठी पदक जिंकायचे हे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने तो पाऊल टाकतोय.

 

बातम्या आणखी आहेत...