आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसन तर नाही लागलंय ना?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियाशिवाय अनेकांना आपल्या संपर्कात राहता येतं, हे आपण विसरलो आहोत. सोशल मीडियाचा योग्य वापर जेवढा आवश्यक आहे त्याचपेक्षा त्यापासून आठवड्यातून किमान एक दिवस दूर राहता येणे जास्त आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात सोशल मीडियापासून एक दिवसही दूर राहणे अनेकांना जमत नाही ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या गोष्टीशिवाय जेव्हा आपण राहू शकत नाही किंवा तिचा वापर अटळ होतो याचा अर्थ त्या कृतीचं, त्या गोष्टीचं आपल्याला व्यसन लागलंय.


सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणींशी, नातेवाइकांशी संपर्क ठेवता येतो. या सर्वांच्या आयुष्यातील घडामोडी सहजपणे कळू शकतात. सोशल मीडियाचा वापर करून नवीन नवीन कौशल्यं शिकता येतात. आपल्या आवडीच्या विषयात अधिक गती मिळवता येते. हे सर्व सोशल मीडियाचे फायदे. हे फायदे करून घेत असतानाच आपण सोशल मीडियाच्या वापरामध्ये या एकंदरीत जाळ्यामध्ये अधिकाधिक गुंतत जातो. ज्या व्यक्ती डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट या क्षेत्रातच काम करतात त्यांना त्यांचे काम पूर्ण करावे लागते. त्यामुळे ही मंडळी सोशल मीडियापासून दूर राहू शकत नाहीत. या मंडळींना सोशल मीडियाचा वापर करताना उद्दिष्टे समोर दिसत असतात. त्या ध्येयाकडे जाण्याकरिता त्यांच्याकडे ठरावीक दिवशी, ठराविक तास असतात आणि ती पूर्ण करणं महत्त्वाचं असतं. थोडक्यात सोशल मीडियावर वेळ वाया  घालवायला त्यांच्याकडे वेळ नसतो. सोशल मीडियाचा घटनांचा खूप विचार करून त्याबाबत दुःखी होण्यासाठीसुद्धा यांच्याकडे वेळ नसतो.


परंतु ज्या व्यक्ती सोशल मीडियाचा वापर व्यवसायाकरता किंवा नोकरी करता करत नाहीत त्यांच्याकरता सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा व किती वेळा सोशल मीडियाचा वापर करायचा याचं काही गणित नसतं. किंबहुना अगदी थोडा वेळ आपण इन्स्टाग्राम बघू या किंवा थोडा वेळ फेसबुकवर काहीतरी वाचू या असं म्हणून अनेक तास कित्येक जण या दोन माध्यमांवर असतात. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांना सोशल मीडिया तरुणाईची खास पसंती आहे. त्यामुळे तुमच्याआमच्या संपर्कात असलेली अनेक तरुण मुलं-मुली, कॉलेजमध्ये जाणारी किंवा हायस्कूलला असणारी मुलंमुली या माध्यमावर दिवसातून सरासरी तीन तासांपेक्षा जास्त वेळ असतात, असे आढळले आहे. दुर्दैवाने हे दोन किंवा तीन तास काही शिकण्याकरता किंवा स्वतःची प्रगती करण्याकरता वापरले जात नाहीत हे अनेकदा आढळते. नुसता टाईमपास किंवा मनोरंजन यापेक्षा या दोन-तीन तासांमध्ये तरुणाई किंवा सोशल मीडियावरची माणसं काय करतात हे एकंदरीतच तपासण्यासारखे आहे.  सोशल मीडियावरचा आपला वावर जेवढा वाढतो तेवढा काळ आपल्याला इतरांच्या आयुष्यातल्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी दिसत असतात. तसा आपण मुद्दाम प्रयत्न करतो. सोशल मीडिया मुळात सगळं काही चढवून, वाढवून किंवा ग्लॅमरस करून दाखवण्याची जागा आहे. किंवा वास्तव आहे ते प्रदर्शित करण्यापेक्षा तीच गोष्ट अधिक आकर्षक आणि नाट्यमय करून सांगितले जाते. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सत्यापेक्षा ग्लॅमर जास्त असतं. थोडक्यात अनेक जण आपली खोटी प्रतिमा तयार करतात. प्रतिमेची पूर्तता करण्याकरिता त्याला आवश्यक असे खाद्य कायम पुरवत असतात.याचा अतिरेक झाला एकमेकांविषयी द्वेष, खोटेपणा, स्वतःविषयीचा न्यूनगंड अशा अनेक भावना मूळ धरतात. सतत दुसऱ्याशी स्पर्धा करणे, इतरांशी तुलना करणे याचा अतिरेक आपल्या निरोगी प्रकृतीकरिता घातक आहे. जी मुलंमुली दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त वेळ इन्स्टाग्राम किंवा इंटरनेटवर असतात त्यांच्यापैकी अनेकांनी मानसिक नैराश्य आणि  मानसिक तणाव जाणवतो हे सांगितले आहे. त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा इतरांनी काय म्हटलं याच्यावर तयार होते, अनेकांच्या मनावर इतरांनी केलेल्या टीकेचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे जास्त वावर असणाऱ्या तरुण मुलांचा आत्मविश्वास अनेकदा कमीच असतो. सोशल मीडियावर होणाऱ्या स्तुतीमुळे किंवा टीकेमुळे तरुण मुलामुलींची स्वतःची प्रतिमा दुभंगलेली असते. हे त्यांच्या मानसिक आरोग्याकरता खूप घातक आहे. आपण कसे दिसतो, व‌‌‌‌जन किती आहे, शरीरयष्टी कशी आहे याविषयी तरुण मुलंमुली जास्त धास्तावलेली असतात. कुठल्याच काळ व गटातली माणसे याला अपवाद नाहीत. अगदी अकराबारा वर्ष वयोगटातली मुलंमुली इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट वापरायला सुरू करतात. अशा वेळी त्यांच्यासमोर सायबर बुलिंगचा धोका अधिक असतो. सोशल मीडियावर अपरिचित लोकांशी संपर्क साधताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. 


एक दिवस आपण आपलं सोशल मीडिया अकाउंट चेक केलं नाही तर आपण खूप काही गमावू, अशी भावना या मुलांच्या आणि तरुणांच्या मनात असते. ही भावना ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा हा मीडिया दोन-तीन तास वा अधिक वेळ वापरणाऱ्या कुणाच्याही मनात यायला वेळ लागत नाही. आपण काहीतरी गमावू ही भावना मनात येणं ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. सोशल मीडिया नव्हता तेव्हाही लोक आनंदाने आपले आयुष्य जगत होते. सोशल मीडियाशिवाय अनेकांना आपल्या संपर्कात राहता येतं, हे आपण विसरलो आहोत. सोशल मीडियाचा योग्य वापर जेवढा आवश्यक आहे त्याचपेक्षा त्यापासून आठवड्यातून किमान एक दिवस दूर राहता येणे जास्त आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात सोशल मीडियापासून एक दिवसही दूर राहणे अनेकांना जमत नाही ही वस्तुस्थिती आहे.  एखाद्या गोष्टीशिवाय जेव्हा आपण राहू शकत नाही किंवा तिचा वापर अटळ होतो याचा अर्थ त्या कृतीचं, त्या गोष्टीचं आपल्याला व्यसन लागलंय. आज हायस्कूल आणि कॉलेजमधल्या तरुण मुलामुलींसमोर सोशल मीडियाचा योग्य वापर हे एक आव्हान आहे. ज्येष्ठ नागरिकसुद्धा एखादा दिवस सोशल मीडियावर गेले नाहीत तर अस्वस्थ होतात. त्यांना दुसरे काही करणे सुचत नाही असे दिसून येते. आठवड्यातला एक दिवस जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर न करता राहू शकत नसाल तर तुम्हाला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे आहे का हे तपासून घ्या. एक दिवसही सोशल मीडियाशिवाय न राहू शकणे म्हणजे सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक आहे. त्यावर लवकरच उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळाकॉलेज, तुमची नोकरी किंवा व्यवसाय अशा सर्व ठिकाणी आठवड्यातून किमान एक दिवसाची तरी सुट्टी असते. त्या सुट्टीमुळे तुमच्या दिनक्रमात बदल होतो. शरीराला आणि मनाला विश्रांती मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. तशीच सुट्टी सोशल मीडियावरसुद्धा एक दिवस तरी घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियापासून प्रयत्नपूर्वक आठवड्यात किमान एक दिवस दूर राहा. दररोज आधीच्या दिवसापेक्षा पाच ते दहा मिनिटे आधीच आपला सोशल मीडियाचा वापर थांबवा. असे पाच ते सहा दिवस केले तरी सातव्या दिवशी किमान एक तास तरी सोशल मीडियापासून दूर राहता येईल, असे अनेकांना आढळेल. जाणीवपूर्वक या एक तासाचे रुपांतर दोन तास, तीन तास करत संपूर्ण एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहणे यामध्ये करणे हिताचे आहे. सोशल मीडिया व्यसन मुक्ती केंद्रामध्ये नाव नोंदवणे आणि योग्य उपचार घेणेसुद्धा काही वेळा गरजेचे ठरू शकते.

- सोनाली जोशी, ह्युस्टन, अमेरिका
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...