आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षांत काय कराल ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे उपयोग, त्याचा वापर करताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक तसंच व्यावसायिक कामासाठी सोशल मीडिया कसा हाताळावा, याशिवाय सोशल मीडिया मॅनेजमेंटमुळे मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी अशा अनेक पैलूंवर आपण आजवर या लेखमालेतून प्रकाश टाकला. सोशल मीडिया मॅनेजमेंट अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी नवीन वर्षाचं नियोजन कसं असावं हे सांगणारा या सदरातला हा समारोपाचा लेख...

 

मासिके, वर्तमानपत्रे यांचे संपादक, तसेच ब्लॉग लिहिणारे जवळजवळ सर्व जण साधारण ऑक्टोबर/नोव्हेंबरपर्यंत पुढील वर्षी कोणती फीचर्स करणार कुठल्या पुरवण्यांमध्ये असतील, कोणते कॉलम असतील याविषयी जुळवाजुळव करतात. त्याकरता लेखन विषय, लेखनप्रकार, लेखक, स्पाॅन्सर्ड प्रकल्प असा विविध पातळीवर त्यांना विचार करावा लागतो. त्याप्रमाणेच सोशल मीडियाचे कॅलेंडरसुद्धा किमान तीन-चार महिने आधीच तयार झालेले असते. हे नियोजन करताना आधीच्या वर्षाच्या सर्व सोशल मीडिया चॅनेल आणि त्यावरील पोस्ट याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विविध सोशल मीडिया मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये हे फीचर उपलब्ध आहे. या अभ्यासामुळे पुढील वर्षातील सोशल मीडिया मॅनेजमेंटला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. 

 

तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट करत असाल, तुमचा स्वतःचा ब्रॅण्ड आहे किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट संबंधित कुठलेही काम तुम्ही करत असाल तर २०१८ संपताना तुमचा २०१९चा डिजिटल मीडिया मॅनेजमेंट वा सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जवळजवळ पूर्ण आराखडा तयार झाला असेल.


चालू वर्षात इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडियापैकी कुठल्या सोशल मीडिया चॅनलमुळे तुम्हाला जास्त नफा झाला, तुम्हाला जास्त चांगला प्रतिसाद मिळाला, कुठल्या प्रकारच्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळाला अशा सर्व याद्या तुमच्यासमोर असतीलच. त्यावरून पुढच्या वर्षासाठी कोणत्या प्रकारच्या पोस्ट, कसे फोटो, कसे व्हिडिओ पोस्ट करायचे याचे नियोजन करता येते. हा डेटा कसा अभ्यासायचा याचे तंत्र तुम्हाला अवगतत नसेल तर तशा पद्धतीची सेवा देणाऱ्या कुणाशीही संपर्क करून तुम्ही आपला डेटा त्यांच्याकडून तपासून घ्या. पुढील वर्षीच्या सोशल मीडिया पोस्ट नियोजन करण्यात आली ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. नियोजन करताना तुम्ही जर हे ध्यानात घेतलं असेल तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे. 

 

सोशल मीडियाचा वापर तुम्ही व्यवसायासाठी किंवा व्यवसाय म्हणून जरी करत नसला, फक्त व्यक्तिगत प्रोफाइलसाठी तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तरीही तुमच्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून अशा पद्धतीचा एक आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील वर्षासाठी थोडे नियोजन करणे आवश्यक आहे. सोशल मीडियाकरता तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देता. त्यामुळे त्या बदल्यात आपल्याला काय मिळते असा विचार जरूर करावा. तुम्ही व्यवसायाकरता जर सोशल मीडिया वापरत असाल तर आपला वावर जास्तच गंभीरपणे घ्यायला हवा. म्हणूनच हे नियोजन फायद्याचे ठरते. 

 

सोशल मीडिया नियोजनाचे प्रमुख निकष
सर्व सोशल मीडिया चॅनेलवरचा दोन ते तीन वर्षांचा डेटा एकत्र करा आणि अभ्यास करा.
गेल्या दोन-तीन वर्षांत तुम्हाला प्रतिसाद देणारा प्रमुख सामाजिक घटक कोणता ते अभ्यासा.
सर्वात जास्त प्रतिसाद देणारे सोशल मीडिया चॅनल कोणते सर्वात कमी प्रतिसाद असणारे सोशल मीडिया चॅनल कोणते ते तपासा. कोणत्या सोशल मीडिया चॅनलला प्राधान्य द्यायचे, कोणत्या प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टला प्राधान्य द्यायचे ते ठरवा. २०१९मध्ये व्हिडिओ कंटेंटला खूप प्राधान्य असेल असे जाणवते आहे. सोशल मीडिया करता किती बजेट आहे, त्याचा आढावा घ्या. गरज पडली तर ते बजेट वाढवा. सोशल मीडिया चॅनेलवर किती वेळा दिवसातून पोस्ट कराव्या आणि किती वाजता त्या कराव्या हे निश्चित करावे. 

 

सोशल मीडियावरील जाहिराती
फेसबुकवरील अल्गोरिदम सतत बदलत असतो. सर्व सोशल मीडियाला हेच लागू आहे. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडियावर पोस्ट करताना अल्गोरिदमकडे लक्ष द्यावे लागते. परंतु पैसे खर्च करून तयार केलेल्या पोस्ट कोणताही सोशल मीडिया डावलू शकत नाही हे ध्यानात असणे गरजेचे आहे. बजेट ठरवताना जाहिरातींवर किती खर्च करणार त्याची तरतूद करणे योग्य ठरेल. फेसबुक अनेकदा तुमच्या मित्रमंडळींच्या पोस्ट तुम्हाला प्रामुख्याने दाखवते. हे जरी खरे असले तरीसुद्धा स्पाॅन्सर्ड पोस्ट, स्पाॅन्सर्ड कंटेंटला फेसबुकवर किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर अशा पोस्टना, जाहिरातींना प्राधान्य असते हे सत्य नाकारून चालणार नाही. गेल्या वर्षीच्या जाहिरातींना कसा प्रतिसाद मिळाला? कोणत्या प्रकारच्या जाहिरातींमधून नफा जास्त झाला, त्याकडे लक्ष द्यावे, पुढच्या वर्षीसुद्धा अशा पद्धतीच्या जाहिरातींचा सोशल मीडियावर जमेल तेवढा जास्त वापर करावा. 

 

प्रभावी व्यक्तिमत्त्व, सेलिब्रिटी मार्केटिंग
जाहिरातींचा वापर करण्याबरोबरच तुम्ही राहता त्या समाजातल्या प्रभावी व्यक्ती, सेलिब्रिटीज, छोट्या छोट्या वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती या सर्वांबरोबर आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्याकरता काम करा. प्रसिद्ध व्यक्तींना द्यायचे मानधन तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल तर त्यांच्या मानाने कमी मानधन मागणाऱ्या परंतु वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय प्रभावी असणाऱ्या व्यक्तींकडे जा. राजकारण, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या सेलिब्रिटीची मानधनाची अपेक्षा नेहमीच जास्त असते. त्यापेक्षा वेगवेगळ्या सामाजिक वर्तुळात प्रभावी असणाऱ्या व्यक्ती, तंत्रज्ञान क्षेत्रातील, सामाजिक संस्थांमधील प्रसिद्ध व्यक्तींना संपर्क करा. त्यांना आपला व्यवसाय आपला ब्रँड किंवा आपली उत्पादनं मार्केटिंग करण्याची विनंती करा. त्यांच्याशी योग्य करार करावा आणि त्यांच्या प्रभावाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यावा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये भरपूर लोकसंग्रह असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. त्यांनासुद्धा तुमच्या उत्पादनांचा, तुमच्या ब्रँडचा त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर उल्लेख करायला सांगा.

 

ग्राहक सेवा, ग्राहकांचा प्रतिसाद आणि त्यांनी घेतलेला आढावा
तुमची उत्पादने ज्यांनी वापरली आहेत त्या व्यक्ती आणि त्यांचा सोशल मीडियावरचा तुम्हाला मिळालेला प्रतिसाद ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारचा यूजर जनरेटेड कंटेंट नेहमीच लक्षवेधी ठरतो. २०१९साठी आपल्या सोशल मीडियाचे नियोजन करताना, ग्राहक सेवा आणि ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद यावर लक्ष केंद्रित कराल, हे ध्यानात असू द्या. तुमची वेबसाइट, तुमची उत्पादनं, तुमचा सोशल मीडिया या सर्व ठिकाणी ग्राहकांना प्रतिसाद देता येईल आणि तो प्रतिसाद तुमच्या सर्व सोशल मीडिया चॅनेलला जोडला जाईल अशी सोय असणे आवश्यक आहे. त्याकरता बदल करणे गरजेचे असतील तर ते करावे लागतील. 

 

सोशल मीडिया चॅनेल्स आणि पोस्ट
जास्तीत जास्त चॅनेलवर तुमचा वावर असू द्यावा. पोस्ट करताना कमी वेळा करायचे ऐवजी जास्तीत जास्त वेळा कराव्या. एका चॅनेलवर ती पोस्ट केलेला कन्टेन्ट दुसऱ्या चॅनेलवर पोस्ट करण्यापेक्षा त्यात थोडे बदल करावे, थोडे फेरफार करावे आणि दुसऱ्या सोशल मीडियावर ते पोस्ट करावे. तुम्हाला काय जमू शकते आणि काय प्रभावी ठरते हे अनुभवाने नक्कीच समजेल. 
तुम्हा सर्वांना सोशल मीडियाच्या प्रभावी वापर करण्याकरता आणि नववर्षाच्या शुभेच्छा!

बातम्या आणखी आहेत...