Home | Magazine | Madhurima | Sonali Joshi writes about senior citizens use social media

ज्येष्ठ नागरिकांची सोय

सोनाली जोशी | Update - Aug 07, 2018, 06:54 AM IST

तरुणांप्रमाणेच इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वापरणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढते आहे.

 • Sonali Joshi writes about senior citizens use social media

  तरुणांप्रमाणेच इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वापरणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. या माध्यमांमुळे त्यांना आपलं एकटेपण वाटून घेण्याचं निमित्त मिळालं आहे. मात्र, या आभासी जगात मित्रमंडळीचं वर्तुळ तयार करण्याआधी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी त्याबद्दल थोडंसं...


  अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अनुपम खेर, शोभा डे ही सर्व मंडळी प्रत्यक्ष आयुष्यात जेवढी सक्रिय आहेत तेवढीच सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत. त्यांच्याच वयाचे तुमच्यापैकी अनेक वाचकही सोशल मीडियावर सहजतेने वावरत असतात. या नव्या माध्यमाशी जुळवून घेताना ते अनेक गोष्टी नव्याने शिकत असतात. भरपूर वेळ आणि सांगण्याची असोशी त्यांच्याकडे असते! सोशल मीडियावर अनेकदा या ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांपेक्षासुद्धा ओसंडून वाहतो असे दिसते.


  एखादी व्यक्ती LOL, इमोजी, थँक्स असे शॉर्ट फॉर्म न वापरता मूळ शब्द वापरते, मोठ्या मोठ्या वाक्यांमध्ये प्रतिसाद लिहिते, आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी याच्या पोस्ट नेहमी शेअर करते; ती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नातेवाईक, नातवंडं आणि मुलांशी संपर्क साधण्याचा प्रमुख हेतू मनात ठेवून ज्येष्ठ नागरिक सोशल मीडियावर येतात. पण बहुसंख्येने त्यांच्यापेक्षा तरुण असणाऱ्या मंडळींमध्ये वावरताना खूप वेळा त्यांना गोंधळल्यासारखे होते. त्यांच्या वयाचा किंवा अनुभवाचा मान न ठेवता विचार न करता त्यांच्या टीका होते किंवा त्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते. असे असले तरी आपल्या जिवलग व्यक्तींकरिता आणि वेळ घालवण्याच्या उद्देशाने, सोबत असावी या उद्देशाने अनेक ज्येष्ठ नागरिक सोशल मीडियावर वावरताना दिसतात. संपर्क, शिक्षण, आणि मनोरंजन या तिन्हीमुळे सोशल मीडियाचा त्यांना फायदा होत असावा, असे वाटते.


  टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रं ही ज्येष्ठ नागरिकांकरिता सहज उपलब्ध असणारी माध्यमं. इंटरनेट आले तरी नियमितपणे कॉम्प्युटरचा वापर करणारे ज्येष्ठ नागरिक त्या मानाने कमी असे समीकरण अनेक वर्षं होते. पण मोबाइल फोनचा वापर जेवढा वाढला तसा तसा ज्येष्ठ नागरिकांचा कल मोबाइलवर वाचन करणे, आलेले मेसेजेस आपल्या मित्रमंडळींना किंवा नातेवाइकांना फॉरवर्ड करणे याकडे जास्त दिसू लागला. या मोबाइलवर वेगवेगळी अॅप्लिकेशन्स वापरताना भारतामध्ये व्हाॅट्सअॅप वापरणारा ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा वर्ग होता.


  आपल्याला जे आवडतं, आपण जे काही वाचलं ते आपल्या वर्तुळामध्ये शेअर करण्याकरता ज्येष्ठ नागरिकांना व्हाॅट्सअॅप खूप सोयीचे होते. थोडक्यात म्हणजे त्यांची आवडती माध्यमं सोशल मीडियाद्वारे त्यांच्या पुढे येऊ शकतात आणि ती वापरायला त्या मानाने सोपी आहेत, हे दोन मुद्दे जसजसे जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिकांना कळले तसा सोशल मीडियाचा वापर ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढला. वाढत्या वयाबरोबर घरातून बाहेर पडणं अवघड होऊ लागलं होतं तसतसा एकटेपणा घालवण्यासाठी त्यांना या माध्यमांची सोबत मिळू लागली. सोशल मीडियामुळे त्यांचा एकटेपणा आभासी का होईना, पण दूर झाला.


  फेसबुक आणि व्हाॅट्सअॅप वापरणारे ज्येष्ठ नागरिक भारतामध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत. तरुण मुलांपेक्षा किंवा एकंदर २० ते ३० या वयोगटातील लोकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक इतर सोशल मीडिया कमी प्रमाणात वापरतात, असे निरीक्षण असले तरी फेसबुक आणि व्हाॅट्सअॅप मात्र ते जास्त संख्येने वापरतात.


  यूट्यूब हे माध्यमही ज्येष्ठ नागरिक खूप प्रमाणात वापरतात. फेसबुक, व्हाॅट्सअॅप आणि यूट्यूब या तीन माध्यमांनी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण केल्या. आपल्याला वर्गमित्र किंवा वर्गमैत्रीण फेसबुकवर सापडू शकते, ही त्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब होती. व्हाॅट्सअॅपमुळे दुसऱ्या गावात, दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या शहरात राहणाऱ्या मित्र वा मैत्रिणीशी किंवा नातेवाइकांशी संपर्क करणे त्यांना अधिक सोपं झालं.


  टीव्हीवर जे सिनेमे बघायचे नसतील किंवा टीव्हीवरच्या मालिका बघायच्या नसतील तर त्याऐवजी त्यांना आवडणारे गाणे बघणे सोशल मीडियामुळे शक्य आहे, हे त्यांना समजले. शिवाय या गोष्टी अजूनही मोठ्या प्रमाणात विनामूल्य उपलब्ध आहेत. ही गोष्ट ज्येष्ठ नागरिकांकरिता खूप महत्त्वाची होती. त्यामुळे यूट्यूबचा वापर ज्येष्ठ नागरिकांनी खूप प्रमाणात केला यात काहीच वावगं नाही. गुगलवर सर्च करून आपल्याला हव्या त्या अनेक गोष्टी शोधता येतात आणि सोशल माध्यमांवर त्या विनामूल्य ऐकता येतात, बघता येतात किंवा वाचता येतात ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप सोयीची होते.


  ज्येष्ठ नागरिक सोशल मीडिया वापराचा ट्रेंड
  मित्र-मैत्रिणी व नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी, पाककृती, आरोग्याची माहिती, सेलिब्रिटींशी संपर्क साधण्याकरिता,यूट्यूबवर बातम्या आणि इतर कार्यक्रम आणि सिनेमे बघण्याकरिता, नवीन माहिती व्यवस्था, एखादी कला किंवा कौशल्य शिकण्याकरिता, फेसबुकवर आवडत्या विषयाच्या चर्चेत सहभागी होण्याकरिता,ट्विटरवर थोडक्यात माहिती मिळवण्याकरिता,इन्स्टाग्रामचा वापर नवीन फॅशन, दागदागिने, कपड्याची माहिती मिळवण्याकरिता.


  ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडियावर घ्यायची काळजी
  खासगी माहिती प्रत्यक्ष ओळखीच्या व्यक्तीशिवाय इतरांना देऊ नका. यामध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती वगैरे आर्थिक बाबीही येतात. अनोळखी व्यक्ती अनेक वेळा गैरफायदा घेण्यासाठीच तुमच्याशी संपर्क करत आहेत याची जाणीव मनात असू द्या. तुम्हाला पर्सनल मेसेज पाठवायचा असेल तर पर्सनल मेसेज पाठवा. तुमच्या वाॅलवर वा एखाद्याच्या वॉलवर पोस्ट करून तिथे एखाद्या व्यक्तीला टॅग करू नका. सेटिंग योग्य नसतील तर ती पोस्ट पब्लिकली सर्वांना दिसू शकते. तुमच्या मित्राच्या, नातेवाइकाच्या प्रत्येकच पोस्टवर मोठे मोठे प्रतिसाद लिहू नका. एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या सतत पाठीमागे लागलाे आहोत, असे वाटता कामा नये. भिन्न वयोगटातील मंडळी या ग्रुपमध्ये, पोस्टवर प्रतिसाद देत असतील तिथे आपला प्रतिसाद देण्याआधी आलेले प्रतिसाद वाचा. त्यावर शांतपणे विचार करा आणि थोडक्यात उत्तर लिहा. सोशल मीडिया हे शेवटी आभासी माध्यम आहे. या माध्यमात तुमचे नातेवाईक व मित्रमैत्रिणी तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागू शकतील याविषयी मनाची तयारी करा. सुरक्षित अंतर राखणे योग्य आहे.

  - सोनाली जोशी, ह्युस्टन, अमेरिका
  sonali.manasi@gmail.com

Trending