आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप कंपन्यांच्या फायद्यासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्पादनाला ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग अत्यावश्यक आहे. यात आजच्या काळात सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. बहुतांश मोठ्या कंपन्यांमध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट टीम असते. मीडिया मॅनेजर असतो. पण कंपनी नवीन असेल, लहान असेल तर वेगळा सोशल मीडिया मॅनेजर घेणं शक्य नसतं. अशा वेळी कंपनीच्या फायद्यासाठी, ग्राहक मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याबद्दल आजच्या सदरात.


कोणतेही उत्पादन त्याला ग्राहक मिळवायचे असेल तर ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याकरता मार्केटिंग करावेच लागेल. कंपन्यांना सोशल मीडिया  प्रामुख्याने मार्केटिंगकरिता वापरावा लागेल यात दुमत नाही. मोठ्या कंपन्यांमध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट टीम असू शकते. सोशल मीडिया मॅनेजर असू शकतो. पण कंपनी नवीन असेल, लहान असेल तर वेगळा सोशल मीडिया मॅनेजर घेणं अनेकदा परवडणारं नसतं. अशा वेळी कंपनीत काम करणाऱ्यांपैकीच एखाद्या कर्मचाऱ्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागते. स्टार्टअप किंवा फ्रीलान्सर म्हणून सुरू केलेली कंपनी असेल तर एक किंवा दोघेच काम करणारे लोक असतात. अशा वेळी सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती असेल तर वेळ तर वाचतोच, पण सोशल मीडियाचा जास्तीत जास्त फायदासुद्धा आपल्या छोट्या कंपनीला करून घेता येतो.


सोशल मीडिया प्रोफाइल करण्याआधी सोशल मीडिया स्ट्रॅटेजी ठरवा
वेबसाइट तयार केली असेल त्या वेबसाइटवर सोशल मीडियासाठी वेगवेगळी साधनं दिलेली असतात. तिथे सोशल मीडिया प्रोफाइल देऊ शकता. वेबसाइट तयार केल्यानंतर कोणती सोशल माध्यमं वापरणार आहात, याचा निर्णय घेणं आवश्यक आहे. बिझनेस गोल्स किंवा उद्दिष्टे माहीत असतातच. त्यानुसार निर्णय घेता येतो. सोशल मीडिया प्रोफाइल तयार करायच्या आधी कोणते कोणते सोशल मीडिया चॅनेल वापरणार, कोणत्या सोशल मीडियाचा वापर नेमका काय उद्दिष्ट ठेवून करणार, याची एक यादी तयार करावी. तुम्ही जर गणिताचे शिकवणी वर्ग घेणार असाल त्यात तुमचा सोशल मीडिया आणि तुम्ही घरी दागिने तयार करून विकणार असेल तर त्या स्टार्टअपचा सोशल मीडिया आणि त्याची माहिती वेगळी असेल. त्यांचा प्रमुख ग्राहक अनेकदा वेगळा असेल अशी शक्यता आहे. 


तुमचा प्रमुख ग्राहक वर्ग कोणता? त्यांचं वय काय आहे? त्याच्यामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण कसं असेल? हे ठरवल्यानंतर कुठल्या सोशल मीडिया वापरायचा हे ठरवणे सोपे जाईल. ही सोशल मीडिया स्ट्रॅटेजी ठरली की मग ती प्रोफाइल्स सोशल मीडियावर क्रिएट करावी. त्याची लिंक तुमच्या वेबसाइटवर द्यावी.


योग्य सोशल मीडिया चॅनेलची निवड
सोशल मीडिया स्ट्रॅटेजी ठरली की, सगळ्या सोशल मीडियावरती प्रोफाइल करता येईल. ते प्रोफाइल केले तरीसुद्धा नेमकी कुठली तीन किंवा चार सोशल मीडिया चॅनेल्स सोशल मीडियासाठी प्रामुख्याने वापरायची हे ठरवणे आवश्यक आहे. कंपनी जर मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगची असेल तर फेसबुक Ads आणि Promoted Tweets वापरणे ही पहिली निवड असेल. म्हणजेच फेसबुक आणि ट्विटर हे मुख्य सोशल मीडिया चॅनल होतील. तुम्ही मोठ्या कंपन्यांचे व्यवहार करणार आहात की, थेट ग्राहकांशी संपर्क करणार आहात, यावरूनही सोशल मीडिया ठरवता येतो. सोशल मीडिया मॅनेजमेंट साधन कोणते वापरायचे याचा विचारही याच वेळी करणे योग्य राहील. सोशल मीडिया आणि मॅनेजमेंट साधन यांची निवड काही कारणाने पुढे बदलावी लागू शकते. 


कस्टमर सर्व्हिससाठी आणि पैसे वाचवण्यासाठीही  उपयुक्त 
कंपनी नवी आहे, नुकतीच सुरुवात आहे, अशा वेळी सोशल मीडिया आणि ग्राहक सेवा याकरता वेगवेगळे कर्मचारी कामाला लावण्यापेक्षा कस्टमर सर्व्हिस करणाऱ्यांना सोशल मीडिया मॅनेज करू द्या. कस्टमर सर्व्हिस उत्तम असणे यावर कंपनीचा नफा आणि नाव अवलंबून असेल. अशा वेळी कस्टमर सर्व्हिस असणे आवश्यकच आहे. त्याच मंडळींनी कस्टमर सर्व्हिसकरिता सोशल मीडियाचा वापर करणेसुद्धा आवश्यक आहे. ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचायला सोशल मीडियाची मदत होणार असते. 


नवे कर्मचारी मिळवण्याकरिता उपयोगी
कंपनी नवीन असताना उत्पादनाची, कंपनीची, उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करा. सोशल मीडिया जे फॉलो करतात त्यांच्यामध्ये फक्त तुमचे ग्राहकच असतील असे नाही. तर त्यांच्यामध्ये भावी कर्मचारीसुद्धा असू शकतात. आपले कर्मचारी नियुक्त करण्याकरिता सोशल मीडियाकडे लक्ष द्या.


तुमचे सोशल मीडियाचे धोरण वारंवार तपासून बघा
कंपनी सुरू करताना किंवा सुरुवातीच्या काळात जे सोशल मीडिया धोरण स्वीकारले आहे ते कालांतराने तपासून बघण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. कालांतराने तुमची उद्दिष्टे बदलतील, तुमची उत्पादने बदलतील. काही वेळा तुमचा नफा कमीजास्त होईल आणि त्यावर तुमचे सोशल मीडिया धोरण अवलंबून असेल. हे बदल लक्षात घेऊनच सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तपासून बघण्याची सवय लावणे आवश्यक आहे. या बदलानुसार एखादे नवीन सोशल मीडिया चॅनेल जास्त प्रमाणात वापरावे लागेल. एखाद्या वेळी सोशल मीडिया मॅनेजर नियुक्त करावा लागेल.


नवनवीन प्रयोग करण्याची मनाची तयारी असू द्या
तुमचे उत्पादन उत्तम असेल, तुमचे ग्राहक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतील तरीसुद्धा सोशल मीडियाचा वापर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी करावा लागेल. तुमची नवी उत्पादने, नवीन ग्राहक वर्ग याचा मेळ साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अतिशय आवश्यक आहे. तुम्ही वापरत असलेला सोशल मीडिया चॅनल त्यांची स्वतःची धोरणे जशी बदलतो त्यानुसार तुम्हाला तुमच्या सोशल मीडियातील माहिती बदलावी लागते. फेसबुक, गुगल, इन्स्टाग्राम सर्वजण असे बदल करत असतात. ते बदल सामावून घेता येतील अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सोशल मीडियाचे धोरण ठरवता आले पाहिजे. नुसत्या पोस्ट करण्यापेक्षा इमेज असलेल्या पोस्ट करणे, वेगवेगळी ईमोजी वापरणे, हॅश टॅग वापरणे  हे बदल कुठले उत्पादन आहे, कुठल्या प्रकारच्या पोस्ट वारंवार लोकांपर्यंत पोहोचतात हे बघूनच ठरवता येईल.  सर्व प्रकारच्या सोशल मीडियाने व्हिडिओ प्रमोशन मोठ्या प्रमाणात सुरू केले हे याचे उदाहरण आहे.


- सोनाली जोशी, ह्युस्टन, अमेरिका
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...