आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्षातलं दडपण इथेही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा स्त्रिया सोशल मीडियावर त्यांचा वावर नेमका कसा असावा याविषयी साशंक असतात. सोशल मीडियावर जास्तीत जास्त चांगला वावर कसा करता येईल म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतात. वैयक्तिक आयुष्याविषयी किती पोस्ट करायच्या, किती लेखन करायचं याबद्दल त्यांच्या मनात प्रश्न असतात. त्या नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील तर त्याविषयी फक्त लिहायचं किंवा वैयक्तिक आयुष्याविषयी वेगळ्या अकाउंटवर लिहायचं, याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ असतो. समाजामध्ये स्त्रीने कसे व्यक्त व्हावे याविषयी खूप मतमतांतरं असतात. आपल्याला सर्वांच्या अपेक्षेनुसार व्यक्त होता येईल का नाही, याचं दडपण स्त्रियांच्या मनावर असतं आणि म्हणूनच सोशल मीडियावर त्यांचा वावर/व्यक्त होणं अनेकदा अनियमित असल्याचं दिसतं. वावर नियमित असला तरी व्यक्त होताना त्या दडपणाखाली आहेत असं जाणवत असतं. 


समाजमान्य आहे तेवढंच आपल्या वैयक्तिक प्रोफाइलवर स्त्रिया पोस्ट करताना दिसतात. मुलांचे फोटो, कुटुंबीयांबरोबर साजरे केलेले सण, सहली किंवा परदेशवारी याविषयीच्या पोस्ट आणि फोटो दिसतात. स्त्री म्हणून हमखास आणि सहज करता येते ती म्हणजे पाककृतीबद्दलची पोस्ट. मुलांचे संगोपन हा विषयसुद्धा स्त्रिया सहजतेने हाताळतात. त्यांचे प्रश्न, त्यांच्या खासगी आयुष्यातल्या अडचणी याविषयीचे लेखन थेट आपल्या प्रोफाइलवर करण्यापेक्षा एखाद्या विषयासंबंधीच्या ग्रुपवर करण्याचा पसंत करतात. काही वेळा व्यक्तिगत निरोपातून याची चर्चा होते. स्वतःला कमीपणा येऊ शकेल, त्रासदायक वाटेल असे सर्व विषय थेटपणे प्रोफाइलवर मांडणाऱ्या स्त्रिया खूपच कमी असतात. नव्या फॅशनप्रमाणे कपडे घडले किंवा इतर बदल करणे त्यांना जेवढे सोपे वाटते तेवढे अशा एखाद्या त्रासदायक विषयावर बोलणे त्यांना अवघड वाटते. आपली समाजातली प्रतिमा सांभाळण्याचा हा एक भाग असतो. बहुसंख्य स्त्रिया जेव्हा एखादी गोष्ट करत नाहीत तेव्हा त्याविषयी व्यक्त होण्याची जबाबदारी ज्या काही थोड्याफार स्त्रिया व्यक्त होत असतात त्यांच्यावर जास्त प्रमाणात येते. एखाद्या कार्यकर्तीप्रमाणे, सैनिकासारख्या त्या स्त्रिया हा लढा लढवत असतात. या स्त्रियांवर त्या लढ्याच्या अनुषंगाने येणारी प्रतिमा सांभाळण्याचा अतिरिक्त ताण असतो. सेलिब्रिटी, लोकनेते, कार्यकर्त्या या सर्वांनाच आपली विश्वास टिकून राहील अशी प्रतिमा तयार करणे आवश्यक असते.  त्यांच्या छोट्याशा चुकीने वास्तवात आणि सोशल मीडियावरसुद्धा या प्रतिमेला सहज तडा जाऊ शकतो. 


लोकांकडून येणारे बोचरे प्रतिसाद, अनफ्रेंड करणे, ब्लॉक करणे, तुमचे प्रोफाइल रिपोर्ट करणे अशा अनेक गोष्टी मित्रयादी खूप वाढल्यास स्त्रियांच्या वाट्याला येतात. आपली प्रतिमा तयार करताना खोट्याचा मोह टाळणे हा त्यावर एक उपाय आहे. बंडखोरपणा आणि अॅक्टिविझम याचं समर्थन करताना किंवा आणखी एखाद्या सदस्याला पाठिंबा देत असताना तुम्ही ज्या सोशल मीडियावर वापरता त्यांच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे याचे भानसुद्धा असावे लागते. दृश्यांसंबंधित नियमांचे पालन करताना जास्तच काळजीपूर्वक वापर आवश्यक आहे. तुम्ही कार्यकर्ते असाल तर तशी नोंद तुमच्या प्रोफाइलमध्ये असणार हे गृहीत धरले आहे. विरोध करायचा असेल तरीसुद्धा सोशल मीडियावरील नियमांचे पालन करूनच करणे अपेक्षित आहे.  समाज माध्यमे प्रामुख्याने नेटवर्किंगसाठी आहेत. त्याचा वापर अनेक जण डेटिंग सर्व्हिस म्हणूनही करतात. वेळीअवेळी विशेषत: मध्यरात्रीनंतर सोशल मीडियावर असणाऱ्या स्त्रियांविषयी समाजात अनेक गैरसमज असतात आणि ते पसरतात. यामध्ये सेलिब्रिटीसह अनेक बंडखोर आहेत असे वाटणाऱ्या आणि अॅक्टिव्हिस्ट स्त्रियांचा समावेश असतो. ज्या स्त्रियांचा समाज माध्यमातला वावर फक्त बंडखोर वा विरोधाचा आहे त्या अनेकदा चटकन लक्ष वेधून घेतात. हे लक्षवेधी वागणे प्रत्यक्ष आयुष्यात त्याला पूरक अशी काही कृती नसेल तर फार काळ टिकत नाही. एखाद्या विचारधारेला पाठिंबा देताना किंवा तिचा विरोध करताना दोन्ही वेळेला विचार करून पोस्ट करावी. त्याप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात कृतीही करावी. त्यामुळे आपल्या म्हणण्याला सबळ पुरावा मिळतो. 


सार्वजनिक आणि खासगी आयुष्यात स्त्रिया कशा वागतात या कशाचे तारतम्य सोशल मीडियाचे सदस्य ठेवत नाहीत. सोशल मीडियावरचा वावर, खासगी आयुष्य, व्यावसायिक क्षेत्रातला वावर याचा हवा तसा वापर करण्याची वृत्ती सदस्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. याचा फटका प्रामुख्याने स्त्रियांना बसतो. सर्व क्षेत्रांत स्त्रिया काम करत असल्या तरी सार्वजनिक ठिकाणी किंवा समाज माध्यमांमध्ये मोकळेपणे व्यक्त होण्याची मुभा त्यांना घेता येत नाही. आपल्या घरचे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, माझ्या या पोस्टचा अर्थ कोण कसा काढेल, याविषयी त्यांच्या मनावर दबाव असतो. व्यावसायिक कारणांकरिता वेगवेगळे अकाउंट असेल तर प्रश्नच नाही, परंतु व्यक्तिगत प्रोफाइलवर व्यावसायिक जीवनातल्या किंवा व्यवसायाशी निगडित पोस्ट करताना स्त्रियांना हे भान ठेवावं लागतं. ज्या तुरळक स्त्रिया निर्भीडपणे किंवा मोकळेपणे आपली मते मांडत असतात त्यांना सोशल मीडियाचा फार चांगला अनुभव येत नाही. टीका, टोकाचे प्रतिसाद, विनाकारण होणारे ट्रोलिंग या सर्वांचा सामना या स्त्रियांना करावा लागतो. स्त्री असो की पुरुष, कुणालाही विरोध करताना किंवा एखाद्यावर टीका करताना सभ्यतेची पातळी सोडून समाज माध्यमांमध्ये प्रतिसाद देऊ नये ही सवय सर्वांना असावी. 


समाज माध्यमातली आपली प्रतिमा योग्य दिसावी याकरिता स्त्रियांना अनेक वेळा त्यांची प्रामाणिक मते मांडता येत नाहीत. आपले फोटो कसे असावे, आपले विचार कसे मांडावे, नेमकी कोणती माहिती शेअर केली तर अधिक चांगले होईल असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. त्यांच्या मित्रयादीतली मंडळी जेव्हा एखादा Hashtag पोस्टमध्ये समाविष्ट करतात तेव्हा काही इतर स्त्रियासुद्धा त्याचे अनुकरण करतात. तुम्ही मार्केटिंगच्या व्यवसायात नसलात तर Hashtag आपल्या वावराशी किती निगडित आहे, आपल्या प्रत्यक्ष जगण्याशी किती जुळतो हे तपासून पाहा आणि मगच त्याचा वापर करा. आपला संबंध त्याच्याशी नसेल तर अशा प्रकारच्या पोस्ट करू नये. अनेकदा असा पाठिंबा हा नुसता आभास असतो. तरीसुद्धा खासगी आयुष्यात वा सोशल मीडियावर यामुळे काही त्रास होणार नाही याची खात्री कुणी देऊ शकत नाही. लग्न झालेल्या व्यक्तींचे सासर-माहेरचे नातेवाईक सोशल मीडियावर असतात. त्यांच्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत प्रोफाइलकडे अगदी लक्ष ठेवून असतात. आपल्या सोशल मीडियावरच्या प्रत्येक प्रतिसादाची आणि पोस्टची जबाबदारी घेता येईल, अशीच पोस्ट करणे सोयीचे आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीचा खासगी अवकाश या मुद्द्याला फारशी जागा नाही. त्याचे साहजिकच तोटे आहेत. सोशल मीडियाचा वापर जसा वाढला तसेच सोशल मीडियामुळे होणारे गैरसमज वाढले आहेत असे चित्र दिसते. 


सोशल मीडियाचा विपरीत परिणाम नात्यावर होणार नाही ही जबाबदारी स्त्री-पुरुष दोघांचीही आहे. तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करत असाल तर बहुतेक सोशल मीडिया मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर वापरत असल्यामुळे तुम्ही ऑनलाइन आहात हे कुणालाच कळत नाही. तुम्हाला काम करताना इतरांचा त्रास नको असेल तर त्यांना सोशल मीडियावर आला आहात हे न कळू देणे हा एक मार्ग तुम्हाला अवलंबता येईल. तुमचे वैयक्तिक अकाउंटसुद्धा अशा सॉफ्टवेअरद्वारे वापरता येईल. पण तुमच्या प्रतिसादाची, पोस्टची जबाबदारी मात्र तुम्हालाच घेणे आवश्यक आहे. लिहिताना विचार करावा, सार्वजनिक सभ्यतेची पातळी शक्यतो ओलांडू नये. या सोशल मीडियाचा वापर थोडा सावधपणे केला तर बंडखोरी जरी तुमचे उद्दिष्ट असेल तरी ते साध्य करता येईल हे ध्यानात घेऊनच वापर करावा. तुम्हाला सोशल मीडियावर काही त्रास होत असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
सोनाली जोशी, ह्यूस्टन
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...