आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पाटलांच्या तीन गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचा गड राखून असलेले आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील, आघाडीत बंडखोरी करून भाजप प्रवेश करणारे हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्रिपदासाठी चर्चिले जाणारे नाव चंद्रकांत पाटील. न्यूज चॅनलसाठी या तिघांच्याही मतदारसंघात जाऊन त्यांच्या मुलाखती करण्याची संधी मिळाली. दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादीतल्या पहिल्या फळीतले नेते. अनेक मंत्रिपदे सांभाळलेले आणि विधानसभेचे माजी अध्यक्षसुद्धा. पहिल्या फळीतल्या अनेकांनी पक्ष बदलले, पण वळसे-पाटील पक्षासोबत राहिले. जुन्नरलगतचा आंबेगाव मतदारसंघ त्यांनी गेल्यावेळच्या मोदी लाटेतही राखला. सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले असून या वेळी सातव्यांदा उमेदवार आहेत. या मतदारसंघाचे चित्र पाहिल्यास वळसे-पाटलांना तितका सक्षम विरोधक नाही, असे म्हणता येईल. वळसे-पाटलांविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शिवसेनेची शेवटपर्यंत शोधाशोध सुरू होती. येथील लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटलांचा पराभव झाल्याने सेनेचे कार्यकर्ते थंडावले. अखेर पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेलेंना शिवसेनेने अर्ज दिला. सहकारी संस्थांवर असलेले वर्चस्व ही त्यांची जमेची बाजू आहे. आता या मतदारसंघात वळसे-पाटील विरुद्ध राजाराम बाणखेले अशी मुख्य लढत आहे. या निवडणुकीत काँग्रेसी परंपरेला छेद देऊन आणि पवार कुटुंबाला ललकारून भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील. मोठा काळ मंत्रिपद भूषवलेला नेता, परंपरेने काँग्रेसी कुटुंब. लोकसभेला बारामतीतील सुप्रिया सुळेंच्या विजयातील शिलेदारांपैकी एक. लोकसभेला भाजपने बारामतीत आव्हान दिल्यानंतर आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीचा गड राखण्यात मोलाचं काम केलं ते हर्षवर्धन पाटलांनी. लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंसाठी काम केल्यानंतर विधानसभेला इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळेल, हे गृहीत होते. पण तसे घडत नसल्याचे कारण देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी ही लढाई होतेय. इंदापूरचा पाणीप्रश्न हा भाजपने प्रचाराचा मुद्दा केलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी इंदापूर तालुका पाण्यासाठी दत्तक घेणार असल्याचे सांगितलेय, तर अजित पवारांनीही सभांमध्ये याच मुद्द्यावर भर दिलाय. मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय. या मतदारसंघात कोणीही विजयी झाले तरी फार कमी फरकाने हा विजय होईल. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या विद्यमान मंत्र्यांना उमेदवारीही न देणाऱ्या भाजपने मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर खूपच कृपादृष्टी केल्याचे दिसले. भाजपसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्राबल्य असणारा हा मतदारसंघ. असे असूनही चंद्रकांत पाटलांपुढे आव्हाने नव्हती असे नाही. मूळ कोल्हापूरमधील असलेल्या पाटील यांना कोथरूडकर होण्यापासूनच सुरुवात करावी लागली. चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यावरून ब्राह्मण महासंघात फूट पडली. त्यामुळे पक्षनेतृत्वाने तातडीने गिरीश बापट यांच्यावर इथल्या मतदारसंघाची जबाबदारी टाकत चंद्रकांत पाटलांना बळ दिले. मराठा क्रांती मोर्चाच्या एका गटानेही चंद्रकांतदादा पाटलांवर निवडणुकीत बहिष्कार टाकण्याची भाषा केली. तरीही कोथरूडची परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मनसेने दिलेल्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. गेल्यावेळी पुण्यातील सर्व मतदारसंघांत जनतेने भाजपला कौल दिला होता. या वेळी आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. तो किती यशस्वी झाला हे निकालात समजेलच. शिवाय इथल्या उमेदवाराला काही काळ का होईना, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल, अशीही काही कुजबुज खासगीत ऐकायला मिळतेय!

सोनाली शिंदे : पत्रकार, साम टीव्ही