आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत तुमचं, मेंदू कुणाचा?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली शिंदे : साम टीव्ही, लेखिका-पॉलिक्लिक

सोशल मीडियाचा निवडणुकीतील वापर हा या निवडणुकीत नवखा नाही. सोशल मीडियाने भारतात निवडणुकांचा ताबा घेतला तो 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये. स्मार्ट फोनच्या कडेवर बसत हा मीडिया तुमच्या हातात आला. त्याने कधी आपल्या मेंदूत प्रवेश केला हे समजलेसुद्धा नाही. स्वातंत्र्यासाठी पूरक समजला जाणारे हे माध्यम हळूहळू हेतूत: वापरले जाऊ लागले आणि तुमचा मेंदूच काबीज करुन लागले. याचीच सविस्तर मांडणी करणारे पत्रकार सोनाली शिंदे यांचं पुस्तक - 'पॉलिक्लिक- मत तुमचं, मेंदू कुणाचा?'. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच पुण्यात पार पडले. त्यातील हा संपादित अंश...

'तुमचे गुण कोणत्या राजकीय नेत्यासारखे आहेत?', 'तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात?' अशा काही गोष्टी मधल्या काळात फेसबुकवर दिसत होत्या. माझ्या एका मैत्रिणीने याची ट्रायल करुन ही पोस्ट आनंदाने फेसबुकवर शेअर केली होती. पण तिला बिचारीला हे माहिती नव्हते की मागच्या जन्माचं सोडा, पण या जन्माचा तिचा डेटा मात्र इतर कुणाकडेतरी जमा होतोय. त्याचा वापर तिचं आयुष्यावर इतरांना हवा असलेला बदल करण्यासाठी वापरला जाणार होता. अशा डेटाची किंमत आज पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांपेक्षाही अधिक आहे.
जगातील सर्वात ताकदवान लष्कर असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. जगाचा विनाश घडवू शकणारी आण्विक क्षमता त्यांच्या हातात आहे. यावरुन त्यांना जगातला सर्वात धोकायदायक माणूस म्हटलं जाऊ शकतं. अर्थात 72 वर्षांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही अधिक धोकादायक माणूस वेगळाच आहे. वरवर पाहता एक जेंटलमन वाटणारा, सक्सेस स्टोरी म्हणून ज्याला तरुणाई आयकॉन मानते, असा 34 वर्षांचा तरुण ट्रम्प यांच्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे.होय, मी मार्क झुकेरबर्ग यांच्याविषयी बोलत आहे. सर्वसामान्यांचे माध्यम म्हणून कुरवाळल्या गेलेल्या सोशल मीडियाच्या विध्वंसक शक्तीची ताकद हळूहळू पुढे येऊ लागली. या माध्यमांवर अपलोड केलेला कोट्यावधी युजर्सचा डेटा एका कंपनीकडे दिवसाला जमा होतो. या मार्केटिंग युगात इंधनापेक्षाही अधिक महागडा आणि महत्त्वाचा. त्यामुळेच सोशल मीडियाच्या डेटा सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

असे झाले तर प्रत्येकाचं खासगी आयुष्य इतरांच्या हातातलं बाहुलं बनवण्याचा धोका आहे. अगदी आपण त्या सेकंदाला कुठे आहोत आणि कुणासोबत काय बोलतोय हेदेखील समजू शकते. तुमच्या आयुष्यात काय एक्टीवीटी चालू आहे, यासाठी सोशल मीडियावर जागा दिलेली आहे. तुम्ही काही सेलिब्रेट करत असाल, सिनेमा पाहत असाल हे सारं तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त होत असता. एवढचं काय तुमची भावनिक अवस्था काय आहे- तुम्ही दु:खी आहात, आनंदी आहात, पेचात आहात, वैतागलेले आहात, यासाठीसुद्धा फेसबुकसारख्या माध्यमाने जाहीरपणे व्यक्त व्हायला जागा दिलीय. आपली सर्व खासगी माहिती, आचार-विचार, आर्थिक-राजकीय सर्व प्रकारच्या व्यवहारांची माहिती यातून मिळत असते. या सर्व माहितीचा किती दुरुपयोग केला जाऊ शकतो, याला काही सीमाच नाही. आपलं मत बनवण्यापासून आपल्या व्यक्तिगत फसवणुकीपर्यंत सारे काही या माहितीच्या आधारे शक्य आहे. केवळ एकदा माहिती पुरवून आपण थांबत नाही. तर प्रत्येक क्षणाची घडामोड, बदल त्यामार्फत नोंदवला जातो. आपण कुणाच्यातरी प्रोपगंडासाठी किती सहजगत्या वापरले जाऊ शकतो? खासगी आयुष्याच्या सुरक्षेबद्दल, सोशल मीडियाच्या डेटा सुरक्षेबद्दल जी भिती व्यक्त केली जात होती, तेच झाले. अशाच एका बातमीनं जग धास्तावलं. बातमी होती फेसबुकवरील डेटा चोरीला गेल्याची. कॅम्ब्रिज अॅनालिटीका या रिसर्च संस्थेने फेसबुकवरील 8.7 कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. आणि याचा वापर 2016 च्या अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा हा आरोप होता. त्यानंतर मार्क झुकेरबर्गने माफीदेखील मागितली होती. फेसबुकनंतर काहीच दिवसांत ट्विटरवरील डेटाही चोरीला गेल्याची माहिती समोर आली. ट्विटरने कॅम्ब्रिज अॅनालिटीकाला डेटा विकल्याचा धक्कादायक आरोप समोर आला. दरम्यान, ट्विटरच्या प्रवक्त्यांनी असा कोणताही डेटा चोरीला गेला नसल्याचे सांगितले होते.

इंग्लंडस्थित कॅम्ब्रिज अनालिटीकाला एका रिसर्चरकडून 5 कोटींहून अधिक नागरिकांचा डेटा मिळाला. या रिसर्चरने एका अॅपमार्फत लोकांचा डेटा जमवला होता. अनेकदा आपण 'आय अॅग्री'वर न वाचता क्लीक करतो. ही सगळी माहिती अनेकदा तिसर्याच पार्टीला विकली जाते. अशाच पद्धतीने ही माहिती जमा करण्यात आली होती. या चोरीसाठी काही विशेष करावे लागले नव्हते. कॅम्ब्रीज अनालिटीकाची सहयोगी संस्था एससीएलने जीएसआर या संस्थेकडून हा डेटा मिळवला होता. अनालिटीकाचे माजी कर्मचारी क्रिस्टोफर वायली यांनी याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आणली होती. 'द गार्डियन' वर्तमानपत्रात त्यांच्या मुलाखती छापून आल्या होत्या. कॅम्ब्रिज अनालिटीका कशाप्रकारे डेटा चोरी करते याची मोडस ऑपरेंडी त्यांनी सांगितली होती. पहिली पायरी म्हणजे फेसबुक 'फीचर टेस्ट' तयार करते. म्हणजे काय, तर पर्सनालिटी टेस्ट, तुमचे लाईक्स या सा-यामार्फत तुमचं सायकॉलॉजीकल प्रोफाईल तयार करते. थोडक्यात तुमच्या मानसिकतेचा अभ्यास करते आणि त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करते. आपल्याला कदाचित ही फार महत्त्वाची गोष्ट वाटत नसेल पण तिसरं कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेऊन आहे, तुमचं कृत्रिम मत तयार केलं जातयं हे किती भयंकर आहे ! पूर्वी सर्वाधिक श्रीमंती असणारे लोक कोण असायचे. उद्योजक, कारखानदार. पण आता जगात सर्वाधिक श्रीमंतांची यादी काढली तर अव्वल स्थानावर तु्म्हाला माध्यमांचे संस्थापक दिसतील. गेली काही वर्ष तुम्ही सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत बिल गेटस, मार्क झुकेरबर्ग, जिमी वेल्स ही नावं ऐकली असतील. राजकीयच नाही तर संपूर्ण मानवी आयुष्य व्यापण्याचा प्रयत्न नवी माध्यमे दिवसेंदिवस करत आहेत. आपल्या कळत-नकळत आपल्या व्यक्तिगत अवकाशात (पर्सनल स्पेसमध्ये) शिरुन हे माध्यम आपला अभ्यास करतं. आपलं मानसिक, भावनिक, वैचारिक विश्व जाणून घेतं. ज्यांना यातून आपला स्वार्थ साधायचा आहे, ते याचा तसा अभ्यास करतात. त्यानुसार 'स्ट्रॅटेजी' तयार करतात. सोशल मीडियाद्वारे अनेकदा आपण आपल्या आवडी-निवडी व्यक्त करत असतो. कधी एखाद्या प्रॉडक्ट किंवा पोस्टला लाईक करुन किंवा एखादी पोस्ट शेअर करुन. कन्झ्युमर रिसर्चच्या नावाखाली हा सगळा डेटा कुठेतरी रेकॉर्ड होत असतो. आणि, नंतर याचा वापर करुन आपल्यापर्यंत तसे प्रॉडक्टस पोहोचवले जातात. त्या पद्धतीने ऑफर्स देण्यात येतात. तशा प्रॉडक्टसची निर्मिती केली जाते. हे सारं केवळ प्रॉडक्टस आणि सर्विसेसपर्यंत मर्यादित नाही. याचा थेट संबंध राजकारण, निवडणुका, सत्ता यांच्याशी आहे.

इंटरनेटवरील विविध साइटसच्या माध्यमातून आपले मानसिक, भावनिक, वैचारिक विश्व, मत जाणून घेतले जाते. त्यानंतर त्याला प्रभावित करण्यासाठी त्याच माध्यमाचा वापर केला जातो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात समाजाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर वाईट परिणाम होणार असेल, तर याचा विचार नक्कीच केला पाहिजे. तिथे प्रश्न अधिक गंभीर होतो, जेव्हा बाजारपेठा आणि राजकीय सत्ताधारी याचा वापर करुन समाजमन नियंत्रित करु लागतात.