आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादावर ताेडगा काढण्यासाठी साेनिया गांधी सक्रिय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात जाेरदार वादाला सुरुवात झाली अाहे. प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद सुटावा यासाठी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दुसरे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीला बोलावले आहे. विशेष म्हणजे हा वाद चिघळू नये म्हणून सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना वेगवेगळे बोलावले आहे.

सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना मंगळवारी चर्चेसाठी बोलावले आहे, तर बुधवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बोलावले आहे. कमलनाथ अाणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थन असलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची सोनिया गांधी यांची इच्छा आहे. मात्र, असा नेता शोधणे सध्या तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना कठीण झाले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक उघडपणे समोर आले आहेत. सर्वात आधी दतिया जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक दांगी यांनी इशारा दिला की, जर ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद न दिले गेल्यास ते पदाचा राजीनामा देतील. दांगी यांच्या या इशाऱ्यानंतर मुरैना जिल्ह्याचे अध्यक्ष राकेश मवाई हेदेखील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थनासाठी पुढे आले. अशोक दांगी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रदेशातील काही नेत्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांची लोकप्रियता सहन होत नाही. यामुळे शिंदे यांना मध्य प्रदेशातून बाहेर ठेवण्याचे षड॰यंत्र रचले जात आहे.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू झालेला हा वाद ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचे काहींचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत स्वत: ज्योतिरादित्य शिंदे आहेत. त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी पोस्टरबाजी करत शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.

सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष झाल्यानंतर कमलनाथ पहिल्यांदाच त्यांची भेट घेताहेत असे नाही. तर नुकतीच शिंदे यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिल्यानंतर कमलनाथ यांना दहा जनपथवर बोलावण्यात आले होते.

दिग्विजय सिंग यांचाही शिंदेंना विरोध, गटबाजी उफाळली
राज्यातील काँग्रेसमधील आणखी एक शक्तिकेंद्र मानले जाणारे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यास विरोध आहे. यामुळे कमलनाथ यांचे काम सोपे झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कमलनाथ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर आदिवासी नेत्याची नियुक्ती करण्याची इच्छा आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आदिवासी नेत्याचा मुद्दा पुढे केल्याने अप्रत्यक्षरीत्या ज्योतिरादित्य शिंदे यांची अध्यक्षपदाची संधी आपोआप जाते.