आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधी पुन्हा सक्रिय, महत्त्वाचे निर्णय घेणे सुरू; महाराष्ट्र, झारखंडनंतर लक्ष्य हरियाणा-दिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमंत अत्री | नवी दिल्ली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून दुसऱ्यांदा पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर १६ व्या दिवशी सोनिया गांधी पुन्हा सक्रिय झाल्या. आगामी काळात विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यांतील प्रलंबित निर्णय तातडीने घेण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र व झारखंड मधील नेतृत्वाचा निर्णय तसेच पक्षातील उमेदवारांची छाननी करण्याच्या दृष्टीने समित्या स्थापन केल्यानंतर सोनियांचे लक्ष्य आता हरियाणा आणि दिल्ली आहे. हरियाणात ऑक्टोबरमध्ये तर दिल्लीत पुढील वर्षाच्या प्रारंभी विधानसभा निवडणूक होत आहे. गेल्या १० ऑगस्टला सोनिया गांधी यांच्याकडे दुसऱ्यांदा काँग्रेसचे नेतृत्व आले. ही तात्पुरती व्यवस्था असली तरी मंगळवारी सकाळी सोनिया अत्यंत सक्रिय झाल्याचे िदसून आले. सकाळपासूनच त्यांनी प्रादेशिक तसेच केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. झारखंडमध्ये नवनियुक्त पदाधिकारी आणि प्रभारी आर. पी. एन. सिंह यांची भेट घेऊन निवडणूक मंत्र दिल्यानंतर त्यांनी लगेच हरियाणाचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. सायंकाळी दिल्लीचे प्रभारी पी. सी. चाको आणि जिल्हाध्यक्षांशीही चर्चा करून नव्या अध्यक्ष निवडीबाबत चर्चा केली.  आझाद यांच्याशी सोनियांच्या झालेल्या चर्चेबाबत जाहीरपणे काहीही सांगण्यात आले नाही. मात्र, बैठकीत गटबाजीने पोखरलेल्या हरियाणा काँग्रेसमध्ये नेतृत्व परिवर्तनासह इतर पर्यायांवर सखोल चर्चा झाल्याचे समजते. यादरम्यान, विद्यमान अध्यक्ष अशोक तंवर  यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांचा गट नेतृत्व परिवर्तनाची सातत्याने मागणी करत आहे.  दरम्यान, हरियाणाबाबत निर्णय घेतला जाण्यापूर्वी राहुल यांचे मतही विचारात घेतले जाऊ शकते. सूत्रांनुसार, तंवर यांना पदावरून काढले तर हरियाणात महाराष्ट्र व झारखंडच्या धर्तीवर नव्या अध्यक्षांसोबत चार कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले जाऊ शकतात.  अन्यथा हुड्डा गट बंडखोरी करून अडचणी निर्माण करू शकतो. 

भाजपच्या राष्ट्रवादाला प्रत्युत्तर देण्याची तयारी
भाजप सध्या प्रचारात राष्ट्रवादाचे कार्ड वापरत आहे. याला प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सज्ज झाले आहे. यासाठी पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे प्रभारी व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सचिन राव यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील नेते व कार्यकर्त्यांना या मुद्द्यावर भाजपशी प्रभावीपणे दोन हात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...