आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिन्ही पक्षांच्या आमदारांची सोनिया, शरद पवार, उद्धव यांचे नाव घेत संविधानाच्या साक्षीने भाजपसाेबत न जाण्याची शपथ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळी : राज्यपालांकडे महाआघाडीचा बहुमतासह सत्तास्थापनेचा दावा दाखल
  • रात्री : शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या 162 आमदारांची 'पंचतारांकित' परेड
  • निकालाच्या 32 दिवसांनंतर सर्व आमदार एकत्र

मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आमदारांना साेमवारी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्रित आणून शपथ देण्यात आली. 'संविधानाला साक्ष ठेवून आम्ही साेनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवू. भाजपला मदत करणार नाही,' अशी शपथ या आमदारांनी घेतली. आमच्याकडे १६२ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा करणारी महाविकास आघाडी या कार्यक्रमात फक्त १३७ आमदारच जमवू शकली.त्यामुळे प्रत्येकाची ओळख परेड करण्याऐवजी सामूहिक शपथ देऊन नंतर तातडीने हाॅटेलवर पाठवण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र १५८ आमदार उपस्थित असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. भाजपने राष्ट्रवादीचा एक गट फाेडून राज्यात सत्ता स्थापन केली.

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांना शपथ देण्यात आली. मात्र अजित पवारांसाेबत गेलेले लाेक काही वेळातच शरद पवारांकडे परत आले. त्यामुळे आता फडणवीस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने आमच्याकडे १६२ आमदारांचे संख्याबळ असल्याने आम्हालाच सत्तास्थापनेस संधी द्यावी, असे निवेदन साेमवारी राजभवनात दिले आहे. तसेच तिन्ही पक्षांच्या आमदारांना संध्याकाळी वेगवेगळ्या हाॅटेलातून 'ग्रँड हयात'मध्ये एकत्र आणण्यात आले. या वेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित हाेते. नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली.

दावा १६२ आमदारांचा , प्रत्यक्षात हजेरी बहुमताच्या १४५ संख्येएवढीही नाही


शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी १६२ आमदार पाठीशी असून त्यांची परेड करण्याची घाेषणा केली हाेती. आमदारांचा माध्यमांसमाेर 'हेड काउंट'ही करण्याचे नियाेजन हाेते. प्रत्यक्षात १३७ आमदारच उपस्थित असल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना नियाेजनात बदल करावा लागला. सर्व आमदारांची ओळख परेड न करता फक्त त्यांना भाजपसाेबत न जाण्याची शपथ देऊन वेळ मारून नेण्यात आली. राज्यात बहुमतासाठी १४५ आमदारांची गरज आहे, एवढी संख्या महाविकास आघाडीकडे खरेच आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हाेत आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी १५८ आमदार हजर हाेते व चार जण मुंबईबाहेर असल्याने न आल्याचा दावा केला.

आमदारांनाे, घाबरू नका, तुमची जबाबदारी मी घेताे : शरद पवार


शरद पवार म्हणााले, 'बहुमतविनाच भाजपने मणिपूर, गोव्यात सत्ता स्थापली. पण हे गोवा नाही. अजित पवार यांना व्हीप काढण्याचा अधिकार नाही, ज्यांना पक्षाने पदावरून हटवलेले आहे. पक्षातील ज्या आमदारांना आपले पद जाईल असा धोका वाटत आहे त्यांनी काळजी करू नये. त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतो. अजित पवार यांनी सगळ्यांची दिशाभूल केली आहे. आम्ही लवकरच अजित पवारांच्या विरोधात कारवाई करणार आहाेत.'

महाराष्ट्रामध्ये 'सत्तामेव जयते' होऊ द्यायचे नाही : उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा रस्ता मोकळा करा. सत्यमेव जयते हे आपल्याला 'सत्तामेव जयते' होऊ द्यायचे नाही. समोरचे आमदार पाहून कुणाच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर तिन्ही पक्ष मिळून प्रकाश पाडण्याची हिंमत आपल्या मनगटात आहे. 'मी पुन्हा येईन' म्हणणार नाही, आम्ही आलेलो आहोत. मध्ये आलात तर काय करायचे ते करण्यासाठी समर्थ आहोत. आडवे येण्याचा प्रयत्न करायचा असेल तर करूनच पाहा.' 

ठाकरेंच्या नातवाने साेनियांचे नेतृत्व मान्य केले : आशिष शेलार


भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, 'शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा पोरखेळ पाहिला. शिवसेनाप्रमुख यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी चक्क सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य करीत असल्याची शपथ घेतली. सत्तेसाठी शिवसेना काय करू शकते हे देशाने पाहिले आणि त्यांचे बेगडी हिंदुत्वही समोर आले. इथे शपथ घेऊन विधानसभेत संख्याबळ सिद्ध होत नाही. आज १६२ आमदार असल्याचा कांगावा केला, पण १२५ आमदार तरी होते का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे.'

आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्ट सुनावणार निकाल

नवी दिल्ली : राज्यपालांनी दिलेली १४ दिवसांची मुदत रद्द करून तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निकाल सुनावणार आहे. मीच राष्ट्रवादीचा अधिकृत गटनेता असल्याचा दावा अजित पवारांच्या वतीने करण्यात आला. पवार कुटुंबात वाद असतील तर आम्ही ते मिटवू, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे स्पष्टीकरणही देण्यात आले. 

अजितदादांच्या बडतर्फीचे पत्र शरद पवारांकडे पेंडिंग, लवकरच निर्णय!


सूत्रांनुसार, पक्षविरोधी कारवायांमुळे अजित पवार यांची हकालपट्टी करावी, असा अहवाल राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीने अध्यक्ष शरद पवारांकडे दिला असून त्याची फाइल 'पेंडिंग' आहे. अजितदादांच्या बडतर्फीच्या पत्रावर लवकरच शरद पवार हे स्वाक्षरी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अजित पवारांचे पक्ष सदस्यत्व, पक्षाच्या असलेल्या सर्व जबाबदाऱ्या, गटनेतेपद आदी सर्व संपुष्टात येईल.

बातम्या आणखी आहेत...