आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया, सुप्रिया, रश्मी यांच्यामुळेच साकारली महाआघाडी; पण सरकारचा चेहरा मात्र पुरुषीच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे पितामह शरद पवार आहेत, यात कसलीच शंका नाही. मात्र, नव्या आघाडीमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

बुधवारी सर्व आमदारांनी शपथ घेतली, त्या विधानभवनावरील कार्यक्रमात तर सुप्रिया सुळे यजमानीण होत्याच, पण एकूण निर्णय प्रक्रियेतही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अजित पवारांचे बंड शरद पवारांनी अवघ्या काही मिनिटांत मोडून काढले, त्याच्या सूत्रधारही सुप्रिया होत्या. त्यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि शशिकांत शिंदे यांना या मोहिमेवर पाठवले. अजित पवारांसोबतचे आमदार परत आणण्यात त्यांचा वाटा मोठा होता. त्यानंतर अजित पवार परतल्यानंतर त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल, असा प्रयत्नही त्याच करत होत्या.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही टप्प्यावर शिवसेनेच्या मनात शंका उत्पन्न होऊ नये, यासाठी त्या कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत होत्या. शरद पवारांच्या 'ख्याती'मुळे, मोदी- शहांच्या प्रतिमांमुळे आणि एकूण घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे अखेरच्या क्षणापर्यंत संदिग्ध होते. उद्धव आणि आदित्य तरीही आपल्या निर्णयावर अखेरच्या क्षणापर्यंत अविचल राहिले, यात मोठा वाटा सुप्रियांचा होता. किमान समान कार्यक्रमासाठीही त्या काम करत होत्या. 

नव्या आघाडीमध्ये सुप्रियांची भूमिका मोठी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या बंडाने तर त्यांना आयती जागा मिळाली आहे. रोहित पवारांनाही या नव्या रचनेमध्ये महत्त्वाचे स्थान असणार आहे. काँग्रेसची सर्व सूत्रे सोनिया गांधींकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुप्रियांकडे आहे, तर रश्मी ठाकरेच सगळे निर्णय घेत होत्या, हे लपून राहिलेले नाही. पण, तरीही सरकारचा चेहरा मात्र पुरुषी आहे! नवी आघाडी तयार झाल्यानंतर जी बैठक झाली, त्यात सूचक वा अनुमोदक म्हणून महिला दिसल्या नाहीत. एकूण निर्णयप्रक्रियेतही महिला आमदार नव्हत्या. गुरुवारी वाजत- गाजत झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकाही महिलेला संधी मिळाली नाही. डॉ. नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड अशा तगड्या महिला नेत्या सर्व पक्षांकडे असल्या तरी एकूण निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश नसल्याचे सर्व बैठकांमध्ये जाणवत होते.