आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक... दु:खी दुकानदाराचा फोटो पाहून ग्राहकांची संख्या वाढली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास येथील मिसोरी सिटीमध्ये सोशल मीडियाच्या सकारात्मक प्रभावाचे उत्तम उदाहरण समोर आले. काही दिवसांपूर्वी येथे राहणाऱ्या बिलीच्या वडिलांनी त्याच्या नावावर बिलीज डोनट नावाने दुकान सुरू केले. या दुकानाबाबत ते खूप उत्साहित होते. लवकरच तेथे नव्या प्रकारच्या पेस्ट्रीज ठेवणार होते. पण काही दिवसांतच त्यांचा उत्साह मावळला. दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली होती. बहुतांश वेळा दुकान रिकामेच राहत होते. ते दिवसभर उदास होऊन तेथे बसून राहत. 


वडिलांची अशी स्थिती पाहून बिलीलाही दु:ख झाले. आपण ही नाराजी दूर करण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे त्याला वाटत असे. एक दिवस त्याने काउंटरवर बसलेल्या वडिलांचा उदास चेहरा कॅमेऱ्यात टिपला आणि दुकानाच्या पत्त्यासह ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर तो फोटो टाकला. ही पोस्ट पाहून जवळपास राहणारे लोक तरी दुकानावर येतील, असे त्याला वाटले. बिलीने बिलीज डोनट नावाच्या अकाउंटवरून पहिला फोटो टाकला तेव्हा त्याला केवळ ७१ फॉलोअर्स होते. पण काही दिवसांतच ही संख्या ५९,००० वर गेली. वडिलांचा फोटो सुमारे अडीच लाख लोकांनी ते रिट्विट केला. त्यांनी आनंदी व्हावे, असा संदेशही दिला. एवढेच नाही, तर या आठवड्याच्या अखेरीस अनेक लोक त्यांच्या दुकानात आले आणि भरपूर डोनट, पेस्ट्रीज, कोल्ड ड्रिंक खरेदी केले. सोशल मीडियातील अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या स्टोअरमध्ये आले. यात यूट्यूब स्टार कॅसी नॅस्टॅट आणि जेम्स वुड या अभिनेत्याचाही समावेश होता. 


बिली म्हटला की, मी दुकानावर पोहोचलो तेव्हा वडील खूपच बिझी झाले होते. आई त्यांना मदत करत होती. पण त्यांनी दररोज लागतात तेवढेच पदार्थ बनवले होते. एवढी मागणी वाढेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. बिलीने रविवारी वडिलांसोबत आणखी एक फोटो पोस्ट केला आणि सगळे डोनट १ वाजेच्या आतच संपल्याचे सांगितले. तसेच दुकान सुरळीत चालण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...