आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन राज्यांत लवकरच निवडणूक, तेथील घडामोडींचा वृत्तांत; महाराष्ट्र, झारखंड, हरियाणामध्ये ३९ मोठ्या नेत्यांनी केले पक्षांतर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला पक्षांतराचा घटनाक्रम अजूनही सुरू आहे. या वर्षीच्या अखेरीस महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. तिन्ही राज्यांत सध्या भाजपचे सरकार आहे. तेथे ३९ मोठ्या नेत्यांनी पक्ष बदलला आहे. जास्त फायदा भाजपला झाला. मोदी लाटेमुळे बहुतांश नेते भाजपमध्येच येत आहेत. तिन्ही राज्यांतील हे आहेत पक्षबदल करणारे नेते...

महाराष्ट्र : भाजपत ११ जणांनी, तर शिवसेनेत सात जणांनी केला प्रवेश
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पूर्ण सफाया झाला होता. काँग्रेस फक्त एक जागा जिंकू शकली. हा विजय काँग्रेसचा मानण्यात आला नाही, कारण सुरेश धानोरकर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते. आॅक्टोबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपकडे जात आहेत. गेल्या तीन वर्षांची चर्चा केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड, मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ, संग्राम जगताप, भरमू पाटील यांच्यासह १८ मोठे नेते भाजप आणि शिवसेनेत आले आहेत. सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादीचे झाले आहे. त्यात १२ नेते राष्ट्रवादीचे आहेत. इतर सहा नेते-आमदार काँग्रेसचे आहेत. या १८ पैकी ११ नेते भाजपमध्ये, तर ७ नेते शिवसेनेत गेले आहेत. भाजपची व्यूहरचना आक्रमक आहे. भाजपने राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांना पक्षात घेतले आहे. अहिर हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

झारखंड : ९ नेत्यांचा पक्षबदल, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रस्सीखेच

रांची - येथे जास्त स्पर्धा भाजपमध्ये सामील होण्यासाठी आहे. अलीकडेच हजारीबागचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप प्रसाद पाच हजार समर्थकांसह भाजपमध्ये आले. भाजपमध्ये येणाऱ्यांत सर्वाधिक संख्या झारखंड विकास मोर्चाच्या (झाविमो) नेत्यांची आहे. झाविमोचे माजी आमदार लक्ष्मण स्वर्णकार, केंद्रीय प्रवक्ता योगेंद्र प्रताप सिंह, नीलमदेवी, के. के. पोद्दार, अल्पसंख्याक मोर्चाचे केंद्रीय अध्यक्ष मुन्ना मलिक, अनुसूचित जमातीचे अध्यक्ष प्रभात भुइयां भाजपमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिकिटासाठी इच्छुक माजी खासदार मनोज भुइयां फेब्रुवारीत राजदतून भाजपमध्ये सामील झाले होते. तिकीट न मिळाल्याने ते आता झारखंड विकास मोर्चात सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) आमदार जयप्रकाश भाई पटेल भाजप-आजसूचा प्रचार करत होते. त्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले, ते सध्या कुठल्याही पक्षात नाहीत. पण ते भाजप किंवा आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनमध्ये (आजसू) सामील होतील, असे मानले जात आहे. माजी आमदार चंद्रिका महथांनीही झामुमो सोडून झाविमोत प्रवेश केला आहे.

हरियाणा : इंनॅलोच्या १० आमदारांसह १२ नेते भाजपमध्ये दाखल
चंदिगड - येथे सर्वाधिक नुकसान इंडियन नॅशनल लोकदलाला (इंनॅलो) झाले आहे. या पक्षाचे १० आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले आहेत. हरियाणात आॅक्टोबरमध्ये निवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी पक्ष बदलणाऱ्यांची यादी आणखी मोठी होऊ शकते, असे मानले जात आहे. इंनॅलोतून भाजपत जाण्याची सुरुवात आमदार रणबीर गंगवांपासून झाली. ते माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटालांचे खास मानले जात असत. त्यानंतर तर रांगच लागली. आतापर्यंत आमदार परिमंद्रसिंह ढूल, झाकीर हुसेन, केहरसिंह रावत, बलवानसिंह दौलतपुरिया, मक्खन सिंगला, रामचंद्र कंबोज, प्रोफेसर रवींद्र बलिया आणि नगेंद्र भडाना भाजपत आले आहेत. एक आमदार नसीम अहमद लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये आले, पण नंतर ते भाजपमध्ये गेले. त्याशिवाय इंनॅलोचे नेते आणि माजी मंत्री जगदीश यादव, पक्ष प्रवक्ता प्रवीण आत्रेय यांच्यासह इंनॅलोचे अनेक नेतेही भाजपमध्ये गेले आहेत. २०१४ मध्ये १९ आमदारांसह विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला इंनॅलो आता तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.