विधानसभा 2019 / आता मनसेही लढण्याच्या तयारीत; कार्यकर्ते आग्रही, अंतिम निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांचाच

लोकसभेला राज ठाकरेंनी आपला एकही उमेदवार निवडणुकीत उतरवला नव्हता

Sep 21,2019 08:13:46 AM IST

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विधानसभाही न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. परंतु पक्षातील राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्ष विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र रणधुमाळी सुरू होऊनही राज ठाकरेंनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत बैठक घेऊन निवडणूक लढवण्याबाबत अनुकूल भावना प्रमुख नेत्यांजवळ बाेलून दाखवल्या.


दरम्यान, मनसे १०० पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असून राज ठाकरे याबाबत लवकरच निर्णय घोषित करतील, अशी माहिती मनसेतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे सांगत निवडणुका का लढाव्यात असा प्रश्न काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला होता. परंतु पदाधिकारी निवडणूक लढवावी अशी मागणी राज ठाकरेंकडे करत होते. त्यानुसार राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. शुक्रवारी राजगड येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्याला राज ठाकरे उपस्थित राहून निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय जाहीर करतील असे सांगितले जात होते. परंतु राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक पार पडली.


1. राज ठाकरेंना देणार प्रमुख नेते अहवाल
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक लढवावी की नाही यावर चर्चा झाली होती. राज ठाकरे यांच्याशी आम्ही या बैठकीपूर्वी चर्चा केली होती. बैठकीत अनेक पदाधिकारी अहवाल घेऊन सोबत आले होते आणि त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना संध्याकाळी भेटून आम्ही अहवाल देणार आहोत. त्यानंतर ते याबाबतचा निर्णय घेतील.


कार्यकर्ते निवडणूक लढवण्याच्या बाजूने
2. मनसेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले, निवडणूक लढवण्याच्या बाजूने आमचा कल आहे. राज ठाकरे ईव्हीएमबाबत साशंक आहेत. ही निवडणूक ईव्हीएमवरच घेतली जाणार आहे. अमित ठाकरे हेदेखील प्रक्रियेत सहभागी असून त्यांची मतेही विचारात घेतली जातील, असेही बाळा नांदगवाकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर संध्याकाळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन त्यांना अहवाल सुपुर्द केला. केवळ पाच मिनिटातच ही भेट आटोपल्याचे समजते.

X