दक्षिण काेरिया ५ जी सेवा देणारा जगातील पहिला देश, व्हेरायझन कंपनीची ५जी सेवा ११ एप्रिलपासून

दिव्य मराठी

Apr 05,2019 10:49:00 AM IST

सियाेल - दक्षिण काेरिया आज व्यावसायिक ५ जी सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. सॅमसंगच्या नव्या ५ जी स्मार्टफाेनच्या लाँचिंगसाेबतच या नवीन सेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. सॅमसंग ही दक्षिण काेरियातील कंपनी आहे. सर्वात पहिल्यांदा ५ जी सेवा सुरू करण्यासाठी दक्षिण काेरिया, चीन आणि अमेरिकेमध्ये स्पर्धा हाेती.अमेरिकेतील 'व्हेरायझन' ही दूरसंचार कंपनी ११ एप्रिल राेजी दाेन शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू करणार आहे. चीनमधील काही निवडक शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरू झाली आहे.


दक्षिण काेरियातील अर्थव्यवस्था सातत्याने मंदावत असून २०१८ मध्ये या देशाचा वृद्धी दर सहा वर्षांच्या नीचांकी स्तरावर पाेहोचला हाेत. त्यामुळे देशातल्या स्मार्ट सिटीआणि चालकविरहित माेटार यांसारख्या क्षेत्रात ५ जी सेवेमुळे तेजी येईल आणि त्यायाेेगे आर्थिक विकासाला चालना मिळल अशी अपेक्षा दक्षिण काेरियाला वाटत आहे. दक्षिण काेरियातील दूरसंचार कंपन्यांपैकी एक एसके टेलकाॅमचे कार्यकारी उपाध्यक्ष रियू याेंग सांग यांनी सांगितले की, या सेवेमुळे अनेक क्षेत्रात फायदा हाेईल. गेमिंग क्षेत्रावर देखील याचा सकारात्मक परिणाम हाेण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफाेनवर तांत्रिक अडथळ्यांशिवाय गेम खेळता येऊ शकतील. ५ जी सेवेमुळे ग्राहकांना ४ जी च्या तुलनेत २० पट जास्त वेग मिळू शकेल.


भारतात पुढील वर्षात ५ जी सेवा सुरू हाेण्याचा अंदाज
५ जी सेवेसाठी येत्या जुलै महिन्यात स्पेक्ट्रम लिलाव हाेण्याची शक्यता आहे. स्पेक्ट्रम खरेदीनंतर कंपन्या पायाभूत सुविधा उभारतील त्यानंतर ५ जी सेवा सुरू हाेईल. भारतात पुढील वर्षात ५जी सेवा सुरू हाेऊ शकेल.

X