dangerous border / दक्षिण कोरियाने सर्वात धोकादायक सीमा पर्यटकांसाठी केली खुली

६६ वर्षांपासून सामान्य नागरिकांना, राजधानी सेऊलपासून हे ठिकाण ९० किमी अंतरावर  

वृत्तसंस्था

Jun 16,2019 10:53:00 AM IST

सेऊल - जगातील सर्वात धोकादायक सीमा पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. दक्षिण कोरिया व उत्तर कोरियादरम्यान ही सीमा असून जगातील सर्वात धोकादायक सीमा म्हणून आेळखली जाते. आता दक्षिण कोरिया सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवरील लष्करेतर क्षेत्रातील तीन भाग सामान्य नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी गँगवोन प्रांतातील चेरोवनमध्ये दुसरा भाग येतो. हा भाग देश-परदेशातील पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. आधीच या सरहद्दीवर पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चेरोवन दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलपासून सुमारे ९० किमी अंतरावर वसलेले आहे. दोन देशांतील शांती करारासाठी हा भाग खुला करण्यात आला. त्याची सुरुवात एप्रिलपासून झाली होती. त्यानंतर पर्यटक आठवड्यात २ दिवस दक्षिण कोरियाच्या सीमेवरून उत्तर काेरियाचा नजारा पाहू शकतात. एका वेळी एका जथ्थ्यात २० लोकांना सरहद्दीवर भटकंतीची संधी देण्यात आली आहे. दक्षिण कोरिया पर्यटन संघटनेकडून याविषयी ऑनलाइन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली .पर्यटकांना एरोहेड हिलवर कोरिया युद्धातील अवशेषही पाहता येतील.


> चेरोवन भागातील सरहद्दीवर शांतता सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १० हजारांहून जास्त लोक सहभागी झाले होते.
> दक्षिण कोरिया व उत्तर कोरियादरम्यान २५० किमी क्षेत्र डिमिलटराइज्ड झोन आहे.

कोरियन युद्ध : १९५० ते १९५३ पर्यंत चाललेल्या लढाईत दक्षिण कोरिया व उत्तर कोरियाचे ७ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. २५ लाख सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले होते.

डिमिलिटराइज्ड झोन : ६६ वर्षांपासून डिमिलिटराइज्ड झोनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी आहे. दोन्ही देशांत केवळ एक ठिकाण आहे, येथे भेट देता येत होती.

शांती चर्चा : गतवर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई इन व उत्तर कोरियाचे शासक किम जाँग उन यांची शांतता चर्चा झाली होती.

जगातील सर्वात धोकादायक सरहद्दी
देश सीमा एकूण अंतर
द. कोरिया व उ. कोरिया डी मिलेट्राइज्ड झोन 250 किमी
भारत व पाकिस्तान आईबी 2900 किमी
इस्रायल व पॅलेस्टाइन ग्रीन लाइन 708 किमी

X
COMMENT