आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादेत ‘स्पा’: तावडेंना सापडेना मुख्यमंत्र्यांच्या घाेषणेचा संदर्भ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ अाैरंगाबाद - ‘इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ मॅनेजमेंट’ (अायअायएम) ही अाैरंगाबादला हाेऊ घातलेली राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्था नागपूरला पळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबदल्यात अाैरंगाबादेत ‘स्कूल अाॅफ प्लॅनिंग अँड अार्किटेक्चर’ (स्पा) ही संस्था उभारण्याची घाेषणा २०१४ मध्ये विधिमंडळात केली हाेती. तसेच ९ डिसेंबर २०१७ राेजी अाैरंगाबादेत विधी विद्यापीठाच्या उद‌्घाटन कार्यक्रमातही त्यांनी तसे जाहीरही केेले. मात्र गेल्या ४ वर्षांत ही संस्था उभा राहू शकलेली नाही.

 

या संदर्भात स्थानिक अामदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला असता उच्च शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी त्याला अजबच उत्तर दिले. ‘२०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अाैरंगाबादेत केलेल्या घाेषणेचा अद्याप संदर्भच सापडलेला नाही,’ असे लेखी उत्तर देऊन ते माेकळे झाले.   


या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणालेे, ‘अाैरंगाबादला ‘स्पा’ सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांपूर्वीच विधिमंडळात घाेषणा केलेली अाहे. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करत असते. भोपाळ आणि विजयवाडा येथे यापूर्वी ‘स्पा’ स्थापन झालेली आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशात नवीन १८ ‘स्पा’ स्थापन करण्याची तरतूद केली अाहे. यात राज्याला मिळालेले एकमेव स्पा स्कूल लवकरात लवकर स्थापन व्हावे, यासाठी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग केंद्रीय तंत्रशिक्षण विभागाशी कायम समन्वय राखून आहे. त्यासंदर्भात मागच्या महिन्यात केंद्र सरकारला आम्ही एक स्मरणपत्र पाठवलेले आहे.’

 

खासदारांनी करावेत केंद्राकडे प्रयत्न  
गेल्या ४ वर्षांत ‘स्पा’चीही अाश्वासनपूर्ती हाेत नाही. मी याबाबत  प्रश्न विचारला हाेता, मात्र सभागृहात अाज गाेंधळ सुरू असल्याने मंत्र्यांच्या उत्तरावर उपप्रश्न विचारता अाले नाहीत. हा विषय केंद्राकडे असल्याचे राज्य सरकार सांगते. त्यामुळे अाता अाैरंगाबादच्या खासदारांनी संसदेत हा विषय उपस्थित करून ही संस्था अाैरंगाबादेत अाणण्यासाठी प्रयत्न करावेत.  
- सतीश चव्हाण, अामदार, राष्ट्रवादी  

 

पुणे, नागपूरही अाैरंगाबादच्या स्पर्धेत  
स्पा’साठी नागपूर, पुण्यातूनही मागणी हाेत अाहे. मात्र ही संस्था अाैरंगाबादेत व्हावी, अशी मागणी अाम्ही गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन केली. राज्य सरकारकडेही पाठपुरावा करत अाहाेत. मात्र  मंत्रालयातून मोघम उत्तरे देण्यात अाली. अाधी अायअायएम येणार हाेते, ते न मिळाल्याने अाता किमान ‘स्पा’ तरी यायला हवे. चार वर्षात या सरकारने मराठवाड्याला काहीही दिले नाही. जाताना तरी काहीतरी देऊन जावे.  उगाच  तोंडाला पाने पुसू नयेत.
सुनील भाले, अध्यक्ष, अार्किटेक्चर संघटना, अाैरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...