आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा 10 वीचा निकाल रोखला; विधानसभा अध्यक्ष चिमुकलीसह शिक्षण मंडळात, आश्वासन न मिळाल्याने संताप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद- 
अंजली भाऊसाहेब गवळी ही चिमुकली शुक्रवारी अचानक माध्यमांच्या केंद्रस्थानी आली. कारण म्हणजे अंजलीसाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सायंकाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळात दाखल झाले. 
शहराजवळील पिंपळगाव पांढरी गावातील अंजली दहावीची विद्यार्थिनी, तिच्या हिंदी विषयाच्या उत्तर पत्रिकेतील एक पान फाडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मंडळाने तिचा निकाल राखून ठेवला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बागडे हे दोन तास विभागीय सचिव सुगाता पुन्ने यांच्यापुढे बसून राहिले. त्यांना बागडे यांनी जाब विचारला, धारेवर धरले. यावेळी पुन्ने या अक्षरशः रडल्या, मात्र नियमांपुढे आपल्याला जाता येत नाही, तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा, असे सांगत त्यांनी अंजलीबाबत बागडेंना  कुठलेही आश्वासन, दिलासा दिला नाही.


अखेर हरिभाऊ बागडे यांनी अंजलीची सुनावणी आता मुख्यमंत्र्यांपुढे होईल आणि त्यांनाच सांगून मंडळाचे कायदे विद्यार्थी हितासाठी तयार केले आहेत की त्यांच्या नुकसानासाठी, असा जाब विचारला जाईल, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. आता अंजलीची मुख्यमंत्र्यांपुढे सुनावणी होणार असून त्यासाठी बागडे हे प्रयत्न करणार आहेत. आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून नाही तर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने अंजलीचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मंडळात धावून आलो आहोत, असे बागडे यांनी माध्यमांना सांगितले.