आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेतून बोलत असल्याचे सांगून वळते केले साठ हजार, २० मिनिटांत तक्रार केल्याने वाचली रक्कम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेतून बोलत असल्याचे सांगत गंगापूर तालुक्यातील कनकुरीमधील अमोल प्रदीप पवार यांच्या बँक खात्यातून काही मिनिटांमध्ये ५९ हजार ९६९ रुपये वळते झाले. सोबतच्या मित्राला त्याने हा प्रकार सांगताच दोघांनी २० मिनिटांत गंगापूर पोलिस ठाणे गाठले. गंगापूर पोलिसांनी सायबर पोलिसांना ही तक्रार पाठवताच तासाभरात तपासाची चक्रे फिरवत तरुणाचे सर्व पैसे चोराच्या हातात जाण्यापासून वाचले. ८ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते दोन वाजेच्या सुमारास ही सर्व घटना घडली.   पवार काही कामानिमित्त मित्रासोबत गंगापूरला गेले होते. दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी त्यांना एका अज्ञात क्रमांकावरुन कॉल आला. मी बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्याने पवार यांच्याकडून एटीएम कार्डची सर्व माहिती घेतली. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी मागून घेतला. काही वेळात त्यांच्या खात्यातून तीन टप्प्यांमध्ये ५९ हजार ९६९ रुपये वळते झाले. त्यांनी २० मिनिटांत गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. गंगापूर पोलिसांनी देखील सायबर पोलिसांना तक्रार पाठवली. त्यानंतर सायबर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आवश्यक कारवाई करत आरोपीच्या हातात पैसे जाण्यापासून थांबवले. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक एम. एम. सय्यद, कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश मोईम, सविता जायभाय, योगेश तरमाळे, लखन पचोळे, योगेश दरवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड यांनी कारवाई केली.  

सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर पवार यांना परत मिळणार पैसे
 

पैसे कुठे गेले याची माहिती तपासून त्वरित उचलली पावले
पवार यांची तक्रार प्राप्त होताच विभागातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पैसे नेमके कुठे वळते झाले, याची माहिती तपासली. मेसेजमध्ये एका वाॅलेट कंपनीचा उल्लेख होता. काही महिन्यांपासून ग्रामीण सायबर पोलिसांनी राज्यभरातील महत्त्वाच्या वॉलेट कंपन्या, बँक व इतर व्यवहाराच्या पोर्टलचे नोडल अधिकारी, मुख्य कार्यालयाचे संपर्क क्रमांक, माहिती जमा केेली आहे. त्यांचा एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील तयार केला आहे. सायबर पोलिसांनी तत्काळ वळते झालेल्या कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करुन या प्रकरणाची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी माहिती घेत त्या वॉलेट खात्याची माहिती घेतली व तत्काळ वळते झालेले खाते ब्लॉक केले. त्यामुळे पवार यांचे पैसे आरोपीच्या हाती लागणार नाहीत. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ते पैसे पवार यांना परत मिळतील.
 

५ लाख परत मिळवून दिले
आतापर्यंत सायबर पोलिसांनी याच कार्यपध्दतीमुळे जानेवारी महिन्यापासून तक्रारदारांचे ५ लाख १९ हजार १८३ रुपये परत मिळवून दिले आहेत. २०१८ मध्ये १४ लाख ३० हजार रुपये वाचवून परत मिळवून दिले.
 

बातम्या आणखी आहेत...