आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: निवडणुकीपूर्वीची लोणकढी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धुरळ्यात नरेंद्र मोदी यांनी अनेक ५६ इंची तगडी आश्वासने दिली. लवकरच पुन्हा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे अगोदर दिलेल्या आश्वासनांचा हिशेब खंगाळताना पूर्ण न केलेल्या मुद्द्यांना काय मुलामा देता येईल, याचीच प्रमेये भाजपची नेतेमंडळी सध्या साेडवत आहेत. शेवटच्या घटकेला लोकांना कसे बनवता येईल, असा त्यांचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नांना धरून केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी एक लाेणकढी थाप मारली. मोदी यांनी जी अनेक आश्वासने दिली, त्यातीलच एक देशात सर्वत्र अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्याचे आश्वासन होते. प्रत्येकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी ही बाब. मात्र त्या दिशेने जे काही केले, त्यातून काय साधले? शहर, गाव पातळीवर वस्तुस्थिती काय? याची पडताळणी न करता ऊर्जामंत्र्यांनी थाप ठोकली ती अशी, ‘एक एप्रिलपासून देशात सर्वत्र अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होईल.’  परंतु, तीन महिन्यांत स्थिती एकदम पालटून ऊर्जामंत्र्यांना हवा असलेला बदल प्रत्यक्षात येईल, याची सुतराम शक्यता नाही. तरीही ते आपल्या शब्दावर ठाम आहेत. अखंडित पुरवठा करण्यासाठी कमतरता असेल तर जी राज्ये अन्य राज्यांकडून वीज खरेदी करण्यास टाळाटाळ करतील, मुद्दामहून भारनियमन व शहर, गावातून अंधार पसरवतील अशा राज्यांतील वीज वितरण कंपन्यांना भारी दंड आकारण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांचे आहेत. फक्त तांत्रिक बिघाड किंवा नैसर्गिक संकटामुळे पुरवठा खंडित झाला तरच दंडातून सूट दिली जाईल. केवळ दंडाची धमकी दिल्याने वर्षानुवर्षांचा अखंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटणार नक्कीच नाही. तरीही ऊर्जामंत्री रेटून सध्या सगळीकडे बोलत आहेत. ही मांडणी करताना ‘सर्वांसाठी वीज’ यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार यांच्यात गेल्या मार्च महिन्यात झालेल्या कराराचा आधार ते सांगतात. ऊर्जामंत्री रेटून काहीही सांगत असले तरी त्यांना निवडणुकीपूर्वी शब्दपूर्तीची घाई झाली आहे, असेच दिसते. मग गावांतून, शहरांतून वस्तुस्थिती काही का असेना. 

 
औद्याेगिक उत्पादन, आरोग्य सुविधा, दळणवळण अशा मानवी जीवनाशी निगडित बहुतांश गोष्टी ऊर्जेवरच चालत असल्याने श्वासानंतर विजेच्या उपलब्धतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती जर नसेल तर सगळा गावगाडा थांबतो. एक-दोन क्षेत्रे वगळून बाकी सर्व क्षेत्रांना अखंडित विजेची गरज आहे. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना ती नको आहे, त्यात ते शेतीचा समावेश करतात. शेतीसाठी २४ तास विजेची गरज नसते, असा त्यांचा दावा आहे. शेतीसाठी अपुरा, अनियमित व अवेळी वीजपुरवठा हा नेहमीच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विषय आहे. शेतात जेव्हा पाणी उपलब्ध आहे तेव्हा पिकांना ते द्यायला वीजपुरवठा वेळेवर होईलच याची खात्री नसते. ‘दात आहेत तर चणे नाहीत’ असे अनेकदा होते. भारतातील ७० टक्के लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे. शेती आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना असलेली विजेची गरज यासाठी दोन वेगवेगळ्या यंत्रणा नाहीत. एकाच यंत्रणेतून दोघांनाही वीजपुरवठा होतो. ग्रामीण भागातून फिरताना गावेच्या गावे अंधारात असल्याचे आपण पाहतो. रात्री केव्हाही वीज येते. तेव्हा शेतकऱ्याला पाटाने पाणी देताना दारे धरायला जावेच लागते. या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कोणी लक्ष देत नाही. शेतीला २४ तास विजेची गरज नाही असे म्हणत असताना देशातला बहुतांश भाग आपण अंधारात ठेवत असल्याची कबुली ऊर्जामंत्री देत आहेत. केवळ खेडेगावच नाही तर शहरी भागही भारनियमनापासून सुटलेला नाही. अगदी आजही नवी मुंबईच्या काही भागाला भारनियमनाचा अनुभव घ्यावाच लागतो. मुंबईच्या जवळ ही अवस्था तर इतरांचे विचारायलाच नको. खांब आहेत तर तारा नाहीत, दोन्ही आहेत तर पुरवठा नाही. अशा अडकित्त्यात लोक अडकून आहेत.  

 

पुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी आकडा टाकून होणारी वीजचोरी रोखण्यासाठी बंदिस्त (कन्सिल्ड) तारा टाकणे, स्मार्ट मीटर, वीज बिल आकारणी, वसुली यात सुधारणा केली आहे. मोबाइल रिचार्जप्रमाणे खिशाला परवडतील एवढे पैसे  देण्याची व्यवस्था गरिबांसाठी केल्याचे ऊर्जामंत्री सांगतात. एवढे केल्यानंतर वीजपुरवठ्यातील तुटीचे प्रमाण २१.८  टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काही राज्यांतील तूट कमी झाली. पण तेवढी पुरेशी नाही. तर काही राज्यांतील तूट पूर्वीपेक्षा वाढली आहे. ऊर्जामंत्र्यांनी अाणखी एक धक्कादायक कबुली दिली. होणाऱ्या तुटीमधील १५ टक्क्यांपेक्षा जास्त बोजा ग्राहकांच्या डोक्यावर न टाकण्याची मर्यादा घातली आहे. त्याच्यावरचा हिस्सा राज्यांनी सोसायचा आहे. याचा अर्थ असा की, तोट्यातील १५ टक्के रक्कम ही जे ग्राहक नियमितपणे वीज बिल भरतात त्यांच्या खिशातून आम्ही वसूल करतो. हे प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय करणारे आहे.