आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवल्या बंदुका, झाडं-माणसं जगवण्यासाठी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वोत्तर भारताच्या विकासाची खूणगाठ पटवणारी सगळीच काही पावलं सरकारनं टाकलेली नाहीत, ती पटवणाऱ्या असंख्य व्यक्ती, असंख्य संस्था यांनी आपली अनमोल आयुष्ये यासाठी खर्ची पाडली आहेत आणि मुख्य म्हणजे त्यासाठी त्यांनी ना सरकारी यंत्रणांची मदत घेतली आहे, ना त्यांच्यावर अवलंबून राहून त्यांनी हा आयुष्याचा सेवायज्ञ एक-दोन नव्हे, तर चांगला पाचेक दशकांपासून मांडला आहे. त्या सेवायज्ञाचा एक अनोखा प्रत्यय नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. 

 
हा कार्यक्रम होता 'माय होम इंडिया' नावाच्या संस्थेनं आयोजित केलेला - कर्मयोगी पुरस्कार प्रदानाचा. 'माय होम इंडिया' ही संस्था पूर्वांचलात कार्यरत असलेल्या सुनील देवधर यांनी सुमारे १३ वर्षांपूर्वी स्थापन केलेली. 'सपनों से अपनों तक' हा त्यांचा एक प्रकल्प. आईवडिलांपासून दुरावलेल्या, प्रसंगी रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेल्या किंवा भयानक दारिद्र्याशी संघर्ष करण्याकरता गाव सोडून मोठ्या शहरात आलेल्या निराधार मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काम करणारी ही संस्था. आजवर अशा दोन हजारांहून अधिक मुलांना स्वगृही सुखरूप पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम या संस्थेनं केलं आहे. त्याशिवाय वर उल्लेखिल्याप्रमाणे घरदार, नोकरी-उद्योग, मुलं-संसार याची फारशी फिकीर न करता आपलं सारं आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या व्यक्तींना कर्मयोगी पुरस्कार देऊन त्यांचा जाहीर गौरवही केला आहे. २०१३ मध्ये या पुरस्काराला सुरुवात झाली आणि गेल्या पाच वर्षांत दीपक बारठाकूर (आसाम), जोराम बेगी (अरुणाचल प्रदेश), नटवर भाई ठक्कर (नागालँड), लालथेंग लिआना (मिझोराम) यांना गौरवण्यात आलं तर परवाच्या शनिवारी निवृत्त कॅप्टन अशोक टिपणीस आणि त्यांची नागा पत्नी अंगम टिपणीस (राजश्री) यांना सन्मानित करण्यात आलं. अशोक टिपणीस हे मूळचे छत्तीसगडमधल्या रायपूरचे. ते आणि त्यांचे दोघे बंधू सतीश तसेच अनिल यांनी लष्करात दीर्घकाळ सेवा केली. अनिल हे तर कारगिल युद्धाच्या काळात भारतीय हवाई दलात एअर चीफ मार्शल म्हणून कार्यरत होते. 

 

अशोक टिपणीस आणि त्यांच्या नागा पत्नीनं लष्करातील नोकरी संपल्यानंतर याच भागात राहायचं आणि देशासाठी, समाजासाठी, मणिपूरच्या जनतेसाठी कार्य करत राहायचं असं ठरवलं. त्यालाही आता सुमारे ३६ वर्षं झाली. मणिपूरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला असताना उखरूलसारख्या अशांत क्षेत्रात जाऊन तिथे स्थायिक व्हायचा आणि तरुणांना हिंसक मार्गापासून वळवून रचनात्मक मार्गावर नेण्याचा प्रयत्न 'व्हॉलंटियर्स फॉर व्हिलेज डेव्हलपमेंट' नावाच्या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेमार्फत सुरू केला. 

 

टिपणीस भारतीय लष्करात दाखल झाले ते १९५७ मध्ये आणि त्यांनी निवृत्ती घेतली ती १९६५ मध्ये. मधली दोन वर्षं त्यांनी मध्यपूर्वेत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलातही काम केलं. १९६६ मध्ये निवृत्तीनंतर त्यांची सीआरपीएफमध्ये निवड झाली आणि १९७२ मध्ये ते तिथूनही कमांडर म्हणून सेवानिवृत्त झाले. याच काळात राष्ट्रपती पदकानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. नागा-कुकी वांशिक दंगलींच्या काळात टिपणीसांनी तिथेही काम केलं आणि २००१ मधल्या भूजच्या भूकंपानंतर तिथे जे पुनर्वसन कार्य उभं राहिलं त्यासाठीही उभयतांनी सेवा बजावली. 

'व्हॉलंटियर्स फॉर व्हिलेज डेव्हलपमेंट'च्या माध्यमातून गेल्या ३६ वर्षांत टिपणीस दांपत्यानं सामाजिक-आर्थिक क्षेत्रात अनेक कामं केली. त्यात रोजगारनिर्मिती, स्थानिक प्रशासनाचं सुशासन, कृषी उत्पादकता वाढीचे प्रयोग, जंगलनिर्मिती, स्वच्छता आणि कचरा निर्मूलन, पर्यावरण दक्षता, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन आणि जलपुनर्भरण, पशुसंवर्धन, फलोत्पादन, कलासंवर्धन अशा अनेक कामांचा त्यात अंतर्भाव होता. टिपणीस पती-पत्नीनं हे केलंच, परंतु त्यांचे दोघे मेहुणेही यात सहभागी होत राहिले, त्यामुळे कामाला वेगही आला आणि विस्ताराची दिशाही लाभत गेली. हा पुरस्कार द्यायला देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि त्रिपुराचे उपमुख्यमंत्री विष्णू देववर्मा उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेची भावना मनात ठेवून टिपणीस दांपत्यानं केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख तर उभयतांनी केलाच, परंतु दहशतवादानं आणि अतिरेकी कारवायांनी मणिपूर पोखरला गेला असताना समाजातील चांगल्या प्रवृत्तींना एकत्र जोडत त्यांनी जे काम उभं केलं ते निश्चितच कौतुकाचं म्हणावं लागेल. 

******** 


टिपणीस दांपत्यानं केलेल्या कामासारखंच आणखी एक रचनात्मक काम गुवाहाटीजवळ उभं राहिलेलं, पण त्याचं वेगळेपण असं की ते घडवून आणणारी ३५ जणांची फौज दहशतवाद सोडून विधायक मार्गाकडे वळलेली, बंदुका सोडून नांगर हाती धरलेली, कुदळ-फावडं हाती घेऊन जंगल उभं करायला निघालेली. 

 

या कामाला निमित्त झालं ते बेकायदा जंगलतोडीचं. गुवाहाटीपासून १०० किमी अंतरावर उदलगिरी जिल्ह्यात असलेलं साडेबावीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं भैरवकुंड आरक्षित जंगल बेसुमार जंगलतोडीला बळी पडलं. ८० च्या दशकात तर स्थिती अशी उद््भवली की एकेकाळी अभयारण्य म्हणून ओळखलं जाणारं हे जंगल पार ओसाड पडलं. परिणामी मानव आणि प्राणी यांच्यात संघर्ष उद््भवू लागले. अर्थातच जंगलावर आक्रमण केलं ते मानवानं आणि स्वाभाविकपणेच जंगलातील हत्ती आणि माणसांमध्ये संघर्ष उभा राहू लागला. हत्ती खाद्यासाठी जंगलाबाहेर पडू लागले, माणसाला त्याचा त्रास होऊ लागला आणि त्यातून सुरू झाली हत्तींची निर्घृण हत्या. 

 

ही हत्या रोखणं आणि जंगलाचं निसर्ग-संतुलन संवर्धित करणं यासाठी पुढाकार घेतला तो बोडो जमातीतील ३५ जणांच्या एका गटानं. हे सारे हिंसेचा त्याग करून, बंदुका खाली ठेवून रचनात्मक मार्गाकडे वळले. शस्त्र खाली ठेवणं आणि सरकारी पुनर्वसन शिबिरात दाखल होणं हा एक पर्याय होताच, पण या गटानं विचार केला तो आपल्याच ताकदीवर मार्ग काढण्याचा. त्यांनी सरकारशी संपर्क साधला, जंगलातली सुपीक जमीन ५० वर्षांच्या करारानं शासनानं शेतीसाठी द्यावी, असा प्रस्ताव ठेवला. बंदुका खाली ठेवून दहशतवादी स्वतःच्या पायावर उभे राहत असतील तर चांगलंच आहे असा विचार शासनानं केला आणि सुरू झाली पोटापुरती शेती. 

 

याचदरम्यान त्यांच्या संपर्कात आले भैरवकुंडात फॉरेस्ट रेंज ऑफिसर म्हणून सेवा बजावत असलेले नाबाकुमार बोर्दोलाई. शेती करून उरलेल्या वेळात निर्वृक्ष बनलेल्या जमिनीवर झाडं लावण्यासाठी नाबाकुमारांनी त्यांना प्रवृत्त केलं आणि चमत्कार घडला. २००७ ते २०११ दरम्यान ही वृक्षलागवड पार पडली. बोर्दोलाई यांनी शासनाची मदत मिळेल असं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात फारसं काहीच हाती लागलं नाही. वृक्ष लागवडीचं लोण मग सरकारी मदतीविना आसपासच्या सहा गावांत पसरलं. झाडं तोडण्यापासून जे उत्पन्न मिळेल ते गावकऱ्यांनी आणि या तरुणांनी अर्ध अर्ध वाटून घ्यायचं असं उभयपक्षी ठरलं होतं, पण झाडं जसजशी मोठी होत गेली तसतसं झाडांविषयीचं प्रेम वाढत गेलं आणि झाडं तोडायची नाहीत, त्यापासून मिळणारं फळांचं उत्पन्न वाटून घ्यायचं, त्यावर आधारित लघु उद्योगांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरलं. 

आज या मंडळींनी बांधलेले कालवे जंगलाला पाणी उपलब्ध करून देताहेत. मानव-प्राणी यांच्यात संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करताहेत. आज हत्तींबरोबरच वाघ, चित्ते, मुंगूस, कोब्रा, हरीण, जंगली अस्वलं, सर्प, पक्षी यांनी हे जंगल भरून गेलं आहे. दहशतवादाकडे वळणाऱ्या तरुणाईला विधायक, रचनात्मक कामाचा मार्ग दाखवला तर चमत्कार घडू शकतात हे जयप्रकाश नारायणांपासून अनेकांनी याआधी घडवून दाखवलं आहे. बोडो जमातीतल्या तरुणाईनं परिसरातल्या निसर्गाचा ऱ्हास पाहिला आणि यावरचा मार्ग आपणच काढला पाहिजे हे त्यांच्या मनानं घेतलं. टिपणीस दांपत्याचं अभिनंदन समारंभपूर्वक होत असताना, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता सुरू असलेलं हे जंगल वाचवण्याचं आणि निसर्गातलं संतुलन राखत मानव-प्राणी यांच्या सहजीवनाचं सूत्र वृद्धिंगत करण्याचं काम निश्चितच गौरवण्यासारखं ठरावं. 
 
'व्हॉलंटियर्स फॉर व्हिलेज डेव्हलपमेंट'च्या माध्यमातून गेल्या ३६ वर्षांत टिपणीस दांपत्यानं सामाजिक-आर्थिक क्षेत्रात अनेक कामं केली. त्यात रोजगारनिर्मिती, स्थानिक प्रशासनाचं सुशासन, कृषी उत्पादकता वाढीचे प्रयोग, जंगलनिर्मिती, स्वच्छता आणि कचरा निर्मूलन, पर्यावरण दक्षता, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन आणि जलपुनर्भरण, पशुसंवर्धन, फलोत्पादन, कलासंवर्धन अशा अनेक कामांचा त्यात अंतर्भाव होता. 
 

बातम्या आणखी आहेत...