आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: जळगावात गुंडाराज...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा कापूस, केळी, कविता आणि सोनं यासाठी देशभर ओळखला जातो. जिल्ह्याची ही एक चमकदार बाजू असली तरी दुसरी काळी बाजूही आहे. सिमीच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांचे धागेदोरे जळगावात आढळले होते. तरुण मुलींना नादी लावून त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार करणारे सेक्स स्कँडलही याच जळगावात घडले. त्यामुळे जळगावची जी बदनामी व्हायची ती झाली होती. सुवर्णनगरीला काळिमा फासणारे दुसरे-तिसरे कुणी नसून याच जळगावातील झारीतले शुक्राचार्य होते. त्यापैकी अनेकांना राजकीय वरदहस्त होता. त्यातून काही गुन्ह्यातून सुटले, काहींना जेल झाली. काही निर्दोष मुक्त झाले. काही तरुणींचे आयुष्यही बरबाद झाले. मधल्या काळात सुरेशदादा जैन यांच्या राजकीय दबदब्यामुळे आणि नंतर घरकुल घोटाळ्यामुळे जळगाव चर्चेत आले. तसं जळगाव गुंडगिरी आणि खंडणीबहाद्दरांमुळेही चर्चेत होते. गुंडगिरी आणि खंडणी वसूल करणे हा काहींचा पिढीजात धंदाच झाला होता. याच जोरावर गुंडांनी राजकारणातही प्रवेश केला. हळूहळू ते व्हाइट काॅलर क्रिमिनल बनले. अनेकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे राजकारणातील बड्या नेत्यांना गुंडांचा सहारा मिळू लागला. त्यातून गट-तट आणि राजकीय वैमनस्य वाढले. आर्थिक गुन्हेगारीही वाढीस लागली. काहींचे वैमनस्य एवढे टोकाला गेले की त्यातून निर्घृण खून झाले. २० वर्षांपूर्वी बापू ढंढोरे यांचा अशाच वादातून खून झाला. 

 

दरम्यान, टोळीयुद्धाच्या घटना अधूनमधून सुरू होत्याच. तथापि, मधल्या काही काळात शांत झालेले जळगाव गेल्या चार-पाच वर्षांतील घटना पाहता पुन्हा गुंडांच्या तावडीत सापडते की काय, असे वाटायला लागले आहे. पाच वर्षांपूर्वी नगरसेवक विनायक सोनवणे यांचा असाच पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. प्रशांत सोनवणे या युवकाचाही खून झाला होता. संशयितांना न्यायालयाने निर्दोष सोडले; पण खुनाला टोळीयुद्धाचीच किनार होती. राजकीय वैमनस्यातून जसे हे खून झाले, तसे अलीकडे वाळूमाफियांमधील वादानेही बळी घेतले. वर्षअखेरचा दिवसही भाजप नगरसेविकेच्या पतीचा खून करण्याच्या कटकारस्थानाचाच ठरला. शेतात जाणाऱ्या संतोष पाटील यांच्यावर मोटारसायकलीवरील दोघांपैकी एकाने गोळी झाडली. यात पाटील यांना गोळी चाटून गेली. ते जखमी झाले. पण त्यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी पिस्तूल काढल्यामुळे आरोपी पळाले आणि त्यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेमुळे शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

 

संतोष पाटील यांनी आपले पूर्वीचे वैर असलेल्या हटकर कुटुंबीयांचे नाव घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. भाडोत्री गुंडांमार्फत हा खून करण्याचा कट होता, असे तपासात पुढे येत आहे. जळगावात वर्षाच्या शेवटच्या दिवसाची सकाळ गोळीबार करून खून करण्याच्या प्रयत्नाने झाली, तशी रात्र डान्स बारने रंगली होती. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ममुराबाद शिवारात फार्म हाऊसवर धांगडधिंगा सुरू होता. एका बड्या राजकीय व्यक्तीचे हे फार्म हाऊस असल्याचे बोलले जाते. बऱ्हाणपूर येथील तरुणींसह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगावात डान्स बार सुरू करण्याचाच हा घाट असल्याचेही बाेलले जाते. एकंदरीत सेक्स स्कँडल, सिमीची कारवाई या घटना जळगावकरांच्या विस्मरणात गेल्या. पण २०१९ च्या गोळीबार आणि डान्स बारने पुन्हा त्या वाईट घटनांची आठवण करून दिली. चमकणाऱ्या जळगावची काळी बाजू पुन्हा उघड झाली आहे. फार्म हाऊस कोणत्याही बड्या राजकारण्याचे असले तरी पाेलिसांनी ते छापा घालून उघड केले आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणीही एवढे धाडस करू शकत नाही. जळगावच्या राजकारणात गुंडांचे स्थान बळकट करण्याची स्पर्धाच जणू राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. 

 

आपले संख्याबळ आणि मसल पाॅवर वाढवण्यासाठी नेते हे उपद्व्याप करत आहेत. पालिका, महापालिका निवडणुकांमुळे हेच पाहायला मिळाले आहे. पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या नावाखाली समाजस्वास्थ्य बिघडत असल्याचे भान या नेत्यांनी ठेवावे. गुंडांना राजकारणात प्रवेश आणि नंतर त्यांचे संरक्षण करण्याच्या हट्टातूनच कुठे टोळी युद्धाचा भडका उडून गोळीबारासारख्या घटना घडतात, कुठे तरुणींना नाचवण्याचे धाडस दाखवले जाते. जळगावातील गुंडाराज संपवायचे असेल तर मंत्री गिरीश महाजन असोत की नाथाभाऊ खडसे यांनी पोलिसांना पाठबळ दिले पाहिजे. अन्यथा खून, गोळीबार आणि डान्स बारसारख्या प्रकरणांना आळा बसणार नाही, हे तेवढेच सत्य आहे.