आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: धनुष्यबाणाचा वेध...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा वेध घेत शरसंधान केले खरे, मात्र त्यामुळे भाजप घायकुतीला येणार का? हा खरा प्रश्न अाहे. गेल्या २५ वर्षांतील युतीची वाटचाल पाहता शिवसेनेला भाजपने गृहीत धरलेले नव्हते अाणि टीकेला कधी फारशी किंमत दिली नव्हती, अाताही यापेक्षा निराळी भूमिका दिसत नाही.

 

२०१४ च्या लाेकसभा निवडणुकीतील माेदी लाटेने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलवली. त्यामुळे साधारणपणे गेली साडेचार वर्षे भाजपचा ‘अजेय रथ’ चाैखूर उधळत राहिला. शिवसेना साेबत नसली तरी विराेधकांना सहज गारद करू, असा अात्मघाती विश्वास भाजपेयींमध्ये दुणावला. मात्र, भंडारा-गाेंदिया अाणि पालघर लाेकसभा पाेटनिवडणुकीतील निकालाने फाजील अात्मविश्वासाच्या हवेवर उडणारे भाजपचे विमान जमिनीवर अाणले. त्यातच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभांच्या निकालांनी डाेळे उघडले. अशा बिकट परिस्थितीत भाजपला महाराष्ट्राकडून लाेकसभेच्या जास्त जागांची अपेक्षा असणे साहजिकच अाहे. त्यासाठी शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्नही सुरू अाहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्ता स्थापनेचा मार्ग खुला करून देणे, शासकीय महामंडळावर दिलेले झुकते माप अाणि विधानसभेचे उपाध्यक्षपद या मागील हेतू ताेच हाेता. भाजपकडून युतीची अास दाखवली जात असली तरी त्यातला गर्भितार्थ शिवसेनेने नक्कीच अाेळखला अाहे. चंद्रभागातीरी घुमलेल्या प्रत्यंचेच्या टणत्कारातून त्याची प्रचिती येते. शिवाय उद्धव ठाकरेंनी संयतपणे भाजपचा मर्मभेद करत युतीसाठी कवाडे खुली असल्याचा संकेत देण्याचीही संधी गमावली नाही, हे तितकेच खरे. लाेकसभेसाठी युती करून केंद्रात सत्ता मिळवायची अाणि विधानसभेसाठी स्वबळाचा नारा देत शिवसेनेला अासमान दाखवायचे हा भाजपचा मनसुबा गुलदस्त्यात राहणे तसे शक्यही नव्हते. दाेन्ही निवडणुका एकत्र घ्याव्यात ही शिवसेनेची भूमिका हाेती, परंतु भाजप श्रेष्ठींनी त्यात खाेडा घातला अाणि युतीच्या चर्चेला खीळ बसली. शिवसेनेला विधानसभेच्या १४४ जागा साेडल्या तर सध्याच्या १२२ जागा कशा मिळतील, असा प्रश्न भाजपला पडणे साहजिकच अाहे. शिवसेना-भाजपतील युतीचा मुद्दा चर्चेत असला तरी त्याचे संदर्भ बदलले अाहेत. ‘युती एक तडजाेड असते’ हे नितीन गडकरींनी मांडलेले तथ्य या साऱ्या पार्श्वभूमीवर पुरेसे बाेलके ठरावे. शिवसेनेला अडेलतट्टू ठरवण्याच्या प्रयत्नात भाजप असला तरी स्वबळावर निवडणूक लढवून कमी जागा मिळाल्या तरी बेहत्तर; पण भाजपचे जास्तीत जास्त नुकसान करत स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा शिवसेनेचा इरादादेखील लपून राहिलेला नाही. निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजपला शिवसेनेची गरज पडेलच, तेव्हा सदस्य कमी असले तरी जादा सत्तापदे मिळवता येतील, असा त्यामागचा हाेरा अाहे. माेदी अाणि शहांवर सतत टीकास्त्र साेडणाऱ्या शिवसेना नेत्यांसमाेर पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाचे गाेडवे जनतेसमाेर कसे गायचे? असाही प्रश्न अाहेच. म्हणूनच हिंदुत्व अाणि राम मंदिराचा मुद्दा एेरणीवर अाणत भाजपची काेंडी करण्याची संधी दवडली नाही. एकंदरीत या भगव्या वातावरणाने युतीच्या वाटाघाटी सुरू असल्याचे संकेत निश्चितपणे दिले, त्यात काेण बाजीगर ठरणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले अाहे. 

 

विधानसभेत भाजपच्या १२३ अाणि शिवसेनेच्या ६३ जागा निवडून अाल्या असल्या तरी अाता शिवसेना निम्म्या जागांवर दावा करणार हे निश्चित. प्रमाेद महाजन दिलजमाई घडवत तेव्हा शिवसेना विधानसभेच्या, तर भाजप लाेकसभेच्या जास्त जागा पदरात पाडून घेत. यावर्षी दाेन्ही ठिकाणी अनुक्रमे १४४ अाणि २४ असे समीकरण भाजपला मान्य करावे लागेल. त्यामुळे शिवसेनेच्या लाेकसभेच्याही जागा वाढतील. ज्याप्रमाणे बिहारात नितीशकुमार अाणि रामविलास पासवान यांच्याशी भाजपने हातमिळवणी केली, ते पाहता तुलनेने ताकदवान असलेल्या शिवसेनेशी युती करावीच लागेल, असा दावा शिवसैनिक करत अाहेत. परंतु, भाजपकडून हाेणारी दगाबाजी त्यांना मान्य नाही. प्रतापराव चिखलीकर यांच्याप्रमाणे अन्य अामदारांना वळवण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, असे मुळीच नाही. म्हणूनच लाेकसभेसाठी युती हाेऊ शकली तरी विधानसभेला ती टिकेल का? हा प्रश्न अाहेच. तथापि, लाेकसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांचा अवधी अाहे, मात्र कृषी, सामाजिक अाणि विकासाच्या मुद्द्यांप्रमाणेच शिवसेनेला युतीस भाग पाडणे त्याचसाेबत विराेधकांच्या गाेटातील ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्या उमेदवारांना वळवणे ही भाजपसमाेरील प्रमुख अाव्हाने अाहेत. मात्र, प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांचा अंदाज घेत भाजपने धक्कातंत्र अवलंबले तर कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचा नूर पालटलेला दिसेल. 

बातम्या आणखी आहेत...