आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे ओशाळले क्रिकेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बटलरला धावचीत करताना आधी अश्विनने अधिक काळ (पॉझ) घेतला. बटलर क्रीझबाहेर जातो कधी याची प्रतीक्षा करत, किंचित थांबून नंतरच अश्विन गोलंदाजीसाठी पुढे सरसावला. अश्विनला विजयाच्या मार्गातील काटा दूर करायचा होता. अश्विन आणि त्याचा संघ जिंकला खरा, पण प्रेक्षकांच्या मनातून उतरला. 


नीतिमत्तेच्या पायावर क्रिकेट उभे आहे. सद््गृहस्थांचा खेळ ही आपली प्रतिमा क्रिकेटने आजवर जपली. या प्रतिमेला तडा जाणाऱ्या घटना अधूनमधून घडतात; आणि मग नीतिमत्तेचा पायाच खिळखिळा होत जातो. निकाल निश्चितीपासून खेळाडूंनी वैयक्तिक स्वार्थासाठी काढलेल्या 'विकेट'वर चर्चा होते; वादळ उठते. सद्गृहस्थांच्या खेळाची प्रतिमा ओशाळली जाते. अगदी कालपरवा अश्विनने जोस बटलरला अखिलाडूवृत्तीने केलेल्या धावचीतच्या घटनेपर्यंतच्या अशा कृत्यांची उजळणी होते. 


भारतासारख्या खंडप्राय देशात जेथे; क्रिकेट या खेळाची व्याख्या सतत हेतुपुरस्सर बदलत असते; त्या लिगमध्ये अश्विनने बटलरला धावचीत करणे या घटनेला गैर मानले गेले नाही. नियमांच्या चौकटीचा आधार दिला गेला. बटलरला धावचीत करतानाचा घटनाक्रम पाहिल्यास लक्षात येते, की अश्विन चेंडू टाकण्यासाठी नाही तर बटलर क्रिझबाहेर कधी जातो आणि आपण त्याला धावचीत कधी करतो या क्षणांची वाट पाहात होता. तो चेंडू फेकण्यासाठी नाही तर धावचीतच्या संधीच्या प्रतिक्षेत होता. 

 

मैदानावरच्या पंचांनी निर्णय देण्याऐवजी हात झटकून ते अप्रिय कार्य करण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचावर टाकली. त्यांनी केवळ नियमांचा आधार घेतला आणि बटलरला धावबाद दिले. 'धावबाद' हे नवे नाव किंवा संज्ञा अशाप्रकारे बाद होणाऱ्या फलंदाजांना अलिकडेच देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. त्याआधी भारताच्या विनू मंकड यांच्या कृतीमुळे अशाप्रकारे बाद करण्याच्या कृतीला 'मंकडेड' असेच संबोधले जात होते. शतकांच्या इतिहासात अशा प्रकारे बाद करण्याचे फारच कमी दाखले सापडतात. कारण आत्तापर्यंत हा खेळ सद्गृहस्थांचा म्हणूनच अधिक खेळला जायचा. विकसनशील देशांनी या खेळाला व्यापारी गल्लाभरू स्वरूप दिले. आयपीएलसारख्या लिग निघाल्या आणि प्रेमात व युद्धात सारे काही माफ असते हे तत्त्व जोपासण्यास सुरूवात झाली. काही क्रिकेटपटूंनी स्वत:चा आत्माही संघमालकांच्या इच्छेपोटी गहाण ठेवायला सुरूवात केली. मालकांच्या मर्जीनेच सारे काही घडते. जिंकण्यासाठी काहीही आणि वाट्टेल ते करायला तयार असलेल्या खेळाडूंकरवी अशी कृत्ये केली गेल्यास आश्चर्य वाटू नये. 

 

दशकानंतरच्या वाटचालीनंतरही आयपीएलसारख्या स्पर्धेच्या संघ मालकांनी नियमांच्या चौकटीपेक्षा नीतीमत्तेला प्राधान्य दिल्याचे आठवणीत नाही. मार्केटिंग आणि अन्य लाभांसाठी आयोजित होत असलेल्या अशा लिगमध्ये नीतिमत्तेबाबत अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल. त्यामुळे अश्विनच्या कृत्याची पाठराखण करणाऱ्यांची संख्या अधिक आढळेल. 

 

क्रिकेट या खेळासाठीच्या नियमांची राखणदारी करणाऱ्या एमसीसी या संस्थेने या निर्णयावर भाष्य करताना, बटलरला धावचीत करताना आधी अश्विनने अधिक काळ (पॉझ) घेतला. ती गोष्ट या खेळाच्या नीतिमत्तेला धरून नसल्याने स्पष्ट केले आहे. कारण बटलर क्रीझबाहेर जातो कधी याची प्रतिक्षा करत, किंचित थांबून नंतरच अश्विन गोलंदाजीसाठी पुढे सरसावल्याचे स्पष्ट दिसत आहे. 


अश्विनच्या त्या कृत्यामागे असणारे कारणही स्पष्ट आहे. बटलर त्यावेळी तुफान फटकेबाजी करीत होता. विजय त्याच्या संघांच्या आवाक्यात दिसत होता. अशावेळी अश्विनने विजयाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी हा मार्ग अवलंबिला. अश्विन आणि त्याचा संघ जिंकला खरा पण प्रेक्षकांच्या मनातून उतरला. 

 

दस्तुरखुद्द अश्विननेही आपल्या कृत्याचे समर्थन करताना, नियमांच्या चौकटीत राहूनच आपण हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. अश्विनचा हात चेंडू उंचावरून सोडण्याच्या सर्वोच्च उंचीपर्यंत गेला नव्हता. त्यामुळे पंचांनी निर्णय बटलरच्या विरुद्ध दिला.

 

नैतिकतेचा याबाबतीत विचार केला तर विनू मंकड यांनी याच पद्धतीने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद केले होते. त्यावेळी मंकड यांनी तीन वेळा त्याला ताकीद दिली होती. अश्विनने बटलरला एकदाही सूचना दिली नव्हती. सध्याच्या अतिव्यावसायिक क्रिकेटच्या युगात तशी अपेक्षाही करता येणार नाही. मात्र जर हा खेळ खिलाडूवृत्तीने खेळायचा हा या खेळाचा गाभा मानला तर अश्विनने बटलरला असे बाद करणे म्हणजे स्वत:च्या गोलंदाजीच्या क्षमतेबाबत प्रश्न निर्माण करण्यासारखे आहे. आपण फलंदाजाला गोलंदाजीच्या माध्यमातून बाद करू शकत नाही, हे जेव्हा लक्षात येते तेव्हाच गोलंदाज अशी कृत्य करण्याचा विचार करतात. 

 

अश्विन हा किंग्ज् इलेव्हन संघांचा कप्तान आहे. खेळाचे पावित्र्य जपण्याची सर्वाधिक जबाबदारी कप्तानाची असते. कप्तानानेच जर असा पायंडा पाडला तर अन्य सहकारीही असे कृत्य करण्यास कचरणार नाहीत. संघ मालकांचा, जाहिरातदारांचा आणि पुरस्कर्त्यांचा पैसा गुंतलेला असल्याने विजय मिळविण्यासाठी खेळाडू कोणत्याही थराला जाऊ शकतील; याची ही एक झलक आहे. नियमांमध्ये अशा पळवाटा शोधून बळी मिळविण्याचे प्रकार यापुढेही घडतील. क्रिकेट हा खेळ आता एवढा व्यावसायिक झाला आहे की, प्रत्येक संघमालकांनी आपल्या संघाच्या हितासाठी ज्या ज्या सोई-सुविधा हव्या आहेत, त्या दिल्या आहेत. व्हिडिओ अॅनालिस्टपासून प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे अभ्यासण्यासाठी नवनव्या 'पोस्ट' तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाला फक्त यशस्वीच व्हायचे आहे. त्यासाठी 'शॉर्टकट्स'देखील स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. दीड महिन्याच्या या लिगच्या पूर्वतयारीसाठी काही शे माणसे वर्षभर राबत असतात. आयपीएल किंवा तत्सम लिग हा त्यांच्यासाठी मोठा ब्रॅण्ड आहे. मार्केटमधील तसेच आपल्या संघाच्या यशासाठी प्रत्येकाने अशा काही युक्त्या-क्लृप्त्या राखून ठेवलेल्या आहेत. ज्यांची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणातील क्षमता कमी आहे, असे खेळाडू नियमांचा आधार घेत असतात. 

 

खरं तर, ज्या विनू मंकड यांनी बिल ब्राऊनला बाद केल्यानंतर अशाप्रकारे बाद होण्याच्या निर्णयाला 'मंकडेड' असे संबोधण्यात आले, त्या विनू मांकड यांनाही झाल्या प्रकाराबाबत खंत वाटत होती. त्यांचे पुत्र राहुल मंकड यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांना ब्राऊनला असे बाद करण्याच्या कृत्याची खंत वाटत होती. तसे ते नेहमीच म्हणायचे. मात्र ब्राऊन याला सतत ताकीद देऊनही तो पुढे जायचे थांबवित नव्हता, म्हणून नाईलाज झाल्याचे विनू मंकड यांनी नमूद केले आहे. त्यामुळेच, अश्विनने बटलर याला किमान एकदा तरी ताकीद दिली असती आणि बाद केले असते, तर नियमांच्या आधारे धावचीत करण्याच्या त्याच्या कृत्याचे त्याला समर्थन करता आले असते. याउलट बटलर क्रीझच्या पुढे जाईपर्यंत तो चेंडू टाकण्यासाठी किंचित काळ अधिक थांबला हे स्पष्ट होत आहे. बटलरची फटकेबाजी रोखण्यासाठी त्याला अशाच पद्धतीने बाद करता येऊ शकते याची अश्विनला खात्री होती. म्हणूनच, अश्विन असा रडीचा डाव खेळला असावा. 


अशा नियमांचा आधार घेऊन किती यशस्वी व्हायचे हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र त्यासाठी धाडस असावे लागते. संघाची, व्यवस्थापनाची अशा डावपेचांसाठी साथ असावी लागते. आयपीएलचा दर्जा आणि संघ मालकांची नीतिमत्ता पाहिली की क्रिकेटच्या खिलाडूवृत्तीला किती दाद मिळेल याबाबत शंका येते. त्यामुळे आयसीसीने खेळाडूंच्या नीतिमत्तेवर अवलंबून राहण्यापेक्षा अशा वादग्रस्त निर्णयांसाठी कठोर नियमांची चौकट आखणे गरजेचे आहे. या निर्णयाला धावचीत असे संबोधताना धावचीतच्या वेळची परिस्थिती किती वेगळी असते याचेही नियमकर्त्यांनी भान ठेवायला हवे. क्रिकेटमध्ये बाद होणारा प्रत्येक फलंदाज चेंडू टाकल्यानंतरच बाद होतो. मात्र या प्रकारात चेंडू टाकण्याआधीच फलंदाज बाद ठरवला गेला. चेंडूच जर टाकला गेला नाही तर ही कृती कशी? यावर सध्या आधार घेतला जात आहे की, गोलंदाजाने 'रनअप' सुरू केले की 'अॅक्शन' याचा! 
अखेरीस अश्विनने बाद केलेला फलंदाज बटलरऐवजी विराट कोहली असता तर? या प्रश्नाचे उत्तरही बोलके असेल. ज्या भारतीय माजी क्रिकेटपटूंनी अश्विनच्या बाजूने, नियमांच्या चौकटीचा आधार घेत मत टाकले आहे, त्यांची प्रतिक्रिया कोहली अशाप्रकारे बाद झाला असता तर कदाचित वेगळी असती. आयपीएलच्या गतदशकातील काही वादाचे प्रसंग आणि त्यासाठीचे निमित्त पाहिले की बटलरऐवजी अन्य भारतीय खेळाडू असता तर वेगळे चित्र कदाचित पाहावयास मिळाले असते. 

बातम्या आणखी आहेत...