आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आरे'तील १८०० हून अधिक झाडांच्या कत्तलीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आज विशेष सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जेथे मेट्रो -३ कारशेड प्रस्तावित आहे, त्या मुंबईच्या पश्चिम उपनगरात आरे काॅलनीतील शेकडो वर्षे उभ्या २७०० पैकी २५०० वृक्षांची तोड रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी रात्री हा आकडा १८०० सांगितला जात होता. तो आता २५०० वर गेल्याचे आरे कॉलनीतील स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, वृक्षतोडीस विरोध केलेल्या २९ कार्यकर्त्यांना रविवारी सुटीकालीन कोर्टाने जामीन मंजूर केला. या विद्यार्थ्यांच्या जामिनासाठी लोकनिधीतून रक्कम उभी करण्यात आली. तर, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना वृक्षतोड थांबवण्यासाठी विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले पत्रच याचिका ग्राह्य धरून सुप्रीम कोर्ट सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी करणार आहे.

रविवारी तिसऱ्या दिवशी आरे काॅलनी परिसरात १४४ कलम लागू होते. काॅलनीतील लोकांना ओळखपत्रावरच प्रवेश होता. रविवारी आंदोलक मोठ्या संख्येने येणार हे गृहीत धरून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती. आरे काॅलनीच्या प्रवेशद्वारापासून तीन किमी अलीकडे तिन्ही रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड‌्स लावली होती. त्यामुळे पत्रकार किंवा आदोलकांना आरेमध्ये जाता आले नाही. आरे परिसरात ट्रक, जेसीबी मोठ्या संख्येने नेण्यात येत होते. मेट्राे कारशेडसाठी २७०० वृक्ष तोडायचे आहेत. त्यातील २५०० वृक्ष रविवारी सायंकाळपर्यंत तोडण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला.

नवी दिल्ली : आरे कॉलनीतील वृक्षतोड आणि पर्यावरणवाद्यांच्या आंदोलनाची सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली असून नोएडास्थित विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रविवारी सरन्यायाधीशांची भेट घेऊन सादर केलेल्या अर्जाला जनहित याचिका ग्राह्य धरून यावर सोमवारी विशेष न्यायपीठासमोर सुनावणी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने तत्काळ हस्तक्षेप करावा. यावर याचिका दाखल करण्यासाठी आता पुरेसा वेळ नसल्याची विनंती या विद्यार्थ्यांनी केली होती.

१ वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी आरे काॅलनीत जाऊन वृक्षतोडीस विरोध केला. बोरिवली पोलिसांनी त्यांना अटक केली व नंतर सोडून दिले.
२ आरे वृक्षतोडीस विरोध केल्याप्रकरणी ३८ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २९ आंदोलकांना बोरिवलीच्या सुटीकालीन न्यायालयाने ७ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.
३ ज्या २९ आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांच्या कुटुंबीयांनी आरे परिसरात पत्रकार परिषद घेतली. फडणवीस सरकारच्या मुस्कटदाबीचा त्यांनी निषेध केला.
४ 'आरे वाचवा' आंदोलनाचे लोण रविवारी मुंबई शहरभर पसरल्याचे दिसले. अनेक ठिकाणी मुंबईकरांनी मानवी साखळी करत वृक्षतोडीचा व सरकारचाही निषेध केला.
५ आरे वृक्षतोडीचा फटका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना बसतो आहे. मुंबई पालिकेत सेनेची सत्ता आहे. पालिकेतील वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीस परवानगी दिली. ज्या वरळीतून आदित्य विधानसभा लढवत आहेत तेथे आदित्य यांच्याविरोधात पोस्टरबाजी झाली आहे.
६ आदित्य यांच्याविरुद्ध वरळीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अॅड. सुरेश माने लढत आहेत. माने यांनी प्रचारात वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आणण्याची रणनीती आखल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले.
७ आदित्य यांची रविवारी वरळी मतदारसंघात मोठी रॅली निघाली होती. त्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आरे वृक्षतोडीच्या विरोधात रॅलीसमोर निदर्शने केली.
८ शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास आरेमधील वृक्षतोडीस प्रारंभ झाला. ४०० वृक्ष तोडले. शनिवारी १८००, तर रविवारी सायंकाळपर्यंत २५०० वृक्ष तोडल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...