आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Special Interview |Let The Alliance Candidates Declare, Then See How Incoming Is Growing In Nationalist : Dhananjay Munde

युतीचे उमेदवार जाहीर होऊ द्या, मग बघा कसं राष्ट्रवादीत इनकमिंग वाढतंय : धनंजय मुंडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी/ दिनेश लिंबेकर  परळी - ‘भाजप आणि शिवसेनेने सर्वच मतदारसंघांत आपापली तयारी केली आहे. २०१४ मध्ये दाेन्ही पक्ष एकमेकांविराेधात लढले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या या पक्षातील उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांत जाेरदार तयारी केली आहे. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. युती जाहीर झाल्यावर २८८ पैकी किमान १०३ जागी ‘ओव्हरलॅपिंग’ची परिस्थिती निर्माण हाेईल. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांचे आमच्याकडे इनकमिंग सुरू हाेईल,’ असा दावा विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला.  

प्रश्न : तुमच्या परळीत काय चित्र आहे?
मुंडे : रोजगार, पाणी, ऊसतोड कामगारांचे प्रश्न याकडे सत्ताधाऱ्यांनी ५ वर्षे दुर्लक्ष केले. ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या मतदारसंघातील थर्मल सुरू आहे, परळीतील मात्र बंद. विद्यमान आमदार माेठ्या नेत्याचा वारसा सांगतात. मात्र त्यांना वडिलांचे स्वप्नही पूर्ण करता आले नाही. काय होते मुंडे साहेबांचे स्वप्न ‌? माजलगावमधून येणारे गोदावरीचे पाणी वाण धरणात त्यांना आणायचे हाेते. परळीत एमआयडीसी पंचतारांकित करायची होती. मात्र हे काहीच झालेले नाही. उलट या ठिकाणचे चीफ इंजिनिअरचे ऑफिस गेले. वैद्यनाथ कारखाना दिवाळखोरीत आहे. परळीहून थेट मुंबईला जाणारी रेल्वे लातूरला नेली. ज्याेतिर्लिंगाचा विकास नाही. ऊसतोड मजुरांचा प्रश्न कायम आहे. 

प्रश्न : गेल्या वेळी भावनिक राजकारण झाले होते. या वेळी काय परिस्थिती? 
मुंडे : २०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. शिवसेनेने परळीत उमेदवार दिला नव्हता. मुंडे साहेब जाऊन तीनच महिने झाले हाेते, तरीही मी फक्त २५ हजार मतांनी पडलाे. काँग्रेसने १५ हजार मते घेतली. यंदाच्या लाेकसभा निवडणुकीत परळीतून भाजपला फक्त १८ हजार मते मिळाली. वंचितला २० हजार. भाजपचा मतांचा टक्का घसरतोय. कारण ‘त्यांचा’ जनसंपर्क नाही. ‘बाबा’ या शब्दापलीकडे त्यांचे भांडवल नाही. ते आता पुन्हा हेच कार्ड वापरतील. या वेळी मतदार भावनिक राजकारणाला थारा देणार नाहीत.

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेससाठी यंदा अस्मितेची लढाई आहे का? 
मुंडे : हो, भाजपसाठीसुद्धा आहे. भाजपला सत्ता टिकवायची आहे, आम्हाला मिळवायची आहे. आजवर त्यांनी लोकांना बदनाम करून सत्ता मिळवली. मागच्या वेळी मोदी लाट होती. आता ते शक्य होणार नाही. भाजपचे सत्य लाेकांसमोर येत आहे. फक्त बोलण्याने काम होत नाही, हे लोकांनाही कळले आहे. 

प्रश्न : राष्ट्रवादीचे नेते भाजपत जाताहेत?
मुंडे : ज्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती, प्रेम राहिलेले नाही, पुन्हा निवडून येण्याची खात्री नाही ते पक्ष साेडतात. सध्या ज्यांचे वारे आहे तिकडे (भाजपत) जातात. अशा नेत्यांवर जनता आता विश्वास ठेवणार नाही. 

प्रश्न : देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र असे समीकरण झालेय. विराेधी पक्षाकडे मात्र तसा चेहरा नाही?
मुंडे : शिवसेनेने देवेंद्र यांचा चेहरा मान्य केला आहे का? आम्ही हा प्रयोग का करावा ? महाराष्ट्रात एवढ्या निवडणुका झाल्या, मात्र आतापर्यंत कोणीच चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवली नाही. पुरोगामी महाराष्ट्रासमाेर फडणवीसांचा चेहरा ठेवून भाजप जिंकू पाहत असेल तर ते एवढे सोपे नाही. राज्यात साेशल इंजिनिअरिंगचा प्रभाव आहे.

प्रश्न : यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार निवडून येतील? 
मुंडे : यावर आताच बाेलणे घाईचे ठरेल. ज्या दिवशी युतीचे जागावाटप हाेईल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल. राज्यात १०३ मतदारसंघांत जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर हाेती. जिथे शिवसेेनेचे आमदार आहेत तिथे भाजप दुसऱ्या स्थानी हाेती. त्यामुळे युतीचे जागावाटप जाहीर हाेताच पत्ता कट झालेल्या उमेदवारांना आमच्याकडे येण्याशिवाय पर्याय नसेल. काही लोक दुसरा पर्यायदेखील शोधतील. 

प्रश्न : वंचितला सोबत का घेत नाही ? 
मुंडे : आम्ही तर तयार आहाेत. पण वंचितलाच यायचंय नाहीए. भाजपने आज ३७० कलम काढले, उद्या आरक्षणाला हात घालतील. प्रकाश आंबेडकरांनाही याची कल्पना असेल. तरीही वेगळे लढून, मतविभाजन करून ते भाजपला मदत का करताहेत हेच समजत नाही. मात्र जी मते लोकसभेला वंचितला मिळाली ती पुन्हा मिळतीलच असे नाही. 


प्रश्न : धनंजय मुंडेना भाजपने ऑफर दिली तर

उत्तर : फडणवीसच काय, मोदींनी बाेलावले तरी भाजपत जाणार नाही. ज्या पक्षाने मला पक्षांतर करण्यास भाग पाडले त्या पक्षात पुन्हा कधीच जाणार नाही. माझं आयुष्य संघर्षात गेलंय. यापुढेही संघर्ष करेन. राष्ट्रवादीतच निष्ठेने काम करेन.
 

प्रश्न : गोपीनाथ मुंडेंपासून आपण दूर का झालात?
धनंजय मुंडे : प्रमाेद महाजन साहेब गेल्यानंतर मुंडेसाहेब प्रचंड अस्वस्थ होते. मी त्या वेळी भाजयुमाेचा अध्यक्ष होतो. मला पुण्यात बेराेजगारांचा माेठा मेळावा घ्यायचा हाेता. माेदींना आमंत्रण द्यायचे हाेते. त्या वेळी छत्तीसगड व इतर राज्यांत भाजप अपयशी ठरला होता. त्याच काळात मुंडे साहेबांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. मी मात्र ही निवडणूक लढवू नका, असे सांगत हाेताे. मात्र मुंडे साहेबांनी मला विधानसभेची तयारी करण्यास सांगितले. त्यांनी माझी उमेदवारीही जाहीर केली. पक्षाच्या पार्लमेंटरी बैठकीतूनही मला कामाचे आदेश देण्यात आले. मात्र अचानक मला ‘निवडणूक लढवू नको’ असे सांगितले. याचे कारण मला अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. त्याच वेळी माझे वडील म्हणाले, ‘पोरात दम असेल तर होईल मोठा...’ आणि मग पुढील घडामाेडी घडल्या.