आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना बाळासाहेबांचा, ना उद्धव- राज ठाकरेंचा, माझ्यावर प्रभाव सर्वसामान्य शिवसैनिकांचाच - युवा सेनेचे प्रमुख आदित्य यांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात न उतरता त्यांनी रिमोट आपल्या हाती ठेवत काम केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तेच केले. मात्र, आता ठाकरे परिवारातील तिसरी पिढी आदित्य यांच्या रूपाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर ‘रिमोटसाठी उद्धव ठाकरे आहेतच ना,’ असे सांगत आदित्य यांनी आपल्या वडिलांचे स्थान अधोरेखित केले. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.
 

> प्रश्न : निवडणूक लढवावी असे का वाटले?
आदित्य : फार पूर्वीपासूनच माझी तशी इच्छा हाेती. शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा तर आपण करत आहाेतच, मात्र विधानसभा किंवा लाेकसभेत जाऊन जनतेच्या समस्या लवकर साेडवणे शक्य आहे, असे मला वाटते. खरे तर २०१४ मध्येच मी निवडणूक लढवणार हाेताे, पण तेव्हा वयात बसत नसल्याने लढवली नाही.
 

> प्रश्न : ठाकरे कुटुंब फक्त रिमोट चालवणारेच आहेत, असे म्हटले जाते. तुम्हाला रिमोट हाती घ्यावासा वाटला नाही?
आदित्य : रिमोटसाठी उद्धव ठाकरे आहेतच की.

वरळीत संपूर्ण भारताचे दर्शन, म्हणून निवडला
वरळीला माझे सतत येणे- जाणे असल्याने व संपूर्ण भारताचे दर्शन या मतदारसंघात होत असल्याने ताे मी निवडला. येथे कोळी वाडे आहेत, मध्यमवर्गीयांच्या चाळी आहेत, कॉर्पोरेट कंपन्या आहेत, मॉल्स आहेत, पंचतारांकित संस्कृतीही आहे. अशा सर्व गोष्टी अभावानेच एका मतदारसंघात आढळतात. मला वरळीचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा करायचा आहे. पर्यटन, रोजगार, पुनर्वसन अशी अनेक कामे येथे करता येणार आहेत. हा एक मॉडेल मतदारसंघ करायचा आहे. 
 

> प्रश्न : वरळीत तुम्ही विविध भाषेत प्रचार फलक लावलेत, त्यावर साेशल मीडियावर टीका हाेतेय?
आदित्य : वरळीत मराठी, गुजराती, करळी, मल्याळी, तमिळ असे सगळेच लाेक राहतात. त्यामुळे त्या-त्या भाषेत होर्डिंग्ज लावले. होर्डिंग्जची मुदत एक आठवड्याची होती, ती संपल्यावर होर्डिंग्ज काढले. टीका झाली म्हणून नाही. आता मी मतदारसंघात जी पत्रके वाटली आहेत त्यात फ्रेंच आणि अन्य भाषांचाही उल्लेख केला आहे. कारण वरळीला मला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे.

> प्रश्न : तुमच्यावर प्रभाव काेणाचा... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, उद्धव ठाकरे की राज ठाकरेंचा?
आदित्य : माझ्यावर शिवसैनिकांचा प्रभाव आहे. मी लहानपणापासून शिवसैनिकांचे काम पाहत आहे. रात्री-बेरात्री कोणी त्यांच्याकडे मदत मागावयास आले की, त्याची जात-पात, धर्म, राजकीय पक्ष न पाहता शिवसैनिक मदत करतात. यात कोणताही स्वार्थ नसतो. असा गुण अन्य कोणात आढळत नाही. मी हा गुण उचलून त्यांच्याप्रमाणे राजकीय जीवनात काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.

> प्रश्न : १० रुपयात जेवण देणे शक्य आहे का?
आदित्य : विचार करूनच आम्ही आश्वासने देताे. यासाठी पाच वर्षांपर्यंत किती निधी लागू शकताे याचे नियाेजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रलाइज किचन उभे केले जाणार असून बचत गटांना त्याचे काम दिले जाणार आहे. त्यातून दहा रुपयात सकस जेवण देणे शक्य होणार आहे. जी वचने पूर्ण करू शकू तीच आम्ही दिली आहेत. 

> प्रश्न : मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? कोणती जबाबदारी स्वीकारण्यास आवडेल?
आदित्य : निवडून आल्यानंतर मी विधिमंडळात प्रवेश करेन. पक्षप्रमुख आणि शिवसैनिक जी जबाबदारी सोपवतील ती मी स्वीकारेन.

> प्रश्न : भविष्यात तुम्हाला राज्यात नेतृत्व करणे आवडेल की राष्ट्रीय स्तरावर?
आदित्य : मला देशासाठी चांगले काम करायचे आहे. महाराष्ट्रही देशाचाच एक भाग आहे. महाराष्ट्राचा विकास झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरही काम करू शकेन. परंतु त्याबाबतही आत्ताच काही सांगणे योग्य ठरणार नाही.

> प्रश्न : कविता करणे सुरू आहे का?
आदित्य : आता वेळच मिळत नाही. माझ्या कविता होर्डिंग्जवरच दिसतात.

> प्रश्न : या धामधुमीत वेळ मिळताे का, शेवटचा चित्रपट कधी आणि कोणता पाहिला?
आदित्य : चित्रपट पाहायलाही वेळ मिळत नाही. शेवटचा चित्रपट मी ‘ठाकरे’ पाहिला होता. जिममध्ये जाण्यासही वेळ मिळत नाही.