आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Spl: गडकरी म्हणाले होते, लोकसभा लढवा; मीच नकार दिला, लोकसभेला मी उमेदवार देतो, निवडून आणतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नितीन गडकरी यांनी मला लोकसभा लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र लोकसभेला मी उमेदवार देतो, निवडून आणतो. मला खासदारकीत रस नाही. लोकसभा लढण्याचा प्रश्नच नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले. अंबानी यांच्याबाबत मी जे बोललो ते खरे आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी बळकावणाऱ्यांमध्ये त्यांचेही नाव आहे. जी गोष्ट रेकॉर्डवर आहे, तेच मी बोललो. अंबानींची चौकशीदेखील झाली आहे. पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्थगिती मिळवली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात आहे, असे ते म्हणाले. मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्म हाऊसवर खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या खणखणीत शैलीत प्रश्नांची उत्तरे दिली.


प्रश्न : लोकसभा लढवण्याचा गडकरींचा सल्ला नाकारण्यामागे काय कारण आहे? 
खडसे : मला खासदारकीमध्ये कधीही रस नव्हता. त्यामुळे लोकसभा लढवण्यास मी नकार दिला. मी लोकसभेसाठी उमेदवार दिले, निवडून आणले. मला जनसंपर्काची आवड आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, मूलभूत सोयीसुविधा याबाबत खासदार नव्हे, आमदार प्रभावीपणे काम करू शकतो. ग्रामपंचायतीपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत कोणतेही काम आमदारच प्रशासनाच्या माध्यमातून करू शकतो. खासदार सामान्य जनतेची लहान-मोठी कामे करू शकत नाहीत. त्यांना काही मर्यादा असतात. जे काम खासदाराचे नाही तेही काम त्यांनी करावे, अशी जनतेची अपेक्षा असते. काम नाही झाले तर लोक नाराज होतात. त्यामुळे लोकांची विनाकारण नाराजी ओढवून घेण्यापेक्षा मला आमदार म्हणून काम करायला आवडते. त्यामुळे लोकसभा लढवण्याचा विचार मी कधीच केला नाही.


प्रश्न : आपण अजूनही पक्षश्रेष्ठींवर नाराज आहात का? 
खडसे : मी नाराज आहे हे मीडिया सांगते. नाराज राहिलो असतो तर घरी बसलो असतो. पक्षाचे आणि जनतेचे काम सुरू केले नसते. मला ज्या गोष्टी खटकतात त्या मी बोलत असतो. याचा अर्थ कोणी काय घ्यावा हे ज्यांनी, त्यांनी ठरवावे.


प्रश्न : तुम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अजूनही आमंत्रण येत आहेत का? 
खडसे : हे बघा, मी यापूर्वीही सांगितले आहे की, मी भाजप सोडणार नाही. ज्या पक्षात मी ४० वर्षांपासून काम करत आहे. राज्यभर पक्ष आणि संघटन वाढवले आहे. लोक जोडले आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही. कोणत्या पक्षाने कुणाला आमंत्रण द्यावे, हे त्यांचे राजकारण असू शकते. पक्ष सोडण्यापेक्षा मी घरी बसणे पसंत करेन. इकडून- तिकडे जाणं हे माझ्या रक्तात नाही.


प्रश्न : तुम्ही पुन्हा वक्फ बोर्डाच्या जागेबाबत अंबानींवर टीका केली, तरीही सरकार दखल का घेत नाही ? 
खडसे : अंबानींबाबत जे सत्य आहे, रेकॉर्डवर आहे, तेच मी बोललो. अंबानींनी वक्फ बोर्डाच्या जागेबाबत केलेल्या व्यवहाराची चौकशी झाली आहे. तथापि, त्यांनी पुढील कारवाईला स्थगिती मिळवली आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.


प्रश्न : तुम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तोडली होती, आता युती झाली आहे. पुढे काय? 
खडसे : पक्ष आदेशानुसार मी गत निवडणुकीत युती तोडण्याची घोषणा केली होती. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती करण्याची तयारी दाखवली. युतीचे सूत्र दोघांना तत्वत: मान्य आहे. लोकसभा व विधानसभेच्या जागाही ठरल्या आहेत. विधानसभेबाबत मी आता बोलणार नाही. तेव्हाचे तेव्हा बघू.


प्रश्न : देशात भाजपचे चित्र काय राहील? 
खडसे : मोदी सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे या वेळेस अधिक जागा वाढतील आणि भाजपचेच सरकार बसेल.


प्रश्न : जीएसटी, २ कोटी रोजगारांचे आश्वासन, नोटबंदीने लोक पोळले त्याचे काय?
खडसे : एअर स्ट्राइक आणि त्या आधी केलेले सर्जिकल स्ट्राइक यामुळे देशातील वातावरण बदलले आहे. लोक बाकी गोष्टी विसरले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने ताबडतोब जे पाऊल उचलले ते खूप चांगले झाले. जनमानसातून याबाबत चांगल्या प्रतिक्रिया आल्या. देश मोदींच्या नेतृत्वात सुरक्षित राहील, अशी भावना तयार झाली आहे. देशभक्तीची लाट आहे.


प्रश्न : आपले मंत्रिपद गेल्यानंतर, घोषणा केलेली कामे झाली नाहीत? 
खडसे : मी कधीही मतदारसंघापुरते काम केले नाही. खान्देशसाठी कृषी विद्यापीठ व्हावे ही माझी इच्छा होती. त्याचे काम बरेच पुढे गेले होते. पण ते आता मागे पडले आहे. मी मंत्रिपदावर नसल्यामुळे जिल्हा, खान्देश आणि राज्यातील काही कामे मागे पडली याची जाणीव लोकांना होत असेल तर ती माझ्या कामाची पावतीच आहे.


प्रश्न : आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार तरीही कामे होत नाहीत, असे का?
खडसे : मी मंत्री असताना संपूर्ण राज्याचा विचार करून कामे केली. खान्देशातील सिंचन प्रकल्प असतील, उपसा सिंचनाची अपूर्ण कामे असतील ती पूर्ण केली. व्यापक दृष्टिकोन ठेवला. अन्य मतदारसंघाचे प्रश्नही मांडले. आता कोणी काय दृष्टिकोन ठेवावा हा ज्याचा, त्याचा विषय आहे. राहुरी विद्यापीठाचा विस्तार खूप मोठा आहे. त्याचे विभाजन होणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...