Home | Maharashtra | Mumbai | Special interview of Maharashtra CM Devendra Fadanvis

मुलाखत : राज ठाकरेंचे आराेप म्हणजे नख कापून शहीद होण्याचा प्रकार - मुख्यमंत्री

चंद्रकांत शिंदे | Update - Apr 22, 2019, 10:36 AM IST

आघाडीस जिथे यश मिळू शकते तिथेच राज ठाकरे यांच्या सभा

 • Special interview of Maharashtra CM Devendra Fadanvis

  मुंबई - ‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अचानक टीका करू लागले. खरे तर तेव्हा राज यांच्यामागे वलय होते. परंतु २०१४ नंतर त्यांची लोकप्रियता घसरू लागली. कधीकाळी आमदार, नगरसेवक आणि नाशिक मनपाची सत्ता असलेल्या राज ठाकरे यांच्याकडे आता काहीही उरले नाही. याच रागातून ते मोदी व शहांवर टीका करत आहेत. स्वतःवरच फोकस राहावा हाही त्यामागे उद्देश आहे. आम्ही मात्र त्यांना जास्त महत्त्व देत नाही. जनतेसमोर खोटी माहिती जाऊ नये म्हणून फक्त ठरावीक मुद्द्यांना उत्तर देतो. बाकी त्यांच्या आरोपांना आम्ही वेळ येईल तेव्हा सविस्तर उत्तर देऊच,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.


  ‘नख कापून शहीद होण्याचा प्रकार राज करीत आहेत. म्हणूनच ‘आपला मताधिकार काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे,’ अशा अफवाही त्यांच्या गाेटातून पसरवल्या जात आहेत. आघाडीचे जे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, अशाच मतदारसंघांत राज ठाकरे सभा घेत आहेत,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.


  > विधानसभेला राज ठाकरे तुमच्यासोबत येतील का?
  मुख्यमंत्री : नाहीच.

  > शिवसेनेनेही मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली हाेती. ते जर युतीत येऊ शकतात तर राज ठाकरे का नाही ?
  मुख्यमंत्री : शिवसेना-भाजपची युती ३०-३५ वर्षांपासून आहे. आम्ही एकत्रच होतो, आहोत आणि सोबतच राहणार आहोत.

  > राज ठाकरेंच्या सभांमुळे आव्हान निर्माण झाले आहे असे वाटते का? विशेषतः मुंबई, ठाण्यात?
  मुख्यमंत्री : राज ठाकरेंचे आम्हाला आव्हान वाटतच नाही. मुंबईच्या सर्वच्या सर्व सहा जागा, ठाण्यातील ३ आणि पालघरची जागाही युतीच जिंकणार यात शंका नाही.


  > काही निष्क्रिय खासदारांचे तिकीट तुम्ही कापले. या भागात ५ वर्षांत कामे न झाल्याने तेथील लोक नाराज आहेत. त्याचा फटका आता बसेल का?
  मुख्यमंत्री : मुळीच नाही. या खासदारांनी कामे केली नाहीत असे नाही. कामे केली परंतु या वेळी आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त चांगले आणि सक्षम उमेदवार दिले आहेत, जे जनतेला पसंत पडणारेच आहेत.

  > खडसे, पंकजा मुंडेंसारखे स्टार प्रचारक स्वत:च्या मतदारसंघाबाहेर पडू शकले नाहीत. सुधीर मुनगंटीवार ही विदर्भाबाहेर दिसले नाहीत... काय कारण?
  मुख्यमंत्री : आम्ही प्रत्येकावर जबाबदारी दिली आहे ते त्या त्या भागात पार पाडत आहेत.
  पंकजा मुंडे यांनी आज काही सभा घेतल्या आहेत. खडसे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सभा घेत नव्हते, परंतु ते लवकरच सभा घेतील. मुनगंटीवार यांच्यावर विदर्भ, चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र, गिरीश महाजन यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. मात्र केवळ माझ्याच सभांना जास्त प्रसिद्धी मिळत असल्याने हे नेते प्रचार करीत नाहीत, असा समज माध्यमांचा झाला असावा.

  > विदर्भ-मराठवाड्यात युतीच्या जागा कमी होणार असल्याचा अंदाज आहे?
  मुख्यमंत्री : काेणीही पाहणी केली ते मला ठाऊक नाही. आम्हाला मिळालेल्या अहवालानुसार विदर्भातील ८ जागा मताधिक्याने आम्ही जिंकणार आहाेत तर दोन जागांवर आम्हाला अॅडव्हांटेज आहे. नितीन गडकरी विक्रमी मतांनी जिंकणार आहेत. मराठवाड्यात सहा जागा माेठ्या मताधिक्याने आम्ही जिंकणार असून २ जागांवर अॅडव्हांटेज आहे. मात्र या जागा कोणत्या ते विचारू नका.’

  > दुष्काळ, बेरोजगारी हे मुद्दे प्रचारातून गायब झालेत. की राजकीय पक्षांना ते महत्त्वाचे वाटत नाहीत का?
  मुख्यमंत्री : बाकीच्या पक्षांचे माहीत नाही, परंतु आमच्या प्रचारात दुष्काळ, बेरोजगारी हे मुद्दे अवश्य असतात. आणि आम्ही त्यासाठी गेल्या पाच वर्षांत काय केले त्याची माहिती देत असतो. मात्र माध्यमांमध्ये त्यावर फोकस न करता दुसरे जे मुद्दे उपस्थित केलेले असतात. म्हणूनच तुम्हाला असे वाटत असेल. जर आम्ही नोकऱ्या दिल्या नसत्या तर ‘सिव्हिल वॉर’सदृश परिस्थिती निर्माण झाली असती.

  > नगरमध्ये सुजय विखे यांना उमेदवारी दिली तशी माढ्यामध्ये मोहिते पाटील यांना का दिली नाही?
  मुख्यमंत्री : त्यांनी मागितलीच नव्हती.

  > तुम्ही इशारा दिल्यानंतरही विनायक मेटे यांनी बीडमध्ये भाजपविरोधी काम केले. आता तुम्ही त्यांच्याशी मैत्री तोडणार का?
  मुख्यमंत्री : बीडमध्ये मेटे यांनी विरोधात काम केल्याचे समजल्यावर मी त्यांना समज दिली. परंतु बीड वगळता अन्य सर्व ठिकाणी त्यांनी आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी युतीसाठी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Trending