आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे मंत्रिमंडळात महत्त्व कमी; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्ता सांगळे

औरंगाबाद - शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसदार कोण?  असा प्रश्न अनेकांना पडतो. हाच प्रश्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच केला. ‘वारसदार हा ठरवायचा नसतो. तो लोकांच्या मान्यतेतून, सूचनेवरून होत असतो, ती काही गादी नाही की त्यावर कोणालाही बसवून द्यावे’ असे उत्तर देत ते स्वत: त्यांचा वारसदार ठरवणार नाही, असे स्पष्ट केले. पवार हे रविवारी वेरूळ येथे मुक्कामी होते.   त्या वेळी झालेल्या चर्चेतील प्रमुख मुद्दे...
 
 

> प्रश्न : बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर घराणेशाहीला विरोध केला, मात्र शेवटी त्यांनी आपला वारस म्हणून मुलालाच पसंती दिली. तुम्ही तसे का करत नाही?  
पवार : शिवसेना ही वेगळ्या धाटणीची संघटना आहे. बाळासाहेबांनी घेतलेल्या निर्णयाला लोकांचा पाठिंबा मिळाला. पुढे पाठिंबा मिळाला तर आदित्य ठाकरेंनाही लोक स्वीकारू शकतात. शिवसेनाप्रमुखांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आपला इरादा नाही. लालकृष्ण अडवाणी हे वाजपेयींनंतर पक्षाचे वारसदार असतील असे बोलले जात होते, परंतु नरेंद्र मोदी हे वारसदार ठरले. कारण त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादीचा वारसदारही असाच लोकांच्या मान्यतेनेच ठरेल.
 

> मी ढकलले नाही, चुकून हात लागला असेल
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सभेत पवार यांनी एका कार्यकर्त्याला ढकलल्याचे छायाचित्र ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाले. पवार पत्रकारांशी बोलत असताना ‘दिव्य मराठी’चा अंक त्यांचा समोर होता. त्याकडे बघत पवार म्हणाले, मी त्या कार्यकर्त्याला हाकलले नाही. तो हार खूप मोठा होता. त्यामुळे तो स्वीकारण्यासाठी हात उंच करावा लागला. या गडबडीत चुकून माझा हात लागला असेल, मी कशाला कार्यकर्त्याला ढकलू? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
 

> प्रश्न :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने शरद पवार यांनाच लक्ष्य करतात, असे का
पवार : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तेव्हा जनादेश त्यांच्या बाजुने असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली. परिणामी शिवसेनेच्या सहभागाशिवाय भाजपने सरकार स्थापन केले. ती आमची ‘टक्टिकल’ भूमिका होती. जर आम्ही तेव्हा पाठिंबा जाहीर केला नसता तर शिवसेनेला निम्मी मंत्रिपदे मिळाली असती. मात्र आमच्यामुळेच प्रारंभी त्यांना सत्तेत सहभागही मिळाला नाही आणि नंतर मिळाला तर मोजक्याच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीला जाते. हा राग  ठाकरेंच्या मनात आहे. त्यामुळेच ते माझ्यावर टीका करत असावे, असे पवार म्हणाले.

> प्रश्न : पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि फडणवीस हे तुमच्यावर वैयक्तिक टीका करतात, हे पटते का ? 
पवार : नरेंद्र मोदी, अमित शहा हे वैयक्तिक टीका करतात. पंतप्रधान हा देशाचा असतो. त्याने दुसऱ्यावर टीका करतानाही आपल्या पदाची गरिमा राखली पाहिजे. त्यांची टीका त्यांच्या पदाला न शोभणारी आहे. त्यांचे बघून देवेंद्र फडणवीसही माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. परंतु फडणवीस अजून खूपच लहान आहे, मी त्याकडे लक्ष देत नसल्याचे पवार म्हणाले.

> प्रश्न : भाजप नेते सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेतात ?
पवार : शेजारी देशाकडून घातापाताच्या कारवाया वाढल्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. कारवाया थांबवण्यासाठी कारवाईचे अधिकार आपल्या सैन्याला द्यावेत असे सर्वानुमते ठरले. हा निर्णय सामुहिक होता. नंतर कारवाई झाली अन ती काही यांनीच तेथे जावून कारवाई केल्याचे सांगत फिरताहेत. स्वत:चीच पाठ थोपडून घेत आहेत. किरकोळ कारवाईवर पाठ थोपडून घेणाऱ्यांनी १९७२ ची घटना आठवावी. तेव्हा तर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांगला देशाची निर्मिती केली होती. त्यानंतर इंदिरा गांधींनी देशाला संबोधित केले आणि भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल आभार व्यक्त केले. आपण लष्कराच्या चरणी नतमस्कत असल्याचे त्यांंनी जाहीरपणे सांगितले. पण हे माझ्यामुळे झाले अशा त्या म्हणाल्या नाहीत, हे लक्षात घ्यावे. 

> प्रश्न : काँग्रेसकडे राज्यात चेहरा नसल्याने त्यांचे हाल झाले आहेत का ?  
पवार : काँग्रेसकडे चेहरा नाही, हा मीडियाने पसरवलेला समज आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशात लक्ष दिले तेवढे लक्ष महाराष्ट्रात अद्याप दिलेलेे नाही. काँग्रेसची हालत चांगली नसली तरी काँग्रेस पक्ष हा कायमचा संपला असे म्हणता येणार नाही. त्यांच्याकडे गावोगाव नेटवर्क आहे. आमच्यापेक्षाही त्यांची ताकद नक्कीच जास्त आहे.