आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी कमी करण्याच्या सिद्धांतासाठी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी म्हणाले- भारतीय अर्थव्यवस्था केंद्रीकरणाने ग्रस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमंत अत्री 

दिल्ली - पत्नीसह संयुक्तरीत्या अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी भारतात आले आहेत. जागतिक गरिबी कमी करण्याच्या दिशेने काम करत असलेले अभिजित यांनी भास्करशी केलेल्या चर्चेत म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था केंद्रीकरणाने ग्रस्त आहे. बाजारात मागणी कमी आहे, म्हणजे बहुतांश लोकसंख्या खर्च करू शकत नाही. त्यामुळे गरिबांच्या हातात पैसे द्यावे लागतील, ज्यातून मागणी वाढेल. यामुळे अर्थव्यवस्थेला गती येईल. या चर्चेतील प्रमुख मुद्दे...
 

> जगभरातील देशांत अब्जावधी रुपये खर्च करूनही गरिबी संपुष्टात येत नसल्याचे चित्र आहे. नेमकी समस्या काय आहे? गरिबी कशी हटेल? 
असे म्हणणे योग्य नाही. रोज १.९० डॉलर (१३४ रुपये)पेक्षा कमी पैशात गुजराण करणाऱ्या लोकांची संख्या ३० वर्षांत सर्वाधिक वेगाने कमी झाली आहे. याचाच अर्थ कुठे ना कुठे काम होते आहे. 

> करदाता मध्यमवर्ग कधीच मोठ्या योजनांचा केंद्रबिंदू नसतो. असे का? 
कारण जागतिक स्तरावर मागील ३० ‌वर्षांत श्रीमंतांनी विकासातील मोठा हिस्सा हडपलेला आहे. याचा गरिबांनाही काही फायदा झाला आहे. मात्र, मध्यमवर्ग आहे त्याच स्थितीत आहे. त्याचा विकास झाला नाही. 
 

> सरकार ५ लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने पावले टाकत आहे. हे कसे शक्य होईल? 
सद्य:स्थिती आणि आकडेवारीवरून स्पष्ट आहे की, भारताचा विकास दर संथ होत आहे. खरे तर सध्या मागणीच कमकुवत आहे. त्यामुळे गरिबांच्या हाती अधिक पैसा देऊन बाजारातील मागणीत वाढ करता येऊ शकते. तरच अर्थव्यवस्थेचा आकार वाढेल. 

> भारतीय अर्थव्यवस्थेत काय त्रुटी दिसतात?
अर्थव्यवस्था अतिकेंद्रीकरणाने (ओव्हर सेंट्रलायझेशन) ग्रस्त झाल्याने मला काळजी वाटते. संस्थांना कामाचे स्वातंत्र्य देणे अत्यंत आवश्यक आहे. 

> अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम दिसतो आहे? 
त्याचा परिणाम अद्याप झालेला नाही. आगामी काळात निश्चित होईल. मात्र, तत्पूर्वी आपली गती मंदावली आहे. 

> दक्षिण आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर काश्मिरातील संघर्षाचा काय परिणाम होईल? 
अर्थशास्त्राच्या दृष्टीने काश्मीर एक छाेटा हिस्सा आहे. परंतु, राजकीय विरोध सुरूच राहिला तर काश्मिरींना आर्थिक नुकसान सोसावे लागेल. 

> तुम्ही भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांसोबत काम केले आहे. गरिबी हटावसाठी कोण उत्तम वाटते आणि का?
गुजरातमध्ये नरेंद्र मोदी, प.बंगालमध्ये ममता, बिहारमध्ये नितीश, तामिळनाडूत एआयडीएमके, हरियाणात खट्टर, पंजाबमध्ये कॅप्टन या सर्वांनी आपापल्या राज्यात खूप काही चांगले केले आहे. 
 

> कंपनी करात केलेल्या कपातीचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा झाला का? 
कंपनी कर कपात ही चूक होती. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मागणीत वाढ करणे आवश्यक आहे.