आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एन्काउंटर स्पेशालिट’ माजी पाेलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची दिव्य मराठीने घेतलेली विशेष मुलाखत; जाणून घ्या ते काय म्हणाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे १९९० च्या दशकात मुंबईत ‘अंडरवर्ल्ड’चा खात्मा करणाऱ्या टीममधील बहुचर्चित एन्काउंटर स्पेशालिट पाेलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शंभरावर गुंडांचा खात्मा करण्याचा ‘विक्रम’ नावावर असलेल्या शर्मांनी नुकताच त्यांनी शिवसेनेत प्रवेशही केला. ‘खाकी’ उतरवून आता ‘खादी’ घालण्याच्या तयारीत असलेले शर्मा नालासाेपारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : तुम्ही भाजपमध्ये जाणार होतात, अचानक सेनेत कसे?
शर्मा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, तसे माझे चांगले मित्रही आहेत. जनतेसाठी ते खूप काम करीत आहेत. माझ्यावर जेव्हा खाेटे बालंट आले तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनीच माझे निलंबन रद्द करून पुन्हा पाेलिस सेवेत घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री व भाजपशी माझे चांगले संबंध आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे काैटुंबिक संबंध आहेत. माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत. गेली ३६ वर्षे मी मुंबईत काम करतोय, त्यामुळे शिवसेना अत्यंत जवळून पाहिलीय. शिवसेनेबद्दल मला प्रेमही आहे. म्हणूनच या पक्षात प्रवेश केला. 

प्रश्न : पण राजकारणात यावेसे का वाटले? ‘पीएस (प्रदीप शर्मा) फाउंडेशन’ ही राजकारणाची मुहूर्तमेढ म्हणता येईल?
शर्मा : पाेलिस खात्यात नाेकरी करताना जनतेच्या समस्या जवळून पाहता आल्या. त्या पोलिस म्हणून सोडवता येणे शक्य नाही. राजकारणातून मात्र त्या साेडवता येतील. नाेकरी करत असताना समाजसेवा करावी या उद्देशाने मी पीएस फाउंडेशनची स्थापना केली. ही समाजसेवा आणखी व्यापक करण्यासाठी आता राजकारणात प्रवेश केलाय.

प्रश्न : आजवर अंगवळणी पडलेला पोलिसी खाक्या दाखवून राजकारणात काम करणे जमेल का?
शर्मा : अभिनेता राजकुमार तुम्हाला ठाऊक असेलच. त्यांनी म्हटले होते, ‘पोलिस प्रशिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या शिक्षणाचा श्रीगणेशा.’ या प्रशिक्षणादरम्यान कोणाशी कसे वागायचे याचेही प्रशिक्षण दिले जाते. नाेकरीतही प्रत्येकाला पोलिसी खाक्या दाखवणे शक्य नसते. गुन्हेगार, सामान्य जनता आणि राजकीय नेत्यांशीही आमचे संबंध यायचे. त्यामुळे कोणाशी कसे वागायचे हे चांगले ठाऊक आहे. राजकारणातही कधी कठाेर तर कधी नरम वागावे लागते, याची जाणीव आहे. ‘गिऱ्हाईक बघून पुडी बांधणे’ मला चांगले जमते.

प्रश्न : तुम्ही राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय तुमच्या कुटुंबीयांना मान्य अाहे का? त्यांच प्रतिक्रिया काय होती?
शर्मा : मी पाेलिस खात्यात न जाता प्राध्यापक व्हावे अशी माझ्या प्राध्यापक वडिलांची इच्छा होती. परंतु तरीही मी पाेलिस झालाे, मात्र माझ्या या निर्णयाला तेव्हाही कुटुंबीयांनी साथ दिली. आताही देतील. मी जो काही निर्णय घेतो तो चांगलाच असतो, यावर घरच्यांचा विश्वास आहे. 

प्रश्न : जनता पोलिसांकडे अभिमानाने तर राजकारण्यांकडे तुच्छतेने पाहते.. हे चित्र तुम्ही बदलू शकाल?
शर्मा : सगळेच राजकारणी भ्रष्टाचारी नसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. ते सतत लाेकांच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे सरसकट राजकारणी भ्रष्ट आहेत असे म्हणणे चुकीचे.

प्रश्न : विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर आमदार झालात तर तुम्ही प्राधान्याने कोणती कामे कराल?
शर्मा : उद्धव ठाकरे माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. ज्या मतदारसंघाचे मी प्रतिनिधित्व करेन तेथील जनतेच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. पोलिस दलात असताना ज्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत असे तसेच आता उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीन.
 

प्रश्न : राजकारणात आल्यावर कोणत्या समस्यांचे ‘एन्काउंटर’ करायला आवडेल?
शर्मा : मुळात मला ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ हे नाव आवडतच नाही. सेवेत असतानाही मी आनंदाने एन्काउंटर करत नव्हताेच. देवाने ज्याला जन्म दिला आहे त्याला संपवणे हे आपले काम नाही. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, कर्तव्य म्हणूून एन्काउंटर करावे लागत होते. राजकारणातील समस्यांची मोठी यादी आहे, त्या सगळ्या समस्या संपवू शकेन की नाही ठाऊक नाही. परंतु प्रयत्न निश्चितच करीन.

बातम्या आणखी आहेत...